आजीबाईची गाठ 

डॉ. बाळ फोंडके
सोमवार, 8 एप्रिल 2019

कुतूहल
 

मुलांची टोळी उड्या मारतच नानांच्या घरात शिरली. त्यांचा दरवाजा क्वचितच बंद असे. त्यामुळं मुलं केव्हाही सरळ घरात घुसत. नानांना आता त्याची सवय झाली होती. चंदू मात्र हिरमुसला होता. त्याच्या ढोपरावरही खरचटलं होतं. त्यावर आयोडीन लावल्यामुळं तो भाग चांगलाच लालभडक दिसत होता. कोपरालाही लागल्यासारखं वाटत होतं. नानांनी थेट त्यालाच विचारलं, 

‘काय रे चंदू, काय झालं? कुठं धडपडलास?’ 

यावर काही उत्तर देण्याऐवजी तो रडवेलाच झाला. येणारं रडू आतल्या आत दाबायचा प्रयत्न करू लागला. गोट्यानंच सांगितलं, ‘धावता धावता त्याच्या बुटाची नाडी सुटली. तिच्यात पाय अडकून पडला आणि मग लागलं इथं तिथं.’ 

‘वेंधळाच आहे तो नाना, त्याची आईच सांगते...’ चिंगीनं आणखी स्पष्टीकरण दिलं. 
‘नाडी नीट बांधली नव्हती. मग सुटली. आणि...’ मिंटीनंही तिच्या सुरात आपला सूर मिळवला. 
‘नाही नाना, मी नीट घट्ट बांधली होती,’ चंदूनं आपला बचाव करत सांगितलं. 

‘मग सुटली कशी?’ मुलांच्या या प्रश्‍नावर चंदूकडं उत्तर नव्हतं. मग नानाच म्हणाले, ‘कितीही घट्ट बांधली असली तरी धावता धावता आपोआप नाडी सुटते. वैज्ञानिकांनी प्रयोग करून सिद्धच केलंय हे.’ 

‘प्रयोग करून? कसले? कशाला?’ सगळ्यांनीच एकसाथ प्रश्‍न विचारत गलका केला. हात वर करून तो थोपवत नाना म्हणाले, ‘हो, हो, प्रयोग करून. एक नाही दोन प्रयोग केले त्यांनी. कोणते तेही सांगतो. पण त्याआधी त्यांनी नाडीची गाठ कशी मारतात हेही पाहिलं.’ 

‘कशी म्हणजे? आपण ‘बो’ची गाठ बांधतो तशी,’ गोट्या म्हणाला. 
‘हो ना, आई माझ्या वेणीच्या रिबिनीची गाठही तशीच मारते,’ मिंटीनं सांगितलं. 

‘तरीही तिचे दोन प्रकार आहेत. त्या ‘बो’ची मध्यभागी जिथं गाठ बसते तिथं त्या दोन बाजूच्या नाड्यांना पीळ बसतो. एका प्रकारच्या गाठीत एक पीळ वरच्या बाजूला असतो तर दुसरा खालच्या बाजूला. हिचं नाव आहे ग्रॅनी नॉट,’ नाना म्हणाले. 

‘म्हणजे आजीबाईची गाठ?’ चिंगीला आश्‍चर्य वाटलं. 
‘वा चिंगी! चांगलं नाव दिलंस,’ नानांनी शाबासकी दिली. 
‘दुसरी काय आजोबांची गाठ?’ गोट्यानं चेष्टेच्या सुरात विचारलं. 

‘तू म्हण हवं तर तसं. पण तिला स्क्वेअर नॉट असं नाव आहे. या गाठीचे ते दोन्ही पीळ एकाच पातळीत असतात. कोणताही खाली नाही की वर नाही,’ नानांनी माहिती दिली. 

‘म्हणजे कसा? आम्हाला नाही समजलं,’ कोरसमध्ये विचारणा झाली. 
‘थांबा तुम्हाला त्यांची चित्रंच दाखवतो. ही पाहा.. ही डावीकडची आहे ती ग्रॅनी नॉट आणि उजवीकडची स्क्वेअर नॉट,’ नाना म्हणाले. 
दोन्ही चित्रं नीट पाहून झाल्यावर चिंगीनं विचारलंच, ‘यातली कोणती सुटते आणि कोणती नाही?’ 

‘तशा दोन्हीही सुटतात. पण स्क्वेअर नॉट जरा जास्त तग धरते. आजीबाईची गाठ तुलनेनं थोडी कमजोर असते. लवकर सुटते. तरीही त्या प्रयोगातून ती का सुटते याचा उलगडा झाला आहे. आता तुम्ही दोन्ही गाठी पाहिल्यात ना? मग का सुटते ही गाठ याचा विचार करा. उद्या मीच विचारेन तुम्हाला,’ नानांनी सांगितलं. 

‘..आणि आम्हाला ते कोडं नाही सुटलं तर!’ शरणागती पत्करत बंडू म्हणाला. 
‘अरे गाठ सुटते मग कोडं का नाही सुटणार?’ त्याच्या डोक्‍यावर हलकेच टपली मारत नानांनी सगळ्यांना घरी पिटाळलं.

संबंधित बातम्या