पृथ्वीची गिरकी 

डॉ. बाळ फोंडके
गुरुवार, 14 फेब्रुवारी 2019

कुतूहल
 

चिंगी आणि तिची चौकस चौकडी निघून गेल्यावर नानांनी दार नुसतंच लोटून घेतलं होतं. आता तेच धाडकन उघडल्याचा आवाज ऐकून नाना बघतात तो चिंगीची टोळी परत हजर. 
‘अरे आता काय झालं? चिंगीचं डोकं परत भणभणायला लागलं की काय?’ नानांनी विचारलं. 
‘नाही, नाही, म्हणजे हो नाना,’ चिंगी म्हणाली. 
‘नाही म्हणजे हो! म्हणजे?’ नानांनी विचारलं. 
‘म्हणजे डोकं भिरभिरतंय, पण चक्कर आली म्हणून नाही. एक प्रश्‍न भंडावतोय,’ चिंगी म्हणाली. 
‘वाटलंच मला. बोल,’ नाना म्हणाले. 
‘आपली ही पृथ्वीसुद्धा अशीच गिरकी मारते ना?’ चिंगीनं विचारलं. 
‘अर्थात! पृथ्वी स्वतःच्या आसाभोवती फिरत राहते. म्हणून तर दिवसरात्रीचं चक्र तयार होतं.. आणि ही गिरकीही ती भन्नाट वेगानं घेते. जवळ जवळ ताशी १६०० किलोमीटर वेगानं,’ नानांनी उत्तर दिलं. 

‘माझ्या गिरकीचा वेग तर त्या मानानं किस झाडकी पत्ती. तरी मला, तुम्हाला, या बंडू, मिंटी यांना भोवळ का येत नाही?’ 
‘वाऽऽ चिंगी. रास्त आहे तुझा प्रश्‍न. मघाशी मी सांगितलं, की तू गिरकी मारायला लागलीस की तुझ्या कानातल्या द्रवपदार्थाला तू क्षणाक्षणाला तुझी जागा बदलतेस हे जाणवतं. त्यामुळं तेही डुचमळायला लागतं. थोडक्‍यात त्यासाठी तू फिरते आहेस हे, म्हणजेच तुझी गती, जाणवायला हवी. आता मला सांगा की या पृथ्वीच्या भन्नाट वेगाची गिरकी तुम्हाला जाणवते का?’ 

यावर सगळेच गप्प बसले. 
‘आइन्स्टाईननं आपला सापेक्षतावादाचा सिद्धांत तशा नेहमीच्या अनुभवावरच आधारला होता. तू जेव्हा ट्रेननं जात असतेस तेव्हा तुला खिडकीतून बाहेर नुसती पोकळीच दिसली. झाडं, डोंगर, घरं, नदी काहीच दिसलं नाही, तर आपण वेगानं पुढं चाललो आहोत हे जाणवणारच नाही. वाटेत स्टेशन आलं तर स्टेशनवरच्या माणसांना ते स्थिर आहेत, पण ट्रेन मात्र धावते आहे असंच वाटेल. उलट तुला तू स्थिर आहेस आणि स्टेशन आणि तिथली माणसं उलट्या दिशेनं पळताहेत असंच वाटेल. खरं ना!’ नानांनी विचारलं. 

‘हो नाना,’ त्यांच्या म्हणण्याला दुजोरा देत बंडू म्हणाला.. ‘परवा आम्ही ट्रेननं जात असताना वाटेत एका स्टेशनवर थांबलो होतो. शेजारच्या रुळांवर दुसरी गाडी होती. थोड्या वेळानं ती चालायला लागली तर मला वाटलं की आपलीच गाडी चालली आहे. मी दुसऱ्या बाजूच्या प्लॅटफॉर्मकडे पाहिलं तेव्हा समजलं आमची गाडी जागच्या जागीच होती.’ 

‘अगदी बरोबर. म्हणजे जर आपण एकाच न बदलणाऱ्या वेगानं जात असलो तर आपल्याला आपल्या गतीची जाणीवच होत नाही. त्यामुळं कानातली द्रवपदार्थही स्थिरच राहतो. पण जर ट्रेननं एकदम वेग वाढवला किंवा ब्रेक लावून कमी केला तर मात्र ती गती जाणवते. पृथ्वी तुफान वेगानं गिरकी मारते हे खरं. पण त्या वेगात काहीच फरक पडत नाही. शिवाय भवताली फक्त मोकळं आकाशच असतं. त्यामुळं ही गती जाणवत नाही,’ नानांनी सांगितलं. 

‘नाही कशी नाना? त्या आकाशातून सूर्य सरकताना आपल्याला दिसतो, चंद्रही उगवतो आणि मावळतो. आपल्याला पूर्वी वाटत होतं, की तेच फिरताहेत आणि आपण स्थिर आहोत,’ गोट्यानं नानांना चांगलंच पेचात पकडलं. 

‘हो, पण कोपरनिकसनं आणि गॅलिलिओनं दाखवून दिलं की सूर्य स्थिर आहे आणि आपणच फिरतो आहोत,’ चंदूनं गोट्याला परस्पर उत्तर दिलं. 

‘बरोबर, ते भोज्ज्याच्या खुंटासारखे आहेत, रेफरन्स पॉइंट आहेत म्हणून आपण फिरतो आहोत हे कळतं. पण आपणही पृथ्वीच्या वेगानंच फिरत असल्यामुळं आपल्या शरीराला ती गिरकी जाणवत नाही. तो वेग जोवर कायम आहे तोवर ती गती जाणवणार नाही,’ नाना म्हणाले. 

‘हं आता समजलं. तुम्ही म्हणाला होतात की गिरकीमुळं चक्कर नाही येत, एकदम थांबल्यामुळं, गिरकीच्या वेगात फरक पडल्यामुळं चक्कर येते,’ चिंगीला आठवलं. 

‘छान, छान. पृथ्वीनं जर ही स्वतःभोवतीची प्रदक्षिणा थांबवली तर मात्र तो वेग जाणवेल आणि धडपडायला होईल, भोवळ येईल. पण पृथ्वी तशी थांबत नाही. ती नेमानं एक एके एक वेग पकडून फिरतच राहते,’ नाना म्हणाले. 

‘त्यामुळं आपल्याला ती गती जाणवत नाही,’ गोट्या म्हणाला. 
‘..आणि आपल्याला चक्कर येत नाही, आया समझके बीचमे, चिंगीबाय!’ मिंटीनं तिचा कान पकडत विचारलं. त्याबरोबर हुर्रे करत चिंगी आणि चौकडी बाहेर पडली. यावेळी मात्र नाना दरवाजाला कडी घालायला विसरले नाहीत.

संबंधित बातम्या