चिंगीचा यो यो 

डॉ. बाळ फोंडके
सोमवार, 18 मार्च 2019

कुतूहल
 

चिंगी आणि कंपनी आपल्याच नादात मग्न होती. नानांकडं त्यांचं लक्षही नव्हतं. नानाही गप्प बसून त्यांची चर्चा ऐकत होते. 
आता मात्र खाकरून त्यांनी सर्वांचं लक्ष वेधून घेतलं. 

‘सॉरी नाना, आम्ही आपापसांतच बोलत राहिलो,’ मुलं एकसुरात म्हणाली. 
‘काही हरकत नाही. मलाही तुमच्या एकेक कल्पना ऐकताना मजा येत होती. तर तुमचा बोगदा आता तयार झाला एकदाचा!’ नाना म्हणाले. 
‘म्हणजे नाना, तुम्हालाही पटली तर माझी युक्ती!’ आनंदानं नाचत चिंगीनं विचारलं. नानांनी नुसतीच मान डोलावली. 
‘म्हणजे आता मी एका टोकापासून जगाच्या दुसऱ्या टोकापर्यंत झटक्‍यात जाऊ शकेन तर!’ चिंगी उत्साहात होती. 
‘नाना, ही म्हणाली बुलेट ट्रेनसारखी. तर खरं सांगा किती वेळात पोचेल ती हे अंतर पार करून?’ चंदूला प्रश्‍न पडला. 
‘तसं त्याचं गणित केलंय वैज्ञानिकांनी! एवढं अंतर पार करायला साधारण बेचाळीस मिनिटं लागतील,’ नाना उत्तरले. 
‘वॉव..!’ मिंटी उद्‌गारली. ‘तेवढ्या वेळात तर मुंबईहून ठाण्याला किंवा पुण्याहून तळेगावलाही पोचता येत नाही.’ 
‘खरंय. तरीही चिंगी तू असा प्रवास करून दुसऱ्या टोकाला नाही पोचणार,’ नाना म्हणाले. 
‘का नाही? आता तर मी त्या उकळत्या लाव्हारसातून कसा प्रवास करायचा हेही सांगितलंय,’ चिंगी तिच्याच विचारात होती. 

‘ते ठीक आहे. पण काय होईल ते सांगतो,’ नाना म्हणाले. ‘तू जेव्हा पृथ्वीच्या अलीकडच्या टोकाला असशील तेव्हा तू गुरुत्त्वाकर्षणाच्या ओढीपायी धरतीच्या मध्यबिंदूकडं खेचली जाशील. तू बोगद्यात उतरशील तेव्हा तुझा वेग शून्य असेल. पण जसजशी तू मध्यबिंदूकडं खेचली जाशील तसतसा तुझा वेग वाढत जाईल... आणि मध्यबिंदूवर पोचलीस, की तुझा वेग कमाल पातळीवर पोचेल.’ 

‘पोचणारच... आणि त्यामुळंच मग मी पुढंपुढंच जात राहीन,’ चिंगी अजूनही तिच्या तंद्रीत होती. 

‘अगदी खरंय. पण आतापर्यंत तू मध्यबिंदूच्या दिशेनं प्रवास करत होतीस. म्हणून गुरुत्त्वाकर्षणाची ओढ तुला त्याच्या दिशेनं खेचत होती. तुझा वेग वाढवीत होती. पण आता मात्र तू पुढं आणि मध्यबिंदू तुझ्या मागं अशी स्थिती होईल. गुरुत्त्वाकर्षण तुला त्या मध्यबिंदूच्या दिशेनंच खेचत राहील. म्हणजे तुझ्या प्रवासाच्या उलट दिशेनं,’ नानांनी समजावलं. 

‘म्हणजे मग नाना तिचा वेग आता कमीकमी व्हायला हवा ना?’ चंदूनं विचारलं. 
‘वाह! बरोबर ओळखलंस. वेग आता कमीच होत जाईल आणि चिंगी दुसऱ्या टोकाला पोचेल तेव्हा तिचा वेग शून्य होईल,’ नाना म्हणाले. 
‘चांगलंच आहे की! कारण आता मला बोगद्यातून बाहेर पडून तिथं उतरणं सोपंच होईल,’ चिंगी तिच्या स्वप्नातून बाहेर यायला तयार नव्हती. 

‘पण तू अतिशय चपळाई करून उतरलीस तरच ते शक्‍य होईल. तेवढी घाई करणंही तसं तुला कठीणच जाईल. कारण तुझा वेग जरी शून्यावर आला असला, तरी गुरुत्त्वाकर्षणाची ओढ तेवढीच राहणार आहे. ती तुला उलट दिशेनं म्हणजे परत मध्यबिंदूकडं खेचतच राहील. तुझा परत उलट्या दिशेनं प्रवास सुरू होईल,’ नाना म्हणाले. 

‘समजलं नाना,’ मिंटी म्हणाली. ‘म्हणजे आता तिच्या प्रवासाची दिशा आणि गुरुत्त्वाकर्षणाच्या ओढीची दिशा एकच असेल.’ 
‘हो ना!’ गोट्यानंही तिला साथ दिली. ‘त्यामुळं तिचा वेगही वाढत जाईल.’ 

‘बरोबर ओळखलंत. मध्यबिंदूवर पोचेतो तिचा वेग कमाल पातळी गाठेल. त्यापायी ती तशीच पुढंपुढं जात राहील. पण परत एकदा तिच्या प्रवासाची दिशा आणि गुरुत्वाकर्षणाच्या ओढीची दिशा एकमेकांच्या विरुद्ध होतील. वेग कमीकमी होत जाईल आणि ती परत मूळ ठिकाणी पोचेल,’ नाना म्हणाले. 
‘हात्तिच्च्या! म्हणजे एवढी धडपड करून चिंगी तू परत आहे तिथंच येशील,’ गोट्या म्हणाला. 

‘हो पण ती तिथंच राहणार नाही बरं का. कारण आता परत गुरुत्त्वाकर्षणाची ओढ तिला मध्यबिंदूकडं खेचत जाईल. तिचा प्रवास त्या दिशेनं सुरूच राहील. थोडक्‍यात काय, तर ती इकडून तिकडं आणि तिकडून परत इकडं अशी सतत फिरत राहील,’ नानांनी स्पष्ट केलं. 

‘म्हणजे चिंगीचा यो यो होईल. वरून खाली आणि खालून वर. यो यो..’ चंदू म्हणाला. 
यावर चिंगी सोडून इतर सर्वजण आपली मूठ उंचावत ओरडले ‘योऽऽऽह!’

संबंधित बातम्या