पावसाचा वास 

डॉ. बाळ फोंडके
सोमवार, 24 जून 2019

कुतूहल
 

भयानक उकाडा होत होता. अंगातून घामाच्या धारा वाहत होत्या. वारा साफ पडला होता. आकाश झाकोळून आलं होतं. पावसाची चिन्हं होती, पण पाऊस अजून पडत नव्हता. चिंगीची चौकडी कट्ट्यावर बसून होती. उघड्यावर असूनही ती घामानं भिजली होती. नानाही जरा मोकळी हवा मिळावी म्हणून त्यांच्याजवळ आले. 

‘काय मंडळी, काय चाललंय? आज असे गप्प गप्प का?’ त्यांनी विचारलं. 
‘हा उकाडा असह्य होत चाललाय. काही सुचतच नाही नाना,’ चिंगीनं सर्वांच्याच मनातली भावना बोलून दाखवली. ‘केव्हा येणार हा पाऊस?’ 
‘येईल उद्यापर्यंत. टीव्हीवरचा हवामानाचा अंदाज नाही का पाहिलास!’ नानांनी तिलाच विचारलं. 

‘पाहिला ना,’ गोट्या म्हणाला, ‘पण उद्यापर्यंत वाट पाहावी लागणार हे ऐकून जास्तच उकडायला लागलं.’ 
‘.. आणि हा अंदाज तरी खरा ठरेल कशावरून?’ चंदूनं शंका काढलीच. 

‘आजकाल हवामानखात्याचे अंदाज चांगलेच अचूक निघतात, चंदू. ते फणी वादळ आलं होतं, त्यावेळी हवामानखात्यानं बरोबर अंदाज वर्तवला म्हणून तर वेळेवर काळजी घेऊन कित्येक लाख लोकांना वाचवलं गेलं. हं, आता हा मॉन्सून मोठा लहरी असल्यामुळं त्याच्या वागणुकीचं भाकीत करणं जास्त कठीण असतं. तरीही आता अनेक उपकरणांची मदत मिळते. शिवाय उपग्रहावरूनही नेमकी चित्रं मिळतात,’ नानांनी माहिती पुरवली. 

‘पण नाना नुकताच माझा गावाकडला मामा येऊन गेला. तो काही फारसा शिकलेला नाही. पण तो सांगत होता, की त्याला पावसाचा चांगलाच वास येतो आणि त्यामुळं तो पाऊस केव्हा पडणार हे तो अचूक सांगू शकतो,’ बंड्या म्हणाला. 

‘तू नेहमीप्रमाणं गोंधळ घातलायस बंड्या...’ त्याला मध्येच अडवत मिंटी म्हणाली. ‘पाऊस पडून गेला की मातीचा वास सुटतो. विंदा करंदीकरांची कविता आहे बघ मृद्‌गंध. आपण वाचली होती सगळ्यांनी मिळून. पण तो पाऊस पडून गेल्यावर. पाऊस येण्याआधीच कसा वास येईल! तुझ्या मामानं तुझाच मामा केलाय चांगला.’ 

‘नाही मिंटी, बंड्यानं ऐकलं आणि त्याच्या मामानं सांगितलं ते बरोबरच आहे. पाऊस येत असला की वातावरणात जे काही बदल होत असतात त्याचा परिणाम म्हणून काही वेळा असे वास वातावरण भरून टाकतात. रानावनात, शेतात वावरणाऱ्या बंड्याच्या मामांसारख्यांना असे वास घेण्याची सवयच लागलेली असते. त्यांना त्याची जाणीव चटकन होऊ शकते,’ नानांनी सांगितलं. 

‘कुत्र्याला अनेक गोष्टींचे, अगदी माणसांचेही वास ओळखता येतात. पण मामांनाही कुत्र्यासारखं..’ चंदूला शंका आली. 
‘नाही चंदू. त्यांना कमी लेखू नकोस. पाऊस येत असला की सर्वच वस्तूंचा अंगभूत वास अधिक तीव्र होतो. आजूबाजूच्या झाडाझुडपांच्या पानांमध्ये, फुलांमध्ये, खोडांमध्ये हवेत सहज उडून जाऊ शकणारी अनेक रसायनं असतात. त्यांचे रेणू सतत हवेत उडतच राहतात. हेच रेणू मग हवेतून विहरत येत आपल्या नाकपुड्यांमधल्या त्या वासांना दाद देणाऱ्या पेशींशी भिडतात. त्यामुळंच आपल्याला तो वास घेता येतो,’ नानांनी सविस्तर सांगितलं. 

‘पण हे तर नेहमीच होत असलं पाहिजे. त्यासाठी पाऊसच कशाला यायला पाहिजे?’ चिंगीनं विचारलं. 

‘बरोबर आहे तुझं चिंगी, पण त्यावेळी हे वास मंद असतात. सगळ्यांनाच त्यांची जाणीव होते असं नाही. पण पाऊस येऊ घातलेला असला, की जरा वादळाची चिन्हं असतात. अशा वेळी हवेचा दाब कमी होतो,’ नानांनी उत्तर दिलं. 

‘हो नाना, मी पाहिलंय टीव्हीवरच्या बातम्यांमध्ये. ते शास्त्रज्ञ सांगत असतात, की इकडं हवेचा कमी दाबाचा पट्टा तयार झालाय. त्यामुळं जोरदार पाऊस कोसळणार आहे,’ गोट्या म्हणाला. 

‘अरे वा.. चांगलंच लक्षात ठेवलंयस की तू गोट्या. तर हवेचा दाब कमी होतो तेव्हा हवा जमिनीवर किंवा झाडांच्या पानांवर जोराचा दाब देत नाही. साहजिकच मग त्यांच्यावरच्या रसायनांचे रेणू हवेत सहज उडू शकतात. जास्त प्रमाणात ते हवेत तरंगायला लागतात. त्यांचा दरवळ अधिक तीव्र होतो. त्यांचा सुगंध अधिक जोमदार झाल्याचं आपल्याला जाणवतं,’ नाना म्हणाले. 
‘पाऊस यायची चिन्हं असली की वाराही जोरानं वाहायला लागतो. त्यामुळं तर हे रेणू उडून जायला हवेत,’ मिंटीनं विचारलं. 

‘अगदी बरोबर, तेही होतं. त्यामुळं होतं काय तर हे रेणू त्या झाडांच्या आसपासच न राहता आसमंतात दूरवर पसरतात. सगळीकडं तो वास पसरतो. बंड्याच्या मामांसारख्यांना त्याचा बरोबर सुगावा लागतो आणि ते पाऊस येत असल्याची वर्दी देऊ शकतात,’ नानांनी सांगितलं. 

‘त्यांची नेमणूक हवामानखात्यातच करायला हवी. म्हणजे त्यांचेही अंदाज अधिक बरोबर येतील,’ चंदू म्हणाला. 
चंदूच्या कल्पनाशक्तीला दाद देत नाना खो खो हसत सुटले.

संबंधित बातम्या