ढगांचा रंग 

डॉ. बाळ फोंडके
सोमवार, 17 जून 2019

कुतूहल
 

शाळा नुकत्याच सुरू झाल्या होत्या. अजून अभ्यासाचं फारसं दडपण नव्हतं. चिंगीची टोळी कट्ट्यावर जमली होती. नाना तिकडूनच बाजारात चालले होते. चौकडीला पाहताच थांबून त्यांनी विचारलं, 
‘काय, कसला विचार करताहात?’ 

‘आज पाऊस पडेल का याचाच विचार चाललाय, नाना.’ चिंगीनं उत्तर दिलं.  ‘म्हणजे शाळेला सुटी मिळेल असंच ना?’ मिस्कील हसत नानांनी विचारलं. ‘छ्या! सुटी कसली मिळतेय. त्यासाठी मुसळधार पाऊस झाला पाहिजे.’ गोट्या म्हणाला. 

‘हो ना! त्याची तर काहीच चिन्हं नाहीत. जेमतेम पडेल असंही वाटत नाहीय,’ आपल्या स्वरातली निराशा लपवण्याचा प्रयत्न न करता मिंटी म्हणाली. 
‘अरे वा! म्हणजे तुम्ही पावसाचा अंदाजही वर्तवायला लागलात की! कशावरून आज पाऊस पडणार नाही?’ नानांनी विचारलं. 
‘आकाशात एकही ढग दिसत नाहीय, नाना. मग पाऊस कसा पडेल?’ चंदू म्हणाला. 
‘ढग नाहीत? मला तर किती तरी दिसताहेत,’ नाना वर बघत म्हणाले. ‘ते कसले! ते तर नुसते पांढरेफटक आहेत,’ गोट्या उत्तरला. 
‘आणि पिंजलेल्या कापसासारखे भुरभुरणारे...’ बंड्यानंही पुस्ती जोडली. 

‘पाऊस यायचा तर ढग कसे काळेकुट्ट असले पाहिजेत. अंधारून यायला हवं. भर दुपारीही घरात लाइट लावायची गरज भासली पाहिजे,’ चिंगी म्हणाली. ‘पण नाना, पावसाचे ढग काळेच का असतात? आणि दाट?’ मिंटीनं विचारलं. 

‘सांगा ढग कसे बनतात?’ नानांनी उलट प्रश्‍न केलाय ‘ते तर आम्ही केव्हाच शिकलोय. सूर्याच्या उष्णतेमुळं समुद्राच्या पाण्याची वाफ होते. ती हवेत साचून राहते. हलकी असल्यानं ती वरवर जात राहते. तिथल्या थंड हवामानात वाफेचं पाण्याच्या थेंबांमध्ये किंवा बर्फाच्या, हिमाच्या, कणांमध्ये रूपांतर होतं. तिथं धुळीचे कण असतातच. त्यांना हे थेंब घट्ट कवटाळून बसतात. ढग तयार होतात,’ चिंगीनं सविस्तर सांगितलं.  ‘पण हे कण सूर्यप्रकाशातल्या सर्वच रंगांना सारखेच जिकडंतिकडं विखरून टाकतात. त्यामुळं ते पांढरे दिसतात. नुसतेच धुळीचे कण फक्त निळ्या रंगाचे प्रकाशकिरणच असे विखुरतात. त्यामुळं तर आकाश निळं दिसतं. पण हे ढग मात्र पांढरे दिसतात,’ नानांनी अधिक माहिती दिली. ‘पण मग ते काळे कसे पडतात?’ बंडूला प्रश्‍न पडला. ‘अरे त्यांच्याजवळ सनस्क्रीन लोशन नसतं ना, म्हणून मग सूर्यप्रकाशात ते काळवंडत असले पाहिजेत, या मिंटीसारखे,’ चंदूनं तेवढ्यात मिंटीची खोड काढली. त्या दोघांत आता भांडण सुरू होणार असं दिसताच नाना घाईघाईनं म्हणाले, 

‘कल्पनाशक्ती दांडगी आहे तुझी चंदू. पण तसं होत नाही. कारण पाण्याच्या थेंबांची संख्या वाढतच जाते. त्यात काही थेंब एकमेकांत मिसळून त्यांचं आकारमान वाढतं. साहजिकच ढगात त्यांची गर्दी होते. त्या दाटीवाटीमुळं सूर्यकिरणांना त्यांच्यामधून वाट काढत पुढं येणं जमत नाही. ते या थेंबांच्या पुंजक्‍यांवर किंवा हिमकणांवर आदळून इकडंतिकडं फेकले जातात. विखुरले जातात. सूर्यप्रकाशाचा काही अंशच आपल्यापर्यंत पोचतो. आता प्रकाशच नाही म्हटल्यावर ते काळेकाळेच दिसणार ना!’ नाना म्हणाले. ‘पण असे काळेकुट्ट ढग पाऊस पडण्याच्या थोडेच आधी दिसतात. ते दिसले की आता पाऊस पडायला सुरुवात होणार याची खात्री पटते. तोवर ते करडेच दिसतात,’ गोट्या म्हणाला. 

‘वा गोट्या! चांगलं आहे तुझं निरीक्षण. त्याचं कारण या दाट ढगांचा आकारही अवाढव्य झालेला असतो. तो आकाशात उंचच उंच जातो. जमिनीवरून ते पाहणाऱ्या आपल्याला त्यांचा तळच दिसतो. या तळापर्यंत थोडाच सूर्यप्रकाश पोचतो. त्यामुळं त्यांनी तो विखुरला तरी आपल्या डोळ्यांपर्यत तो मंद प्रकाशच पोचतो. म्हणूनच आपल्याला ते करडे आणि धूसर दिसतात. त्यांच्या वर उंचावरच्या बाजूला दाटीवाटीच असते. तिथवर भरपूर सूर्यप्रकाश पोचत असला तरी तो सर्वच विखुरला जातो. मग ते काळे काळेच दिसतात. जसजशी ही गर्दी वाढत जाते तसतसा तळाच्या भागातही ही गर्दी घुसते. मग तो भागही काळाकुट्ट दिसायला लागतो. तोवर ही थेंबांची गर्दी त्यांनाही असह्य व्हायला लागते. ते जड झालेले असतात. आता त्यांना तरंगत राहणं जमत नाही. मग ते पृथ्वीच्या गुरुत्त्वाकर्षणाच्या ओढीला तोंड देऊ शकत नाहीत. जमिनीकडं कोसळायला लागतात. पावसाच्या धारा सुरू होतात...’ नानांनी सांगितलं.  ‘आताही त्या सुरू होणारसं दिसतंय. ते पाहा काळे ढग वर जमायला लागलेत...’ चिंगी म्हणाली. 

‘चला घरी पळा. इथं भिजत राहिलात तर ओरडा खावा लागेल...’ स्वतःही घराकडं वळत नानांनी सगळ्यांना पिटाळलं. 

संबंधित बातम्या