एक से दो भारी... 

डॉ. बाळ फोंडके
सोमवार, 22 एप्रिल 2019

कुतूहल
 

टोळी परत आली तेव्हा पुन्हा एकदा चंदू रडवेला झाला होता. 
‘काय रे, परत सुटलेल्या नाडीत अडखळून पडलास की काय?’ नानांनी विचारलं. 
‘हो नाना..’ कोरसमध्ये सगळे ओरडले. ‘वेंधळाच आहे तो.’ 

‘नाही नाना, तुम्हीच म्हणालात ना की चाललं तरी नाडी सुटतेच. मग सुटणारच असली तर बांधायची कशाला म्हणून मी बांधलीच नाही. म्हणजे ती तुम्ही सांगितलेली दोन्ही बलं निकामीच ठरतील असा विचार केला मी,’ चंदू म्हणाला. 
‘..आणि सुट्या नाडीत अडखळून पडला,’ मुलं पुन्हा ओरडली. 

‘अरे पण नाडी सुटी सोडण्याऐवजी खोचून तरी ठेवायचीस. ते राहू दे. रायलीनं दुसराही एक प्रयोग केला. त्याची गोष्ट तुम्हाला सांगायच्या आतच तुम्ही पसार झालात,’ नाना म्हणाले. 
‘दुसरा प्रयोग? तो कशासाठी? पहिला प्रयोग चुकीचा होता की काय?’ चिंगीनं विचारलं. 

‘नाही, पण त्यातून मिळालेलं कोड्याचं उत्तर बरोबरच आहे याचा पडताळा घेण्यासाठी त्यांनी हा दुसरा प्रयोग केला. पहिल्या प्रयोगात त्यांना असं दिसलं होतं, की त्या गाठीवर एकाच वेळी दोन दोन बलांचा भार पडतो,’ नानांनी सांगितलं. 
‘हो, एक गुरुत्वाकर्षणाचा आणि...’ गोट्या म्हणाला. 

‘...आणि दुसरा त्या सुट्या टोकांच्या चक्राकार गतीचा,’ बंडूनं त्याचं वाक्‍य पूर्ण केलं. 
‘बरोबर. तर रायलींच्या मनात असा सवाल आला, की त्या दोन बलांची एकमेकांना साथ मिळून त्यातून त्यांच्या बेरजेपेक्षा जास्त ताण त्या गाठीवर पडतो की काय? म्हणजे एकेकट्या बलाचा जो ताण पडतो त्यांची बेरीज केली, तर जेवढा ताण जाणवायला हवा त्यापेक्षा त्या दोघांनी एकसाथ हल्ला केल्यामुळं गाठीला जास्त ताणाला तोंड द्यावं लागतं की काय?’ नानांनी स्पष्ट केलं. 

‘म्हणजे एकेकट्या शत्रूला आपण पुरून उरतो, पण दोघांनी एकसाथ हल्ला केला तर मग दोन आघाड्यांवर लढता लढता दमछाक होते; तसंच ना? परवा बाबाच सांगत होते मला,’ मिंटी म्हणाली. 
‘अगदी चांगलं उदाहरण दिलं बाबांनी. नेमका हाच प्रश्‍न रायलींना पडला होता. म्हणून त्यांनी त्या ख्रिस्तीन ग्रेगलाच पुन्हा एका खुर्चीत प्रयोगाला बसवलं. परत सुरुवात झाली नाडी घट्ट बांधण्यापासून,’ नाना म्हणाले. 

‘पण आता तर ती धावत नव्हती. चालतही नव्हती. तर मग नाडी सुटण्याचा प्रश्‍नच कुठं येतो? की नुसतं बसून राहिलं तरी त्या गाठीला कंटाळा येतो आणि ती सुटायला बघते?’ चिंगीनं विचारलं. 
‘चिंगी तुझ्या कल्पना बाकी भारी असतात हं. त्या सातपट असलेल्या गुरुत्वाकर्षणासारख्या. पण ती धावत नसली तरी धावताना त्या गाठीवर पडणाऱ्या ताणाची प्रतिकृती त्यांनी तिला करायला लावली,’ नानांनी माहिती दिली. 

‘ती कशी?’ गोंधळलेल्या मिंटीनं विचारलं. 
‘त्यांनी बसल्या जागीच पाय घोट्यातून चक्राकार फिरवायला सांगितले. एकदा डावा मग उजवा मग परत डावा अशा प्रकारे. सुरुवातीला हळूहळू आणि दोन पायांच्या फिरण्यात थोडा वेळ जाऊ देऊन,’ नाना म्हणाले. 

‘म्हणजे चालल्यासारखं!’ गोट्या म्हणाला. 
‘वाऽऽऽ चांगलं ओळखलंस. मग हा वेळ कमी कमी करायला सांगितलं. तसंच पाय फिरवण्याचा वेगही वाढवायला सांगितलं,’ नाना म्हणाले. 
‘म्हणजे आता ती धावायला लागली?’ चिंगीचा प्रश्‍न. 
‘करेक्‍ट! पण कोणत्याही वेळी ती गाठ सुटली नाही. आहे तशीच टिकून राहिली. या प्रयोगात गाठीवर फक्त एकाच बलाचा ताण पडला होता. त्याचा मुकाबला गाठीनं व्यवस्थित केला. ती सुटली नाही,’ नानांनी सांगितलं. 
‘पण त्या दुसऱ्या ताणाचं, गुरुत्वाकर्षणाच्या ओढीचं काय?’ बंड्यानं हळूच विचारलं. 
‘त्याचाही प्रयोग केला ना. यावेळी तिला पाय गोलाकार न फिरवता जागच्या जागीच फक्त जमिनीवर आपटायला सांगितलं,’ नानांनी माहिती दिली. 
‘हो नाना, म्हणजे आता फक्त गुरुत्वाकर्षणाच्या ओढीचाच ताण पडणार होता, चक्राकार गतीचा नाही,’ चिंगी म्हणाली. 
‘अगदी बरोबर, यावेळीही गाठ सुटली नाही. पाय कितीही जोरानं आपटला तरी...’ नाना म्हणाले. 
‘म्हणजे एकाच वेळी दोन दोन ताणांचा भार पडल्यामुळं गाठ सुटली, कोणत्याही एका ताणामुळं नाही,’ कोरसमध्ये एकसाथ सगळे ओरडले. ‘एकसे दो...’ 
‘... भारी!’ नानांनीही साथ दिली.

संबंधित बातम्या