अंगे भिजली... 

डॉ. बाळ फोंडके
सोमवार, 8 जुलै 2019

कुतूहल
 

घराबाहेर पडल्यावर एकदम पाऊस पडायला लागला म्हणून नाना आडोशाला थांबले होते. निघतानाच छत्री घ्यायला हवी होती, हे ते स्वतःलाच सांगत होते. इतक्‍यात चिंगीची चौकसचौकडीही धावत धावतच त्यांच्या जवळ आली. काही अंतरावरूनच ते आले असावेत हे उघड होतं. कारण प्रत्येकजण थोडाफार भिजला होता. चंदू मात्र त्यांच्यामध्ये नव्हता. तो कुठं आहे हे नाना विचारणार, तो चंदू चालतच आला. तोही भिजला होता. इतरांपेक्षा तो जरा जास्त भिजला होता. 

‘पाहिलंस मिंटी, याला चांगलं सांगत होते आपल्याबरोबर धावायला तर यानं चालतच यायचं ठरवलं. आता घ्या..’ चिंगी म्हणाली. 
‘नाही तर काय! बघ कसा भिजलाय...’ मिंटी म्हणाली. 

‘.. आणि वर सांगतो कसा, की धावलं काय किंवा चाललं काय सारखंच भिजायला होतं,’ बंडू म्हणाला. 
‘सारखंच कसं असेल? धावलं की तेवढंच अंतर पार करायला कमी वेळ लागणार,’ गोट्या म्हणाला. 

‘हो ना, म्हणजे पावसात तुम्ही कमी वेळ असणार. म्हणजेच कमी भिजणार, हो ना नाना?’ चिंगीनं नानांचीच साक्ष काढली. 
चंदू काहीही न बोलता इतरांचं बोलणं ऐकत होता. आपल्यावर होत असलेल्या टीकेनं तो तसा नाराज झाला होताच. पण असंच इतरांना बोलू दिलं तर मात्र त्याच्या डोळ्यातूनच पाऊस पडायला लागेल असं दिसताच नानाच म्हणाले, 

‘अरे या प्रश्‍नाचं उत्तर देण्यासाठी चक्क हार्वर्ड विद्यापीठातल्या डेव्हिड बेल यांनी गणितच केलं होतं. त्यांनीच सांगितलंय, की माणूस भिजतो कारण त्याच्या अंगावर किंवा डोक्‍यावर पावसाचे थेंब पडतात.’ 
‘हात्तिच्या! हे सांगायला गणित कशाला करायला हवं! हे तर मीही सांगितलं असतं,’ गोट्या म्हणाला. 

‘अरे ही तर सुरुवात होती. गणित तर पुढचं आहे. त्यांनी त्यासाठी ज्या जागेतून तू जाणार ती कुठं आहे, तिथं वारा आहे की नाही, असल्यास तो कोणत्या दिशेनं वाहतोय, तो तुझ्या पाठीवर आहे की समोरून येतोय, पावसाच्या धारा सरळ वरून पडताहेत की वाऱ्याच्या सपाट्यापायी तिरक्‍या झालेल्या आहेत, पावसाच्या पडण्याचा वेग किती आहे या सर्व घटकांचा गणितात समावेश केला होता,’ नानांनी समजावून सांगितलं. 
‘बापरे! साध्या पावसाच्या भिजण्यात एवढी सारी गुंतागुंत?’ बंडू म्हणाला. 

‘संशोधन करायचं तर असा सगळ्या गोष्टींचा विचार करावा लागतो. माझा पंकजदादाच सांगत होता. तुला तर साधं गळक्‍या हौदाचं गणित नाही करता येत...’ मिंटी म्हणाली. 
‘तर या बेलना गणिताच्या उत्तरातून असं दिसलं, की समजा पाऊस एकाच वेगानं पडतो आहे. तर मग तू जिथं उभा आहेस आणि जिथं तुला पोचायचं आहे या दोन ठिकाणांच्या मधल्या जागेत असणारे पावसाचे एकूण थेंब ठराविकच असतील. तेवढ्या थेंबांना टक्कर देत तू तो पल्ला गाठणार आहेस. तर मग तू चाललास काय किंवा धावलास काय काहीच फरक पडणार नाही,’ नाना म्हणाले. 

‘तेच तर सांगत होतो मी. तेवढ्या थेंबांना टक्कर देतच मला जायचं होतं,’ आता चंदूला स्फुरण आलं. 
‘हो पण तू धावलास तर तुझ्या डोक्‍यावर पडणाऱ्या थेंबांची संख्या कमी असेल,’ नाना म्हणाले. 

‘तेच तर मी सांगत होते. आता बोल!’ चिंगी म्हणाली. 
‘हो पण चिंगे, तू धावताना वेगानं गेल्यामुळं तुझ्यापुढं असणाऱ्या थेंबांना दामटत पुढंपुढं जाशील. त्यामुळं ते थेंबही धसमुसळेपणानं तुझ्या अंगावर आदळतील. म्हणजेच तुझे कपडे जास्त भिजतील. नाही म्हणायला तुझ्या डोक्‍यावर कमी थेंब पडल्यानं ते थोडंफार कोरडं राहील.’ नानांनी सांगितलं. 

‘पण मग मी चालताना त्या थेंबांना दामटणार नाही ना,’ चिंगी म्हणाली. 
‘बरोबर, त्यामुळं तुझे कपडे कमी भिजतील, पण डोक्‍यावर जास्त थेंब पडतील. त्यामुळं डोकं चांगलंच भिजेल,’ नाना म्हणाले. 

‘हे हो काय नाना! एकदा या चंद्याच्या बाजूनं बोलता, एकदा आमच्या बाजूनं बोलता,’ मिंटीनं तक्रार केली. 

‘अगं पण हेच तर बेलनं सांगितलंय,’ हसतहसत नाना म्हणाले, ‘पाऊस सरळ एकाच वेगानं पडतोय की त्याला वाऱ्याचीही चांगलीच साथ आहे, तो बेभान होऊन तिरपातिरपा पडतोय की केवळ सरळ डोक्‍यावरच पडतोय, वारा तुझ्या पाठीमागून वाहतोय की समोरून तुला विरोध करतोय यावर चालत जाण्यानं जास्त भिजणार की धावण्यानं हे ठरतं. खरं पाहता तू किती वेगानं धावतेयस याला फारसं महत्त्व नाही. अगदी युसेन बोल्टच्या वेगानं धावलीस तरी फार फार तर दहा टक्केच कमी भिजशील. चला पाऊस थोडा थांबलाय, घरी जाऊन छत्री घेऊन येतो. न भिजण्याचा तोच खात्रीचा उपाय आहे.’

संबंधित बातम्या