कसा खणणार बोगदा!

डॉ. बाळ फोंडके
गुरुवार, 21 फेब्रुवारी 2019

कुतूहल
 

संध्याकाळचा चहा घेत नाना आपल्या आवडत्या आरामखुर्चीत बसलेले होते. तेवढ्यात त्सुनामी आल्यासारखी चिंगीची टोळी घरात घुसली. घुम्यासारखी बसून राहिली. त्यांच्या अंगावर अजूनही शाळेचा गणवेश होता. म्हणजे घरात नुसतं दप्तर टाकून चमू आलाय हे नानांनी ओळखलं. 

‘चिंगी, काय झालंय? असे घाईघाईनं का आलात?’ नानांनी विचारलं. 
पण कोणीच काही बोललं नाही. 
‘कोणी सांगेल का मला काय झालंय ते?’ नानांनी परत विचारलं. 
‘चिंगीला बाईंनी वर्गात बाकावर उभं केलं आज,’ गोट्यानं कसंबसं सांगितलं. 
‘पण का? काही दंगामस्ती केली का तिनं? काय ग चिंगी?’ नानांनी विचारलं. 

‘नाही नाना. मी फक्त मला आलेली एक शंका विचारली. तर बाई म्हणाल्या, अगोचरपणा करू नकोस आणि शिक्षा केली. मला सांगा शंका विचारणं चूक आहे का?’ चिंगी म्हणाली. 
‘नाही. पण अशी शंका तरी कोणती आली तुला?’ नाना म्हणाले. 

‘परवाच मी वाचलं की तेलाची विहीर जमिनीखाली दोन हजार मीटर इतक्‍या अंतरावर असते. तिथवर खोदावं लागतं. तर मी विचारलं, की पृथ्वीच्या आरपार जाईल असा बोगदा खणला, म्हणजे पृथ्वीला भोक पाडलं, तर त्यातून मी एकदम पलीकडं दुसऱ्या टोकाला जाऊन पोचेन का?’ चिंगी उत्तरली. 
नानांनाही खरं तर तिचा हा प्रश्‍न अजबच वाटला होता. पण ते हसले नाहीत की चिडले नाहीत. 

‘चांगला आहे तुझा प्रश्‍न. खरं तर यात दोन वेगवेगळे प्रश्‍न समाविष्ट आहेत. पहिला असा बोगदा खणता येईल का हा आणि दुसरा समजा कोणी खणलाच तर त्यातून पार पलीकडं जाता येईल का हा...’ नाना उत्तरले. 
‘म्हणजे खणता येणार नाही असं म्हणायचंय का तुम्हाला नाना?’ मिंटीनं विचारलं. 

‘अगदीच नाही असं नाही. पण त्यात इतक्‍या अडचणी आहेत की प्रत्यक्षात तसा खणणं जवळजवळ अशक्‍यच आहे असं म्हणायला हवं..’ नाना विचार करत बोलले. 
‘पण तुम्हीच तर म्हणता ना की प्रयत्न केला, जरा वेगळा विचार केला तर सगळ्या अडचणींवर मात करता येते म्हणून!’ चिंगी मुद्दा सोडत नव्हती. 

‘हो. पण अडचणी काय आहेत ते तर आधी समजून घ्या. पहिली बाब आहे अंतराची. तू म्हणतेस तसा पृथ्वीच्या आरपार जाईल असा बोगदा खणायचा म्हणजे पृथ्वीच्या व्यासाइतकी त्याची लांबी भरेल. तुम्हाला तर तो व्यास किती आहे हे माहितीच असेल,’ नानांनी विचारलं. 
‘बारा हजार सातशे बेचाळीस किलोमीटर..’ सर्वजण एका सुरात ओरडले. 

‘हो, हो...’ हसत हसत नाना म्हणाले. ‘आजपर्यंत कोला सुपरडीप बोअरहोल हे सर्वांत जास्त खोलवर खणलेलं विवर आहे. ते फक्त बारा हजार सहाशे मीटर खोल आहे. म्हणजे पृथ्वीच्या आसाच्या केवळ एक दशांश. ते खणण्यासाठी वीस वर्षं लागली. तेव्हा पृथ्वीच्या आरपार जाण्यासाठी किती काळ लागेल याचं गणित तुम्हीच करा. ते करणंही कठीण आहे. कारण ते साधं त्रैराशिक नाही. पृथ्वीच्या वरवरच्या थरात तुम्हाला भुसभुशीत माती लागली तरी जसजसे तुम्ही अधिक खोलवर जाता तसतसा कठीण कातळांचा सामना करावा लागतो. त्यांच्यात भोक पाडण्यासाठी योग्य असं ड्रील आज तरी आपल्याजवळ नाही.’ 

‘त्याचा खर्चही जास्त येईल ना नाना?’ मिंटीनं विचारलं. 
‘खर्च तर अतोनात येईल. सारं जगच जवळजवळ कफल्लक होईल. तेवढ्यावर अडचणी संपत नाहीत. या कातळाच्या खाली अर्धवट वितळलेल्या कातळांचा शिलारस आहे. त्याच्यावरच पृथ्वीचे तुकडे तरंगत असतात. या तुकड्यांची, त्यांना टेक्‍टॉनिक प्लेट्‌स म्हणतात, जिथं एकमेकांशी टक्कर होते किंवा ते एकमेकांना घासून जातात तिथं भूकंप होतात. त्या शिलारसाचं तापमान साडेपाच हजार सेल्सियस इतकं आहे,’ नाना उत्तरले. 

‘अबबब! एवढं!’ चंदूनं आ वासत विचारलं. 
‘तर! अरे ते कोला बोअरहोल खणणाऱ्या चमूला बारा किलोमीटर अंतरावरच साडेतीनशे सेल्सियस तापमानाचा सामना करावा लागला होता आणि त्याही पुढं कसेबसे गेलातच तर साधारण पंचेचाळीस किलोमीटर खोलवर लाव्हारसच भेटेल. त्याचं तापमान...’ 

‘...भयानकच असणार. जळून कोळसाच व्हायचा आमचा,’ नानांना पुढं बोलू न देताच बंडू म्हणाला. 
‘तर मग सांगा आहात तयार तो बोगदा खणायला?’ नानांनी विचारलं. 
त्यावर चिंगीसकट सगळ्यांचीच बोलती बंद झाली.

संबंधित बातम्या