पाणीच पाणी चहूकडे 

डॉ. बाळ फोंडके
सोमवार, 29 एप्रिल 2019

कुतूहल
 

दाराची कडी वाजली म्हणून नानांनी दार उघडलं तर मिंटी एकटीच आत आली. काहीही न बोलता चेहरा पाडून बसून राहिली. नानांनी विचारल्यावरही ती काही बोलली नाही. 

‘अगं काय झालंय? तू बोलत का नाहीस? तू सांगितल्याशिवाय कळणार कसं मला काय झालंय ते? आणि तू एकटीच कशी? बाकीचे सगळे कुठं गेले?’ नानांनी एका पाठोपाठ एक प्रश्‍नांची सरबत्ती लावली. पण मिंटी काहीच बोलेना. 

‘आम्ही सांगतो काय झालंय ते...’ सगळी टोळी आत येत बोलली. ‘मिंटीला तिची आई खूप बोलली. तिच्यावर आई खूप रागावलीय,’ चिंगीनं माहिती दिली. 
‘का? काय केलंय तिनं?’ नानांनी विचारलं. 
‘तिनं झाडांना पाणी घातलं,’ गोट्यानं उत्तर दिलं. 

‘आईनंच सांगितलं होतं मला. ती तीन दिवस माहेरी गेली होती. तर ती येईपर्यंत तिच्या झाडांना पाणी घालायला सांगितलं होतं मला,’ मिंटीनं प्रथमच तोंड उघडलं. 

‘घातलं नाहीस का तू पाणी?’ नानांना कळेना. 
‘घातलं ना. चांगलं घातलं. दिवसातून तीन-चार वेळा घातलं,’ मिंटी म्हणाली. 
‘पण ती झाडं मेली आणि त्याला मिंटीच कारण आहे असं तिची आई म्हणते,’ चंदूनं सांगितलं. 
‘आता तुम्हीच सांगा नाना, पाणी आवश्‍यक आहे ना झाडांच्या वाढीसाठी! मग ते दिल्यानं झाडं कशी मरतील?’ मिंटीनं विचारलं. 
‘अस्सा मामला आहे तर. मला सांग मिंटी, तू कसं पाणी दिलंस त्या झाडांना?’ नानांनी विचारलं. 
‘कसं म्हणजे?’ मिंटीला कळेना. 

‘म्हणजे झारीनं घातलंस की पाइपमधून घातलंस की आणखी कसं घातलंस?’ नानांनी विस्तार केला. 
‘नाही, नाही, झारीनं नाही. तिच्यातून तर अगदीच चुळूकभर पाणी पडतं. मी चांगला तांब्या भरून घेतला आणि सगळं पाणी एका झाडाला दिलं. मग दुसरा तांब्या भरला आणि दुसऱ्या झाडाला. प्रत्येक कुंडी चांगली वरपर्यंत भरून गेली होती पाण्यानं,’ मिंटी निरागसपणे सांगत होती. 

‘... आणि असं तू दिवसातून तीन-चार वेळा केलंस!’ नानांनी विचारलं. 
‘हो. त्यांना भरपूर पाणी मिळावं, पाणी न मिळाल्यानं ती सुकून जाऊ नयेत म्हणून मी तसं पाणी दिलं,’ मिंटीनं उत्तर दिलं. 
‘... तर तिची आई म्हणते की त्यामुळंच ती झाडं मेली,’ बंडू म्हणाला. 

‘बरोबरच आहे त्यांचं. तू असं भरभरून पाणी दिलंस तर ती झाडं जगतील कशी!’ नाना म्हणाले. 
‘का? का? भरपूर पाणी दिल्यावर उलट झाडं अधिक जोमानं वाढायला हवीत. ती मरतील कशी?’ मिंटी उसळून म्हणाली. 
‘ती खाडीच्या किनाऱ्यावर वाढतात ती तिवरांची झाडं कशी सतत पाण्यात राहूनही चांगलीच फोफावतात, ते कसं होतं?’ चिंगीनंही विचारलं. 

‘हो, हो ती नाही मरत! मग मी दिलेल्या पाण्यानंच झाडं मेली असं आई कसं म्हणते?’ आता मिंटीलाही स्फुरण आलं. 

‘असं बघा प्रत्येक सजीवाला, मग तो प्राणी असो की वनस्पती असो, पाण्याची गरज असते. पण प्रत्येकाची पाण्याची गरज वेगवेगळी असते. मासा पाण्यातच राहतो. पण आपण त्याच्यासारखे सतत पाण्यात राहू का? मासेमारी करणाऱ्या कोळ्यांसारखं ज्यांना सतत पाण्यातच काम करावं लागतं त्यांचे पाय बघितलेत कधी? त्यांनी काळजी नाही घेतली तर ते सडल्यासारखे होतात. वनस्पतींचंही तसंच आहे. तिवराच्या झाडांची प्रकृतीच पाण्यात वाढण्याची आहे. त्यांना त्याचा त्रास नाही होत. उलट तसं सतत पाण्यात राहायला नाही मिळालं तर ती मरतील. पण आपल्या घरात, कुंडीत वाढणाऱ्या झाडांना तेवढं पाणी नाही लागत. ती अशी सतत पाण्यात राहिली तर त्यांच्यावर जीवाणू, विषाणू यांचा सहज हल्ला होऊ शकतो. त्यांच्याविरुद्ध लढण्याची त्यांची नैसर्गिक ताकद कमी होते. शिवाय त्यांची मुळं पाण्यात राहिल्यामुळं त्यांना आवश्‍यक तेवढा ऑक्‍सिजन मिळत नाही. आपल्याला जर असा ऑक्‍सिजन नाही मिळाला, तर आपला श्‍वास कोंडतो ना तसंच त्यांचंही होतं. निवडुंगासारख्या वाळवंटातच सामान्यपणे वाढणाऱ्या झाडांना तर कधीतरी पडणाऱ्या एखाद्या सरीचा शिडकावाही पुरतो. आपल्या शेतातही भातपिकाला भरपूर पाणी लागतं. पण शेंगदाण्याला थोडंसं पाणीही पुरतं. ठिबक सिंचन पुरतं. तू नको तितकं पाणी दिलंस मिंटी,’ नाना म्हणाले. 

‘म्हणजे तिनं झाडांना बुडवून मारलं असंच ना!’ गोट्या म्हणाला. 

‘तसंच म्हणेनास. तर मिंटी आईवर रागावू नकोस. सॉरी म्हण आणि नवीन रोपं आणून आता झाडं तगवून दाखव. आई तुला शाबासकीच देईल बघ,’ नानांनी मिंटीची समजूत काढली.

संबंधित बातम्या