पहाटेचा स्वरमेळ 

डॉ. बाळ फोंडके
सोमवार, 6 मे 2019

कुतूहल
 

नाना नेहमीप्रमाणं आपल्या सकाळच्या फेरफटक्‍याला निघाले होते. तर कट्ट्यावर त्यांना चिंगीची चौकस चौकडी दिसली. कसली तरी गंभीर चर्चा चालली होती. वास्तविक, परीक्षा होऊन उन्हाळ्याची सुटी लागली होती. या वेळी ही पोरं बिछान्यात लोळत पडून राहणंच पसंत करत. त्यामुळं इतक्‍या सकाळी उठून ही इथं बसलेली पाहून नानांना आश्‍चर्य वाटलं. त्यांनी टोळीला हटकलं... 
‘काय मंडळी, काय चाललंय? मला वाटलं तुम्ही अजूनही बिछान्यातच असाल,’ नाना म्हणाले. 

‘नाही नाना,’ चिंगी म्हणाली, ‘या सुटीत आम्ही काहीतरी वेगळं करायचं ठरवलंय.’  ‘आम्ही सगळे जॉगिंग करणार आहोत,’ चंदूनं सांगितलं. 

‘म्हणून लवकर उठून आम्ही शेजारच्या ‘नाना-नानी पार्क’मध्ये गेलो होतो,’ बंडू म्हणाला. ‘तिथं इतक्‍या पक्ष्यांचं गाणं ऐकायला मिळालं आम्हाला,’ गोट्या म्हणाला. ‘किती तरी वेगवेगळे पक्षी होते. म्हणजे सगळेच दिसले नाहीत. पण त्यांचं गाणं मात्र ऐकायला येत होतं.’ ‘काही तर इवलाले होते. सुळ्ळकन इकडून तिकडं जात. काय गोड गात होते!’ मिंटी अजूनही त्याच विश्‍वात होती. 
‘...आणि ती कोकिळा! जीव तोडून कुहू कुहू असं ओरडत होती,’ चिंगी म्हणाली. 
‘पण नाना हे पक्षी असे सकाळीच का गातात?’ चंदूनं शंका विचारली. 

‘हे काही खरं नाही. ते तसे कोणत्याही वेळी गातात. पण सकाळच्या शांत वेळी ते आपल्याला स्पष्ट ऐकू येतं. तरीही पहाटे गायला त्यांना जरा जास्त उत्साह येतो हेही खरंच आहे. वैज्ञानिकांनी याला डॉन कोरस असं नाव दिलं आहे. जसं आपल्या अंगात निसर्गानं एक घड्याळ बसवलं आहे..’ नाना सांगत होते. 
‘... म्हणजे आजीबाईचं घड्याळ. आजीच्या जवळी घड्याळ कसले आहे चमत्कारिक!’ चिंगी मधेच म्हणाली. 

‘..हं तसलंच. त्यामुळं त्यांना सूर्योदयाची चाहूल लागते. म्हणून त्यावेळी ते उठून गातात. अजून नीटसं उजाडलेलं नसतं. त्यांना त्या अंधारात आपलं खाणं असलेले कीडामुंगी नीटसे दिसत नाहीत. पण त्यांच्यावर इतर कोणी डल्ला मारू नये म्हणून घाईघाईनं उठत ते इतर पक्ष्यांना इशारा करत असतात, की हा माझा प्रदेश आहे. इथल्या खाद्यसंपत्तीवर माझा हक्क आहे. इतर कोणी इथं घुसखोरी करण्याचा प्रयत्न करू नये,’ नाना म्हणाले. 

‘आणि इतर त्यांचं ऐकतात?’ गोट्यानं शंका विचारली. ‘तसंच काही नाही. पण त्यांच्यामध्ये त्या खाण्यावरून मारामारी होणं तरी टळतं.. आणि सहसा नर पक्षीच गातात, गळा साफ करून घेतात. कोंबडाही बघा सूर्योदयाची चाहूल लागली की आरवतो. त्यासाठी तो शक्‍य तितक्‍या उंच जागी जाऊन बसतो. त्यामुळं आपण देत असलेला इशारा दूरदूरवर पसरावा अशी व्यवस्था करतो,’ नानांनी सांगितलं. 

‘हो नाना, गेल्या वर्षी मी गावी गेलो होतो तर तिथं पाहिलं,’ चंदू म्हणाला. ‘आरवण्यापूर्वी आमचा कोंबडा कुंपणाच्या गडग्यावर जाऊन बसायचा, उंचावर आणि कोंबडाच आरवायचा. कोंबडी कधी आरवलेली मी पाहिली नाही.’ 

‘कारण ती मादी आहे. नर पक्षीच सहसा गातात ते आपल्या जोडीदाराच्या शोधात. हा बहुतेक पक्ष्यांचा विणीचा हंगाम असतो. त्यामुळं प्रत्येक जण चांगल्या जोडीदाराच्या शोधात असतो. आपण जन्माला घालणारी पुढची पिढी सशक्त, सुदृढ असावी अशी सगळ्यांचीच इच्छा असते. त्यामुळं मादी पक्षी ज्याच्या अंगी असे चांगले गुण आहेत अशा जोडीदाराच्या शोधात असते. जो इतका मंजुळ आणि तरीही जोमदार आवाजात गाऊ शकतो तो चांगला शक्तिमान असावा असं त्या समजतात. नर पक्षीही या गाण्यातून आपल्या अंगी असलेल्या चांगल्या गुणांची जाहिरातच करत असतात. सकाळच्या प्रहरी त्यांचा आवाज स्वच्छ आणि दूरवर पोचू शकतो. त्यामुळं परिसरातील सगळ्याच मादी पक्ष्यांना तो व्यवस्थित ऐकू येतो,’ नानांनी माहिती दिली. 
‘म्हणजे हे नर पक्षी स्वयंवरासाठीच उभे असतात की काय?’ मिंटीनं विचारलं. 

‘कल्पना मजेशीर आहे तुझी मिंटी. पण तसंच म्हणेनास. नाही तरी हा पहाटेचा स्वरमेळ म्हणजे प्रेमानं घातलेली सादच असते. प्रेमकूजन. ते ऐकूनच मग त्यांच्या जोड्या जमतात, अंडी घातली जातात आणि त्यातून पिलं जन्माला येतात. आपलं मनोरंजन करण्यासाठी काही हे पक्षी गात नसतात. आपल्या कानांना तो स्वरमेळ गोड लागतो हा झाला आनुषंगिक फायदा. मग आता सुटी असेपर्यंत रोज जाणार ना तो ऐकायला?’ नानांनी विचारलं. 

‘हो नाना!’ आपल्या आवाजाच्या ताकदीची जाणीव नानांना करून देत टोळी पळाली.

संबंधित बातम्या