चंद्राची प्रदक्षिणा 

डॉ. बाळ फोंडके
सोमवार, 22 जुलै 2019

कुतूहल
 

गेले चार दिवस सतत पाऊस कोसळत होता. आता त्यानं विश्रांती घेतली होती, तरी सारा आसमंत धुऊन स्वच्छ झाला होता. त्यात आज पौर्णिमा होती. चांदोबा पूर्ण दिमाखात झळकत होते. वातावरणात अजूनही थोडा गारवा होता. त्याचाच आनंद घेण्यासाठी नाना घराबाहेर पडले होते... पाहतात तो चिंगीची टोळी कट्ट्यावर जमली होती. 

‘काय रे मुलांनो, आज या वेळी इथं कसे?’ त्यांनी विचारलं. 
‘गेला आठवडा घरात बसून बसून वैतागलो होतो. आज मोकळं आहे तर बाहेर पडलोय...’ चंदू म्हणाला. 
‘शिवाय हा चंदामामाही मस्त दिसतोय. तो पाहायलाही मजा येतेय,’ मिंटी म्हणाली. 

‘नाना, या महिन्यातच आपण परत एकदा चंद्रावर आपलं अंतराळयान पाठवणार आहोत, खरं ना! पण एकदा तिथं जाऊन आलोय. परत कशाला जायचं?’ गोट्यानं शंका विचारली. 

‘शिवाय त्या नील आर्मस्ट्राँगनं तिथं ते वामनाचं पाऊल टाकलं त्यालाही या महिन्यात पन्नास वर्षं होताहेत. मधल्या काळात इतरही काहीजण तिथं जाऊन आले. त्यांनीही बरीच माहिती मिळवलीय. मग आता परत कशाला?’ चिंगीलाही प्रश्‍न पडला होता. 

‘सांग चिंगे, तू दरवर्षी कोकणात कशाला जातेस गं?’ नानांनी विचारलं. 
‘ती ना? आंबे खायला जाते. पक्की खादाड आहे,’ गोट्या तिला चिडवत म्हणाला. 
‘पण मला तिथला निसर्गही आवडतो,’ न चिडता चिंगी म्हणाली. 
‘तरीही तुला कोकणाबद्दल किती माहिती आहे मला सांग,’ नानांनी विचारलं. 

‘पण मी फक्त देवगडजवळच्या मामाच्या गावीच जाते. सगळ्या कोकणाची माहिती तिथून कशी मिळेल?’ चिंगीनं विचारलं. 
‘तेच चंद्राबद्दलही म्हणता येईल. तो आर्मस्ट्राँग आणि त्याचे भाईबंद चंद्राच्या एका लहानशा भागातच फिरून आले. तेही वरवर पाहणी करत. चंद्राविषयीची आपली माहिती तशी फारच अपुरी आहे. शिवाय चंद्राचा जवळजवळ चाळीस टक्के भाग आपण कधी पाहिलेलाच नाही,’ नानांनी माहिती दिली. 
‘काही तरी काय सांगताय नाना. तो बघा ना संपूर्ण चंद्र दिसतोय,’ बंड्यानं शंका काढली. 

‘पण तो त्याचा दिसणारा चेहरा आहे. मला सांग तू देवाला प्रदक्षिणा कशी घालतोस?’ नानांनी त्याला विचारलं. 
‘तो पक्का आळशी आहे. तो स्वतःभोवती एक गिरकी घेतो. झाली प्रदक्षिणा,’ गोट्या म्हणाला. 

‘तोही प्रदक्षिणा करण्याचा एक मार्ग आहे. पण तसं केल्यानं समोरच्या मूर्तीला या गोट्याच्या सर्व अंगाचं, सर्व बाजूंचं दर्शन घडतं. आता समज आळस झटकून तो प्रदक्षिणा घालायला निघाला. तर प्रथम त्याचं तोंड मूर्तीकडं असेल. तसंच पुढं जाता जाता त्याचा डावा खांदा मूर्तीच्या दिशेनं येईल. पुढं जाता त्याची पाठ त्या दिशेनं होईल आणि असं करत तो परत आपल्या जागी येईल, तेव्हा त्याचं तोंड परत मूर्तीकडं असेल. मूर्तीभोवतीही एक प्रदक्षिणा होईल आणि स्वतःभोवतीही एक. पण या प्रकारातही त्याचं सर्व अंग मूर्तीला दिसेल,’ नानांनी समजावलं. 

‘तेच म्हणतोय मी. परवाच आमच्या मॅडम सांगत होत्या, की चंद्र स्वतःभोवती गिरकी घ्यायला साधारण अठ्ठावीस दिवस घेतो आणि पृथ्वीभोवती प्रदक्षिणा घालायलाही अठ्ठावीस दिवस घेतो. म्हणजे मग त्याचा सर्व भाग पृथ्वीवरून दिसेलच ना!’ चिंगीनं विचारलं 

‘प्रदक्षिणेचा आणखी एक प्रकार आहे. समजा मी माझा चेहरा सतत मूर्तीकडं ठेवत तिच्याभोवती फिरत राहिलो, तरी पूर्ण प्रदक्षिणा घालून मी माझ्या मूळच्या जागी त्याच पवित्र्यात परत येईन, हो की नाही? तसं करता मी माझ्या भोवतीही एक गिरकी पूर्ण करेन, पण त्या प्रदक्षिणेत माझा चेहराच सतत मूर्तीच्या दिशेनं राहिल्यामुळं माझी पाठ दिसणारच नाही. चंद्राची प्रदक्षिणाही तशीच असते. पण तसं करताना त्याचा पाठीचा म्हणजेच पलीकडचा भाग थोडाफार नजरेला पडतो. म्हणून पन्नासऐवजी साठ टक्के भाग दिसतो. चाळीस टक्के भाग नेहमीच अदृश्‍य असतो. त्यालाच डार्क साइड ऑफ द मून म्हणतात,’ नानांनी सांगितलं. 

‘म्हणजे तो भाग नेहमी अंधारातच असतो?’ मिंटीनं विचारलं. 
‘नाही. त्या भागावरही सूर्यप्रकाश पडतोच आणि तो तेवढाच उजळूनही निघतो. पण तो आपल्याला दिसत नसल्यामुळं त्याला डार्क साइड म्हणतात. तो बघायचा, त्याच्याविषयी माहिती मिळवायची तर एखादं अंतराळयान त्या भागात उतरेल अशी व्यवस्था करायला हवी. तेच करायचा विचार चाललाय,’ नाना म्हणाले. 

‘म्हणजे हे दुसरं चंद्रयान तिथं उतरणार आहे?’ चंदूनं विचारलं. 
‘नाही. पण तिसरं, चौथं, पाचवं तिथं उतरवता येईल. अभी दिल्ली बहोत दूर है।’ नानांनी सांगितलं. 
‘दिल्ली नही नाना, चंदामामा...’ गोट्या म्हणाला. त्याला सगळ्यांनीच दुजोरा दिला.

संबंधित बातम्या