चंद्र दिसतो कसा? 

डॉ. बाळ फोंडके
सोमवार, 12 ऑगस्ट 2019

कुतूहल
 

‘चंद्राविषयी पुष्कळ माहिती आहे असं म्हणता ना तुम्ही,’ नानांनी विचारलं, ‘मग सांगा पाहू चंद्र दिसतो कसा?’ 
‘दिसतो कसा म्हणजे? त्याला स्वतःचा प्रकाश नाही हे माहितीय आम्हाला,’ गोट्या म्हणाला. 

‘तरीही तो दिसतो, कारण सूर्याचा त्याच्यावर पडलेला प्रकाश परावर्तित होतो आणि आपल्याला तो उजळून आलेला दिसतो. आपली पृथ्वीही अंतराळातून अशीच दिसते,’ चिंगीनं सविस्तर उत्तर दिलं. 
‘तसं नाही चिंगे, दिसतो कसा म्हणजे त्याचा आकार कसा दिसतो?’ नानांनी पुन्हा विचारलं. 

‘हॅत्तेच्या.. नाना आता एवढंही आम्हाला कळत नाही होय? तो काय समोर दिसतोच आहे ना! गोल गरगरीत,’ चंदू हेटाळणीच्या सुरात म्हणाला. 
‘नेहमीच असा दिसतो?’ नानांनी विचारलं. 

‘हं हं असं विचारताय होय.. नाही, नाही. त्याचा आकार दिवसेंदिवस बदलत जातो,’ बंडू म्हणाला. 
‘त्याच्या कला दिसतात. कारण सूर्य आणि चंद्र यांच्या एकमेकांशी असलेल्या कोनामुळं आपल्याला तो निरनिराळ्या कोनांमधून पाहायला मिळतो. त्यामुळं तो जसजसा आपल्या कक्षेत फिरत जातो, तसतसा त्याच्या दिसणाऱ्या भागात बदल होत जातो,’ मिंटी म्हणाली. 

‘बरोबर सांगितलंस मिंटी. पण हा जो बदल होत जातो ना तोही सगळीकडं सारखाच दिसत नाही,’ नानांनी माहिती दिली. 
‘सांगताय काय नाना, म्हणजे मुंबईला तो जसा दिसतो तसा दिल्लीला नाही दिसत?’ बंड्यानं आश्चर्यानं विचारलं. 

‘तसं नाही. पण उत्तर गोलार्धात तो जसा दिसतो तसा दक्षिण गोलार्धात दिसत नाही,’ नाना म्हणाले. 
‘असं कसं होईल? उत्तर गोलार्धात बेसिनमधलं उतरणारं पाणी ज्या दिशेनं गोलाकार फिरतं त्याच्या उलट दिशेनं दक्षिण गोलार्धात फिरतं असं वाचलंय मी,’ गोट्या म्हणाला. 

‘हो, आणि ऋतूचक्रही उलटं असतं. म्हणजे आपल्याकडे उन्हाळा असतो तेव्हा तिथं हिवाळा असतो.. आणि तिथं उन्हाळा असतो तेव्हा आपल्याकडं हिवाळा,’ नानांनी माहिती दिली. 
‘पण आता तुम्ही सांगताय नाना, की चंद्रही असा वेगवेगळा दिसतो. म्हणजे नेमकं काय होतं?’ चिंगीनं बुचकळ्यात पडून विचारलं. 

‘हो. कारण चंद्राच्या पृथ्वीभोवतीच्या प्रदक्षिणेची कक्षा आपल्या विषुववृत्ताच्या समांतर आहे. त्यामुळं आपण उत्तर गोलार्धातले रहिवासी चंद्राच्या डोक्यावरून त्याच्याकडं पाहतो असं म्हणानात. पण दक्षिण गोलार्धातली मंडळी त्याच्या पायाकडून त्याच्याकडं पाहतात. उत्तर गोलार्धात त्यामुळं तो जसा दिसतो त्याच्या उलट दक्षिण गोलार्धात दिसतो,’ नाना म्हणाले. 
‘पण तो तर गोल गरगरीत आहे. त्याच्या उलटा म्हणजेही गोलच दिसणार ना?’ मिंटीनं विचारलं. 

‘हो पण ते पौर्णिमेला. असं पहा अमावस्येपासून सुरुवात करूया. त्यानंतरच्या शुद्ध प्रतिपदेला त्याची इवलीशी कोर दिसते. बीजेची कोर तिच्यापेक्षा थोडी मोठी असते. ती वाढत वाढत जाते---’
‘----आणि शुद्ध अष्टमीला अर्धचंद्र दिसतो,’ कोरसमध्ये सर्वजण म्हणाले. 

‘बरोबर,’ हसत हसत नाना पुढं सांगू लागले, ‘त्यानंतरही त्याचा आकार वाढत जातो आणि पौर्णिमेला तो आतासारखा पूर्ण गोलाकार दिसतो. पण तिथंच तो थांबत नाही. आता वद्य पक्षाला सुरुवात होते आणि त्याचा आकार दिवसेंदिवस कमी व्हायला लागतो. परत वद्य अष्टमीला अर्धचंद्र दिसतो. राइट?’ 
‘एकदम राइट...’ कोरस म्हणाला. 

‘पुढंही त्याचा आकार कमी कमी होत अमावस्येला तो लुप्त होतो,’ नाना म्हणाले. 
‘म्हणजे तो असतो पण त्याच्याकडं पाहण्याच्या कोनामुळं तो आपल्याला दिसत नाही, खरं ना नाना?’ मुलांनी विचारलं. 

‘एकदम राइट...’ त्यांचीच नक्कल करत नाना म्हणाले. ‘पण शुद्ध अष्टमीला उत्तर गोलार्धात तो दिसतो तसा दक्षिण गोलार्धात दिसत नाही. म्हणजे उत्तर गोलार्धात तो इंग्रजी डी या अक्षरासारखा दिसतो. उजवीकडं फुगवटा आलेला. त्याच्या डावीकडचा अर्धा भाग आपल्याला म्हणजे उत्तर गोलार्धात राहणाऱ्यांना दिसत नाही,’ नाना म्हणाले. 
‘तर मग दक्षिण गोलार्धात राहणाऱ्यांना शुद्ध अष्टमीला तो त्याच्या उलटा----?’ चिंगीनं विचारलं. 

‘---- म्हणजे इंग्रजीतल्या सी या अक्षरासारखा दिसत असला पाहिजे, हो ना?’ मिंटीनं घाईघाईनं चिंगीचं वाक्य पूर्ण केलं. 
‘बरोबर... आणि वद्य अष्टमीला याच्या बरोबर उलटा प्रकार होतो. उत्तर गोलार्धात तो सी सारखा दिसतो तर दक्षिण गोलार्धात तो डी सारखा दिसतो. थोडक्यात काय, तर उत्तर गोलार्धात त्याचा अमावास्येपासून अमावास्येपर्यंतचा प्रवास डी ओ सी सारखा होतो तर दक्षिण गोलार्धात -----’ नाना म्हणाले. 

‘-----तो सी ओ डी सारखा होतो,’ नानांचं वाक्य पूर्ण करत कोरस म्हणाला आणि सगळे घराकडं धावत सुटले.

संबंधित बातम्या