भूमिगतवीर 

डॉ. बाळ फोंडके
सोमवार, 11 मार्च 2019

कुतूहल
 

‘पण नाना, तरीही आरपार बोगदा बनणारच नाही,’ मिंटी म्हणाली. 
‘का? का?’ नानांनी उत्तर देण्यापूर्वीच चंदूनं घाईघाईनं विचारलं. 
‘नाना काय सांगत होते ते तू ऐकलंयस ना! ते म्हणाले, की ती कोबाल्टची कुपी पुढ्यातला खडक वितळवत पुढं पुढं सरकत जाईल. भोक पाडत जाईल,’ मिंटीनं उत्तर दिलं. 

‘म्हणजेच बोगदा तयार होईल,’ आता गोट्यानंही दुजोरा दिला. 
‘नाही, तू लक्ष देऊन ऐकलं नाहीस. ते म्हणाले की ती कुपी पुढं पुढं सरकत जाईल, तशी तिच्या पाठचा वितळलेला खडक परत घट्ट होत जाईल. पूर्वीसारखा होईल. म्हणजेच ते भोक बुजत जाईल ना!’ विजयी मुद्रेनं मान वर करत मिंटी म्हणाली. 

तिचा मुद्दा पटल्यानं क्षणभर कोणीच काही बोललं नाही. 
‘तसं नाही होणार. म्हणजे आपण होऊ द्यायचं नाही,’ इतका वेळ गप्प बसलेली चिंगी म्हणाली. 
‘कसं थांबवणार आपण ते?’ चंदूला प्रश्‍न पडला. 

‘अरे परवा मी त्या मुंबईतल्या भुयारी मेट्रोबद्दल वाचत होते. तिथंही त्या मशिननं खडकाला भोक पाडत भुयार तयार केल्यानंतर काही वेळा तिथली भुसभुशीत माती त्यात पडून ते भोक बुजलं जाण्याचा धोका होता,’ चिंगी म्हणाली. 
‘हो, हो. मीही वाचलंय ते,’ आता सगळेचजण म्हणाले. नानांना कौतुक वाटलं. मुलं हूड असली तरी अभ्यासू होती, वाचत होती. माहिती मिळवत होती. 

‘म्हणून मग खोदकाम झाल्याबरोबर त्या भुयाराला लोखंडाच्या पट्ट्यांचा आधार दिला जात होता. त्यावर काँक्रिटचा जाड मुलामा दिला जात होता. आता ते भुयार पक्कं होत होतं,’ चिंगीनं सांगितलं. 
‘अगदी बरोबर!’ गोट्या म्हणाला, ‘माझे काका कोकण रेल्वेच्या कामावर होते. तेही सांगत होते. असंच काहीसं तिथंही केलं होतं.’ 
‘आपणही तसंच करायचं,’ चिंगी म्हणाली. 

‘म्हणजे लोखंडाच्या पट्ट्या लावायच्या?’ बंड्या चेष्टेच्या सुरात म्हणाला, ‘त्यांचा तर वितळून चिखलच होईल तिथल्या त्या अफाट उष्णतेनं.’ 
‘मग टंग्स्टनच्या पट्ट्या लावल्या तर! ते तर नाही ना वितळत अगदी साडेतीन हजार अंश उष्णतेतही. त्या लावून बोगदा पक्का करायचा. ती कुपी पुढं पुढं जात राहील आणि तिच्या मागं मागं आपण तो बोगदा पक्का करत राहायचं. शेवटपर्यंत. पार दुसऱ्या टोकापर्यंत जायचं,’ चिंगीचं उत्तर तयार होतं. 

नाना काहीच बोलत नव्हते. उत्सुकतेनं ते मुलांचा संवाद ऐकत होते. मुलांच्या कल्पनाशक्तीचं त्यांना कौतुक वाटत होतं. आपण मुलांना स्वतंत्रपणे विचार करू देत नाही. त्यामुळंच तर त्यांची कल्पनाशक्ती मारून टाकल्यासारखी होते. नवीन काही निर्माण करायचं, तर असा चाकोरीबाहेरचा विचारच करायला हवा. वरवर तो कितीही तिरपागडा वाटला तरी! यालाच तर वैज्ञानिक ‘ब्लू स्काय रिसर्च’ किंवा ‘टेक्‍नॉलॉजी इन द माईंड’ म्हणतात. असा जगावेगळा विचार काही जणांनी केला म्हणूनच तर आज शक्तिशाली संगणक आणि मोबाईलसारखी यंत्रं बनवली गेली. अवकाशातल्या उपग्रहांचं बोट धरून जमिनीवरची वाहतूक सुरळीत ठेवता आली... 

नाना ऐकत होते... 
‘ऑल राइट! तू म्हणतेस तसा झाला बोगदा तयार. पण, चिंगी तू करणार काय त्याचं?’ बंडूला प्रश्‍न पडला. 
‘काय करणार म्हणजे? त्यात उडी घेणार आणि प्रवास करणार या टोकापासून पार पृथ्वीच्या दुसऱ्या टोकापर्यंत. सुंईसपाट! बुलेट ट्रेनसारखा...’ उत्साहात चिंगी म्हणाली. 

‘अर्ध्या वाटेतच कोळसा होऊन जाईल तुझा. वाटेत तो उकळता लाव्हारस आहे ना, साडे तीन हजार अंश तापमानाचा. त्यातून कशी वाट काढशील?’ मिंटीनं विचारलं. 
क्षणभर चिंगी घुटमळली. पण लगेच चुटकी वाजवत म्हणाली, ‘टंग्स्टन! त्या टंग्स्टनचाच पोशाख चढवेन ना अंगावर. अंतराळवीर नाही का तो स्पेशल ड्रेस घालत.’ 

‘तशीच आमची ही भूमिगतवीर टंग्स्टनचा स्पेशल ड्रेस घालणार..’ मिंटी तिच्या पाठीवर थाप देत म्हणाली. 
‘त्याच्या आत तापमान आपल्याला सहन होईल असं ठेवण्याचीही व्यवस्था करू ना. स्पेशल ड्रेससाठी स्पेशल एअर कंडिशनिंग!’ 

आता नानाही आश्‍चर्यचकित झाले. भारावून गेले. मुलांनी कल्पना तर खरोखरीच भन्नाट लढवल्या होत्या. त्या प्रत्यक्षात आणता येतील का, ही बाब अलाहिदा. पण त्यात वैज्ञानिकदृष्ट्या काही चूक काढता आली नसती.

संबंधित बातम्या