उंबरठ्यावरचा प्रकाश 

डॉ. बाळ फोंडके
मंगळवार, 11 जून 2019

कुतूहल
 

‘तु म्हाला लक्ष्मणरेषा माहिती आहे?’ नानांनी विचारलं.. 
कृष्णविवराची माहिती सांगता सांगता नाना एकदम रामायणात कुठं पोचले याचं सर्वांनाच आश्‍चर्य वाटलं. 
‘माहिती आहे ना. लक्ष्मणानं सीतेला एकटीलाच सोडताना ती आखून दिली होती,’ चिंगीनं सांगितलं. 
‘आणि ती न ओलांडण्याची सक्त ताकीदही दिली होती,’ चंदूनं पुष्टी जोडली. 
‘पण त्याचा या कृष्णविवराशी काय संबंध, नाना?’ सर्वांनीच कोरसमध्ये विचारलं. 

‘कारण या कृष्णविवराभोवतीही अशीच एक लक्ष्मणरेषा असते. म्हणजे कृष्णविवराचं सगळं वस्तुमान असतं ना, ते एकाच बिंदूभोवती केंद्रित झालेलं असतं. त्याच्या सभोवार एक वर्तुळाकार क्षेत्र निर्माण होतं. त्या वर्तुळाच्या परिघाच्या आत गुरुत्त्वाकर्षणाची ओढ जबरदस्त असते. त्याच्या तावडीतून काहीच सुटत नाही. अगदी प्रकाशकिरणसुद्धा,’ नानांनी माहिती दिली. 
‘तेच तर म्हणतो मी,’ गोट्या म्हणाला. ‘त्याचा फोटो काढलाच कसा?’ 

‘ही जी लक्ष्मणरेषा असते ना तिला ‘इव्हेंट होरायझन’ म्हणतात. जणू त्या कृष्णविवराचा उंबरठा. त्या उंबरठ्यापलीकडं काय दडलंय हे नाही सांगता यायचं. पण त्या उंबरठ्यावर मात्र अनेक घटना घडत असतात. तिथवर इतर कोणतीही वस्तू जाऊ शकते. जोवर तो उंबरठा ती ओलांडत नाही तोवर कृष्णविवराच्या पकडीतून ती सुटका करून घेऊ शकते. पण त्या उंबरठ्यावर झालेल्या झटापटीपायी त्या वस्तूची ऊर्जा काही प्रमाणात खेचली जाऊ शकते. त्यापैकी काहीचं प्रकाशात रूपांतर होतं,’ नाना म्हणाले. 
‘म्हणजे कृष्णविवराच्या गाभाऱ्यातून जरी प्रकाश बाहेर पडला नाही, तरी उंबरठ्यावरून मात्र प्रकाश बाहेर येऊ शकतो,’ मिंटीनं विचारलं. ‘बरोबर बोललीस मिंटी. त्याच प्रकाशाचा वापर करून हा फोटो घेतला गेला आहे. त्यातून स्पष्ट दिसतंय, की केंद्रबिंदू अगदी काळाकुट्ट आहे. गडद अंधारासारखा. पण ‘इव्हेंट होरायझन’वर मात्र केशरी रंगाच्या प्रकाशाचं वलय निर्माण झालं आहे,’ नानांनी सांगितलं. 

‘ते देवांच्या चित्रांमध्ये त्यांच्या मस्तकाभोवती दाखवतात तसं प्रकाशवलय, हॅलो,’ चिंगीनं विचारलं. 
‘तसं म्हणालीस तरी हरकत नाही. पण ते प्रकाशवलय नुसतंच एका रेषेनं दाखवतात. पण कृष्णविवराच्या उंबरठ्यावरचा हा प्रकाश विखुरलेला म्हणजे सिंहाच्या पिंजारलेल्या आयाळीसारखा दिसतो आहे,’ नाना म्हणाले. 

