मंगल तोरण नभोमंडपी!

डॉ. बाळ फोंडके
सोमवार, 15 जुलै 2019

कुतूहल
 

चिंगीची चौकस चौकडी नेहमीप्रमाणं कट्ट्यावर जमली होती. नुकतीच पावसाची चांगली सर येऊन गेली होती. वातावरणात सुखद गारवा होता. झाडांच्या पानांनी नवा हिरवा तजेला धारण केला होता. आकाशात मस्त इंद्रधनुष्य पसरलं होतं. तेच पाहण्यात सगळे दंग होऊन गेले होते. नव्हता तो बंड्या! थोड्याच वेळात तो धावत धावत आला आणि चौकडीच्या समोर उभा राहून विचारायला लागला, 

‘काय पाहताय एवढं?’ 
‘तू काय आंधळा झालायस का? एवढं छान इंद्रधनुष्य दिमाखात पसरलंय आणि तू विचारतोयस काय पाहतोय म्हणून?’ गोट्या त्याच्यावर ओरडलाच. 
आकाशात नजर लावून बंड्या म्हणाला, ‘कुठंय? मला तर दिसून नाही राहिलं?’ 
‘नाहीच दिसणार तुला. सूर्याकडं तोंड करून उभा राहिलायस. कसं दिसेल?’ चंदूनं झापलं. 

‘का? का नाही? खरं तर अधिक स्वच्छ दिसायला हवं,’ बंड्या आपला मुद्दा सोडायला तयार नव्हता. ‘नाही. इंद्रधनुष्य उगवण्यासाठी दोन गोष्टी असाव्या लागतात. एक म्हणजे आकाशात पाण्याचे थेंब असायला हवेत..’ चिंगी म्हणाली. ‘आता पाऊस पडून गेलाय म्हणजे ते असणारच..’ मिंटीनं पुस्ती जोडली. 
‘बरोबर. म्हणून तर पावसाळ्यातच इंद्रधनुष्य दिसतं. इतर वेळी नाही,’ गोट्यानं माहिती पुरवली. ‘आणि दुसरी गोष्ट?’ बंड्यानं विचारलं. 
‘सूर्याची किरणं या पाण्याच्या थेंबात जायला हवीत. प्रकाशाचा वेग...’ चिंगी सांगू लागली. 
‘.. सेकंदाला तीन लाख किलोमीटर,’ चिंगी सोडून बाकीचे सगळे एका सुरात ओरडले. ‘आणि तो कायम असतो. बदलत नाही.’ 
‘ते मात्र खरं नाही हं...’ इतका वेळ त्यांचं संभाषण शांतपणे ऐकत असलेले नाना म्हणाले. 
‘म्हणजे तो बदलतो?’ मुलांनी विचारलं. 

‘हो. फक्त निर्वात पोकळीत तो स्थिर राहतो. पण एका माध्यमातून दुसऱ्या माध्यमात जाताना तो बदलतो. अरे काचेतून जाताना तर तो चक्क दोन तृतीयांश होतो,’ नाना म्हणाले. 
‘एवढा?’ अचंब्यानं चंदूनं विचारलं. ‘पण मग तसं वाटत तर नाही!’ ‘कारण तरीही तो सेकंदाला दोन लाख किलोमीटर एवढा असतो. म्हणून जाणवत नाही. तर पाण्यातून जातानाही तो असाच बदलतो. आता सूर्यप्रकाश हा सात रंगांचा बनलेला आहे हे तर तुम्हाला माहिती आहेच,’ नानांनी विचारलं. ‘ता ना पि हि नि पा जा...’ कोरस परत ओरडला. 

‘खरं तर त्याहूनही कितीतरी अधिक रंग आहेत. पण आपल्याला दिसू शकणारे हे सात. त्या प्रत्येकाच्या वेगात थोडा वेगवेगळा बदल होतो. त्यामुळं एरवी एकत्र राहून पांढरा प्रकाश देणारे रंग एकमेकांपासून वेगवेगळे होतात. पाण्याच्या थेंबातून जाताना ते असे वेगळे होतात. थेंबाच्या आतल्या भागावर आपटून परत बाहेर पडून आपल्यापर्यंत पोचतात. त्यामुळं जर सूर्य आपल्या पाठीशी असेल तरच त्या रंगांनी बनलेलं हे इंद्रधनुष्य आपल्याला दिसेल. सूर्याकडं तोंड केलंत तर रंगांचा हा खेळ सगळा आपल्या पाठीच होईल,’ नाना म्हणाले. 
‘.. आणि तुझ्या पाठीला डोळे नाहीत. म्हणून तुला दिसणार नाही,’ मुलं चंदूला चिडवू लागले. 

चिंगी मात्र एकदम विचारात पडल्यासारखी झाली होती. तिच्या डोक्‍यात काहीतरी भन्नाट कल्पना आली असणार याची नानांना खात्री पटली. ‘नाना, आता आपण मंगळावर जात आहोत, तर तिथंही इंद्रधनुष्य दिसेल का?’ अपेक्षेप्रमाणं चिंगीचा प्रश्‍न आलाच. 
‘अगं, मघाशी तूच म्हणालीस ना, की इंद्रधनुष्य उगवण्यासाठी सूर्यप्रकाश हवा आणि हवेत पाण्याचे थेंब हवेत..’ नानांनी तिलाच प्रतिप्रश्‍न केला. 

‘मग?’ चिंगीला काही कळेना. 
‘मग काय? आपली ही धरती वगळता इतर कोणत्याही ग्रहावर असं द्रवरूप पाणी नाही. त्यामुळं तिथल्या हवेत पाण्याचे थेंब असण्याची शक्‍यता नाही. मग इंद्रधनुष्य कसं दिसेल?’ नानांनी तिलाच विचारलं. 

‘पण नाना..’ आता मिंटीही सरसावली. ‘आताच तुम्ही म्हणालात ना, की निरनिराळ्या पदार्थांमधून जाताना प्रकाशाचा वेग बदलतो. मग तिथं पाण्याचे नसले, पण इतर कशाचे तरी थेंब असेच तरंगत असतील तर?’ 
‘चांगला विचार केलायस. शनीचा एक चंद्र टायटन, त्याच्यावर द्रवरूप मिथेन आहे. त्याचा पाऊस तिथं पडत असावा. त्याचे थेंब तिथल्या आकाशात तरंगत असावेत. त्यामुळं तिथंही आपल्यासारखं इंद्रधनुष्य उगवायला हरकत नाही. फक्त ते पसरट असेल, कारण मिथेनमधला प्रकाशाच्या वेगातला बदल पाण्यातल्या बदलापेक्षा निराळा असतो,’ नानांनी माहिती दिली. 

‘तसं असेल तर मग आपली जी यानं तिथवर जातात त्यांच्याकडून त्या इंद्रधनुष्याचं छायाचित्र मिळायला हरकत नाही,’ चिंगी म्हणाली. 
‘गुड! ‘इस्रो’कडं विचारणा करून बघा,’ नाना म्हणाले. 
‘तेच करूया...’ म्हणत टोळी पळाली.

संबंधित बातम्या