नेपच्यूनचा शोध 

डॉ. बाळ फोंडके
सोमवार, 27 मे 2019

कुतूहल
 

‘अरे, त्या नेपच्यून या ग्रहाच्या शोधाचीही अशीच विलक्षण कूळकथा आहे. झालं काय की १७८१ मध्ये युरेनस हा ग्रह विल्यम हर्शेल या खगोलशास्त्रज्ञाला दिसला होता. त्याची फिरण्याची कक्षा काय असावी, त्याचा वेग काय असावा, सूर्याभोवतीची एक प्रदक्षिणा तो किती वेळात पूर्ण करतो, त्याची कक्षा वर्तुळाकार आहे की लंबवर्तुळाकार आहे, याचं गणित केलं गेलं होतं,’ नाना सांगत होते. 

‘ते कसं केलं?’ चिंगीचा प्रश्‍न. 

‘त्यासाठी न्यूटनच्या गतीच्या नियमांवर आधारलेले केप्लरचे ग्रहांच्या गतीचे नियम उपयोगी पडले. ते तंतोतंत लागू पडतात हे इतर सर्व ग्रहांच्या फिरण्याची जी निरीक्षणं केली होती त्यावरून सिद्ध झालं होतं. केप्लरच्या नियमाप्रमाणं भाकीत केलेलं त्यांचं परिभ्रमण आणि प्रत्यक्षातलं त्यांचं परिभ्रमण यांच्यात उत्तम मेळ साधला होता. तेव्हा युरेनसलाही ते लागू पडेल यात शंका नव्हती,’ नाना म्हणाले. 

‘लागू नाही पडलं?’ गोट्यानं विचारलं. 

‘नाही ना गोट्या. कारण शोध लागल्यापासून युरेनसनं सूर्याभोवतीची एक प्रदक्षिणाही पूर्ण केली होती. त्यामुळं प्रत्यक्षात तो कसा वागतो याची सर्व माहिती मिळाली होती. त्यातून मग गणिताप्रमाणं त्याचं फिरणं होत नाही हे लक्षात आलं. एकदा मोजलं, पण गणित आणि प्रत्यक्षातली स्थिती यांच्यात तफावत दिसली. परत केलं, परत तेच. अनेकवार केलं पण काही फरक पडला नाही. प्रत्येक वेळी गणित आणि प्रत्यक्षातलं नेपच्यूनचं फिरणं यात तफावतच दिसली,’ नानांनी सांगितलं. 

‘म्हणजे युरेनस या बंड्यासारखा आहे असंच म्हणायला हवं. तो केव्हा कसा वागेल याचा काहीच भरवसा देता येत नाही,’ चंदू म्हणाला. ‘मी सांगतो नाना,’ गोट्या म्हणाला, ‘ते गणितच चूक असणार. उगीचच बिचाऱ्या युरेनसला दोष देऊ नका.’ 

नाहीतरी गोट्याला गणित आवडतच नसे. त्याचं गणित नेहमीच चुकायचं. 

‘ते गणित काही तू केलं नव्हतंस गोट्या, चुकायला,’ मिंटी म्हणाली. 

‘नाही. गणित आपल्या जागी बरोबरच होतं. इतर ग्रहांना ते व्यवस्थित लागू पडत होतं. त्यांच्या प्रदक्षिणेची वाटचाल ते बरोबर ओळखत होतं. तरीही ते करताना काही राहून गेलंय की काय याचा विचार सुरू झाला. तेव्हा पॅरिसमधील ला व्हेरियर यानं असं सुचवलं, की या युरेनसच्याही पलीकडं एखादा असाच मोठा ग्रह असावा. त्याच्या गुरुत्वाकर्षणाचा प्रभाव युरेनसच्या फिरण्यावर पडत असणार. त्यामुळंच हा फरक पडत असणार,’ नाना म्हणाले. 

‘होता का असा ग्रह?’ बंडूनं विचारलं. 

‘नाही ना. म्हणजे तोपर्यंत तरी तसा ग्रह दिसला नव्हता. युरेनस हाच आपल्या सूर्याच्या कुटुंबातला शेवटचा ग्रह असंच समजलं जात होतं. पण असा एखादा ग्रह असावा अशी नुसतीच कल्पना मांडून ला व्हेरियन स्वस्थ बसला नव्हता. तर असा ग्रह नेमका कुठं असेल आणि तो किती मोठा असेल याचंही भाकीत त्यानं करून टाकलं. ते त्यावेळी अग्रगण्य मानल्या जाणाऱ्या इंग्लंडमधील शाही खगोलशास्त्रज्ञाला कळवलं,’ नानांनी माहिती दिली. 

‘आणि त्यानं या नवीन ग्रहाचा शोध लावला...’ चिंगी म्हणाली. 

‘नाही, ला व्हेरियर फ्रेंच होता. त्याच्याकडं काय लक्ष द्यायचं अशा विचारानं इंग्लिश खगोलशास्त्रज्ञानं काहीच हालचाल केली नाही. खरं तर ॲडॅम्स या इंग्रज शास्त्रज्ञानंही तसंच भाकीत केलं होतं. पण तो शाही खगोलशास्त्रज्ञापेक्षा खालच्या पदावर होता. म्हणून त्याच्याकडंही दुर्लक्ष झालं. तेव्हा परत हर्शेलनं उचल खाल्ली. वास्तविक त्यानं त्यापूर्वीच नेपच्यूनला पाहिलं होतं. पण तो ग्रह नसून तारा असावा असं त्याला वाटलं होतं. आता परत एकदा बारकाईनं नजर टाकून त्यानं नेपच्यून ग्रह असल्याचं सांगून टाकलं. नव्या ग्रहाचा शोध लागला,’ नाना म्हणाले. 

‘म्हणजे नाना तो दिसत नसतानाही तो तिथं असावा हे समजलं होतंच की!’ चिंगी म्हणाली. 

‘कसं बोललीस चिंगी! हेच तर सांगत होतो मी या कृष्णविवराबद्दल. ते आपल्या उघड्या डोळ्यांनी काय किंवा दुर्बीण लावूनही काय, दिसत नसलं तरी त्याच्या प्रचंड गुरुत्वाकर्षणाचा प्रभाव आसमंतावर पडत असल्यामुळं ते तिथं असल्याची कल्पना येते,’ नानांनी आपलं म्हणणं मांडलं. 

‘ते ठीक आहे. ते तिथं असल्याचं समजलं. पण त्याचा फोटो घ्यायचा तर त्याचा काही तरी प्रकाश पडायला नको का?’ चंदू म्हणाला. ‘पडेल, पडेल आणि तुझ्या डोक्‍यातही प्रकाश पडेल. जरा नानांना बोलू देशील तर ना!’ मिंटीनं चंदूला दटावलं.

संबंधित बातम्या