‘तरीही नाना मला एक शंका आहे,’ मिंटी म्हणाली. ‘त्या उंबरठ्यावरचा प्रकाश बाहेर पडत असला तरी तो इतका प्रखर असेल का? कारण तिथंही गुरुत्त्वाकर्षण काही अगदीच लेचंपेचं नसेल.’ 
‘तुझी शंका रास्त आहे. नाहीच ते तसं लुळंपांगळं झालेलं! त्यामुळं हा उंबरठ्यावरचा प्रकाशही मिणमिणताच आहे. तो पकडण्यासाठी तशीच तयारी करावी लागली आहे,’ नानांनी माहिती दिली. 

‘म्हणजे आपण अंधारातली वस्तू पाहण्यासाठी करतो तशी? त्या मिणमिणत्या प्रकाशाला इलेक्‍ट्रॉनिक पद्धतीनं वाढवून?’ बंडूनं विचारलं. ‘पण त्यापूर्वी तो मिणमिणता प्रकाश गोळा करण्यासाठीही फार मेहनत घ्यावी लागली. कारण एकतर तो प्रकाश साधा नाही. तुम्हाला प्रकाश ठाऊक आहे ना?’ नानांनी मुलांना प्रश्‍न विचारला. 
‘हे काय विचारता नाना, तानापिहिनिपाजा, सात रंगांचा प्रकाश,’ मुलांनी उत्तर दिलं. 

‘आपल्या डोळ्यांना तेवढाच दिसतो. म्हणून त्याला व्हिजिबल लाईट, दृश्‍यप्रकाश म्हणतात. पण त्या पट्ट्याच्या दोन्ही बाजूला आणखी कितीतरी प्रकाशलहरी पसरलेल्या आहेत. जांभळ्याच्या पलीकडं जंबुपार म्हणजे अल्ट्राव्हायोलेट, त्याच्याही पलीकडं क्ष-किरण, गामा किरण. उलट तांबड्याच्या पलीकडं अवरक्त म्हणजे इन्फ्रारेड, रेडिओ लहरी वगैरे... ते किरण डोळ्यांना दिसत नसले, तरी रेडिओ दुर्बीण त्यांना पाहू शकते. आपल्या टीव्हीच्या डिशसारख्या; पण महाकाय डिशेसनी ही रेडिओ दुर्बीण बनलेली असते. पुण्याजवळ खोडदला अशी एक मोठी रेडिओदुर्बीण आहे. तरीही तो उंबरठ्यावरचा प्रकाश पकडायचा तर आख्ख्या मुंबईएवढी रेडिओदुर्बीण लागली असती,’ नाना म्हणाले. 
‘मग तशी बांधली?’ विस्फारलेल्या डोळ्यांनी चंदूनं विचारलं. 

‘ते शक्‍यच नव्हतं. म्हणून मग समांतर प्रक्रियेचा वापर केला. गुंतागुंतीचं गणित असलं की आपण काय करतो? पहिल्यांदा त्यातले कंस वेगळे सोडवतो. त्यांची उत्तरं मिळवून गणिताचे छोटे छोटे भाग करून ते स्वतंत्र सोडवतो आणि मग त्या सगळ्यांची एकत्र गाठ बांधून गणिताचं उत्तर मिळवतो. तसंच इथं तब्बल सहा मोठ्या रेडिओदुर्बिणींना कामाला लावून त्यांनी त्या रेडिओलहरी पकडून मिळवलेल्या माहितीचं संगणकाकडून एकत्रीकरण करून तो फोटो तयार केला गेला. आजवर आपल्यापासून तोंड लपवून बसलेल्या त्या कृष्णविवराला दर्शन देण्यास भाग पाडण्यात आलं,’ नानांनी उत्तर दिलं. 

परत एकदा गोट्याच्या अंगात संचारलं... ‘घुंघट उठाया आपने...’ असं काहीसं बडबडत तो नाचत नाचत बाहेर पडला. त्याच्या पाठोपाठ सगळी टोळीही बाहेर पडली...

संबंधित बातम्या