मिणमिणत्या प्रकाशात 

डॉ. बाळ फोंडके
सोमवार, 13 मे 2019

कुतूहल
 

चिंगीची चौकस चौकडी कट्ट्यावर बसली होती. कोणत्या तरी कारणावरून जोरजोरात वाद चालला होता. नाना गुपचूप त्यांच्या पाठी जाऊन उभे राहिले. 
‘थापा नको मारूस, गोट्या,’ चिंगी म्हणाली. 
‘थापा नाहीत, पेपरात बातमी आली होती. त्याच्या सोबत तो फोटोही होता,’ गोट्या म्हणाला. 
‘पेपरमधलं काही सगळंच खरं नसतं. त्याच्यावर कसा विश्‍वास ठेवायचा?’ आता मिंटीही सरसावली. 
‘अगं पण सगळ्याच पेपरमध्ये आली होती बातमी. झालंच तर टीव्हीवरच्या बातम्यांमध्येही दाखवलं होतं,’ गोट्या हिरीरीनं सांगत होता. 
‘अरे, पण कसं शक्‍य आहे?’ चंदूला प्रश्‍न पडला. 
‘का शक्‍य नाही?’ गोट्याला कळेना. 
‘कारण ब्लॅक होल म्हणजे कृष्णविवर हे अतिशय जबरदस्त गुरुत्वाकर्षणाची ओढ असलेलं अंतराळातलं आश्‍चर्यच आहे,’ बंडू म्हणाला. 

‘तर काय! इतकी जबरदस्त ओढ की प्रकाशकिरणही त्याच्या तावडीतून सुटत नाहीत आणि प्रकाशच नसला तर मग त्याचं छायाचित्र कसं घेणार? मला तू दिसतोस कारण सूर्याचा प्रकाश तुझ्यावर पडतो, ते किरण तुझ्याकडून परावर्तित होतात आणि माझ्या डोळ्यात शिरतात. म्हणून मी तुला बघू शकते. आता कृष्णविवरातून प्रकाशच बाहेर पडत नाही म्हणून ते दिसतच नाही,’ चिंगी म्हणाली. 

‘कॅमेराही आपल्या डोळ्यासारखंच काम करतो. त्यामुळं त्यालाही ते दिसणार नाही. त्याचा फोटा घेणं तर दूरच राहिलं,’ मिंटीनं दुजोरा दिला. 
‘पण आता तूच म्हणालीस ना, की हा बंड्या तुला दिसतो कारण त्याचा स्वतःचा प्रकाश नसला तरी..’ गोट्यानं विचारलं. 
‘- त्याचा प्रकाश! उज्जेड!’ बंड्याची खिल्ली उडवत चंदू म्हणाला. 

‘- तरी सूर्याचा प्रकाश त्याच्यावर पडतो आणि परावर्तित होतो, म्हणून तो दिसतो. त्याचा फोटो काढता येतो. तसा सूर्याचा प्रकाश त्या कृष्णविवरावर पडत असेल आणि...’ गोट्या म्हणाला. 

‘आपल्या सूर्याचा प्रकाश?’ आता चंदूनं शंका काढली. 
‘आपल्या नाही. पण त्या कृष्णविवराच्या जवळ कोणता तरी सूर्य, कोणता तरी तारा असेलच की,’ गोट्या म्हणाला. 

‘असणारच. पण त्याचा प्रकाश जरी त्या कृष्णविवरावर पडला तरी तोही ते विवर गिळूनच टाकेल ना. तो परावर्तित होणारच नाही. मग फोटो कसा काढणार?’ चिंगीला प्रश्‍न पडला. 
क्षणभर सगळेच गप्प झाले. 

‘पण चिंगी, रात्रीच्या अंधारातही आपल्याला काही दिसत नाही. तरीही त्या ‘उरी’ चित्रपटात दाखवलं होतं, की आपल्या सैनिकांना बरोबर दिसत होतं. म्हणून तर ते शत्रूच्या छावणीपर्यंत पोचू शकले. तिथल्या लोकांना पाहू शकले. ते कसं?’ गोट्यानं प्रतिप्रश्‍न केला. 
‘हो रे हो. शिवाय सगळं कसं हिरवं हिरवं दिसत होतं,’ मिंटी म्हणाली. 
‘बरोबर. नानांनाच विचारायला हवं. चला...’ बंडू म्हणाला. 

‘काही कुठं जायची गरज नाही,’ नाना पुढं होत म्हणाले. ‘इथंच उभा आहे मी. मघापासून तुमचं बोलणं ऐकतोय. चांगली माहिती मिळवलीय तुम्ही कृष्णविवरासंबंधी. तर आता पहिल्यांदा रात्री दिसतं कसं! तर रात्र म्हणजे अगदी काळाकुट्ट अंधार नसतो काही त्या कृष्णविवरासारखा. अतिशय मंद, मिणमिणता का होईना प्रकाश असतो. आपले डोळे तो पकडू शकत नाहीत. पण त्यासाठी इलेक्‍ट्रॉनिक डोळा बनवला, की तो तेवढा प्रकाशही पकडतो. नुसता पकडतच नाही तर तो वाढवतो.’ 

े‘म्हणजे आपण एखादा लहानसा फोटो मोठा करतो. एन्लार्ज करतो तसा?’ चिंगीनं विचारलं. 
‘तसंच म्हणेनास. पण त्याला फोटोमल्टिप्लिकेशन म्हणतात,’ नानांनी माहिती दिली. 
‘म्हणजे प्रकाशाचा गुणाकार,’ गोट्या म्हणाला. 
‘वा! चांगली कल्पना लढवलीस. त्यामुळं मग समोरची वस्तू अंधुक अंधुक दिसण्याऐवजी स्पष्ट दिसू लागते,’ नानांनी स्पष्ट केलं. 
‘पण ती हिरवी का दिसते? रात्रीच्या वेळी तिच्याकडून काय फक्त हिरव्या रंगाचा प्रकाशच फेकला जातो?’ चंदूनं विचारलं. 

‘नाही, दिवसासारखे सर्वच रंगांचे प्रकाशकिरण त्या वस्तूकडून उत्सर्जित होतात. पण तो इलेक्‍ट्रॉनिक डोळा जेव्हा तो अंधुक प्रकाशकिरण पकडतो तेव्हा त्याच्याकडून त्या सर्वांचं हिरव्या प्रकाशात रूपांतर होतं,’ नानांनी माहिती दिली. 

‘म्हणजे मग त्या कृष्णविवराकडूनही असाच अंधुक प्रकाश बाहेर पडत असेल आणि तो पकडून, वाढवून त्याचा फोटो घेतला असणार,’ गोट्या म्हणाला. 
‘नाही, नाही. त्यासाठी वेगळीच युक्ती वापरली गेली. पण ते नंतर कधी तरी सांगेन. आता मला गेलं पाहिजे,’ नाना म्हणाले. 

सर्वांना किती तरी प्रश्‍न विचारायचे होते. पण नाना निघून गेले होते.

संबंधित बातम्या