सुगावा लागला 

डॉ. बाळ फोंडके
सोमवार, 20 मे 2019

कुतूहल
 

नाना परत येण्याची वाटच पाहत सगळे अजूनही कट्ट्यावर बसले होते. त्यांचं आपापसातलं बोलणंही चालूच होतं. 
‘ते फोटोचं राहूदे. मला तर वेगळीच शंका आहे. कृष्णविवरातून प्रकाशकिरणही बाहेर पडत नाहीत. म्हणून ते आपल्याला दिसत नाही. तर मग ते तिथं, कुठंही आहे, हे समजतंच कसं?’ चंदूनं शंका काढली. 

‘भूतासारखं..’ बंड्या म्हणाला, ‘भूत कुठं आपल्याला दिसतं? पण ते आहे असं सगळेच सांगतात.’ 
‘सगळेच नाही. भूत वगैरे काही नसतंच. तेव्हा ते दिसण्याबिसण्याचा प्रश्‍नच नाही,’ मिंटी म्हणाली. 

‘प्रश्‍नाला असे फाटे नका फोडू,’ संभाषण मूळपदावर आणत चिंगी म्हणाली. ‘एखाद्या ठिकाणी कृष्णविवर आहे हे समजतं कसं हेच विचारायचंय ना तुला, चंदू? पण त्यासाठी एखादी वस्तू आपल्याला दिसायलाच हवी असं नाही. परवा आपण बागेत गेलो होतो. अनेक पक्षी गात होते. आपण ऐकत होतो.’ 
‘पण ते काही आपल्याला दिसत नव्हते. बरोबर आहे तुझं चिंगी,’ मिंटी म्हणाली. 
‘त्याचं कारण ते अगदीच छोटे छोटे होते. सुळ्ळकन इकडून तिकडं जाताना आपल्याला दिसत. पण तसे ते नीटसे दिसत नव्हते,’ गोट्या म्हणाला. 

‘असतील छोटे. पण ती कोकिळा, ती तर मोठी असते ना. किती मोठ्यानं कुहूकुहू म्हणत होती. ती तरी कुठं दिसली? आपण किती प्रयत्न केले तरी नाही म्हणजे शेवटपर्यंत नजरेला पडलीच नाही, मिंटी म्हणाली. 

‘तुम्ही दगड मारू दिला नाहीत म्हणून. नाही तर मी तिला तिच्या लपण्याच्या जागेतून बाहेर काढून तुम्हाला दाखवली असती,’ गोट्यानं तक्रार केली. 
‘दगडाचं सोडा. मला असं म्हणायचं होतं, की ती कोकिळा दिसत नव्हती तरी ती तिथं आहे हे आपल्याला समजत होतंच ना. ती तिथं आहे असं आपण शपथेवर सांगितलं असतंच ना,’ मिंटी म्हणाली. 

‘ते कृष्णविवरही काय कोकिळेसारखं कुहूकुहू ओरडत असतं का? आपण तिथं आहोत असं ओरडून सांगतं का?’ चंदूनं विचारलं. 
‘अरे ओरडायलाच हवं असं नाही. एखाद्या वस्तूच्या असण्यामुळं आसपासच्या परिसरावर काही परिणाम होत असेल तर त्यातून ती वस्तू तिथं असल्याचं कळतं,’ चिंगी म्हणाली. 

‘हो गं हो,’ तिला दुजोरा देत चंदू म्हणाला, ‘परवा त्या मोठ्या रस्त्यावरच्या बिल्डिंगला आग लागली होती. ती काही दिसत नव्हती इथून. पण तिच्यातून निघणारा धूर इथूनही दिसत होता.’ 

‘तर काय! आणि ती एवढी भयंकर होती की तिच्यापासून दूर असलेला भागातही गरमी जाणवत होती,’ बंड्या म्हणाला. 

‘म्हणजेच तिचा प्रभाव आसपासच्या परिसरावर पडला होता. त्यातून ती तिथं असल्याचं समजत होतं. तसंच या कृष्णविवराच्या जबरदस्त गुरुत्वाकर्षणापायी आसपासच्या प्रदेशावर काही परिणाम होत असेलच की! त्यातून मग ते तिथं असल्याचं समजत असेल,’ मिंटी म्हणाली. 

नाना त्यांच्या पाठी येऊन त्यांचं बोलणं ऐकत उभे राहिले होते, याचा चौकडीला पत्ताच नव्हता इतके ते आपल्याच चर्चेमध्ये गुंग होऊन गेले होते. नानांना त्यांच्या बोलण्याचं कौतुक वाटलं. या पोरांनी नुसतीच माहिती गोळा केलेली नाहीय इंटरनेटवरून; तर त्याचा स्वतंत्र विचारही ती करताहेत. भले त्यांची त्यात काही चूक होत असेल तरी हरकत नाही. नुसतीच पोपटपंची करण्यापेक्षा असा वेगळा विचार करणंच महत्त्वाचं असतं. आता मात्र ते पुढं झाले... 

‘बरोबरच आहे मिंटीचं म्हणणं. अशा कृष्णविवराच्या गुरुत्वाकर्षणाचा प्रभाव परिसरावर पडतच असतो. जसजसं आपण त्याच्यापासून दूर जातो तसतसा हा प्रभाव कमकुवत होत जातो. तरीही मुळातच ते इतकं लय भारी असतं की त्याची ओढ जाणवतेच.’ 

‘अय्या! नाना तुम्ही आमची भाषा बोलायला लागलात की. लय भारी म्हणालात...’ चिंगीला गंमत वाटली. 

‘तुमचा प्रभाव तुमच्याजवळ असणाऱ्या माझ्यावर पडणारच की!’ हसतहसत नानांनी तिला दाद दिली. ‘तर या कृष्णविवराजवळून एखादा तारा जाऊ लागला, की तो त्याच्याकडं खेचला जातो. त्याच्या प्रवासाची दिशा बदलते. त्याचा वेगही एकदम वाढतो. तो थोडाफार भेलकांडल्यासारखा होतो. त्याला कोण ओढतंय हे तर दिसत नाही. पण त्या ताऱ्याच्या प्रवासात होत असलेला बदल दिसतो. त्याच्यावरून तिथं कृष्णविवर असावं असा तर्क करता येतो. इतरही काही परिणाम त्या परिसरावर पडतात. त्यातूनच मग त्या अदृश्‍य कृष्णविवराचा सुगावा लागतो. आता समजलं बच्चमजी?’

संबंधित बातम्या