भर उन्हात वृक्षाखाली! 

डॉ. बाळ फोंडके
सोमवार, 19 ऑगस्ट 2019

कुतूहल
 

पाऊस सुरू झाला होता खरा. पण जेव्हा तो मुसळधार कोसळे तेव्हाच हवेत गारवा जाणवत असे. तो थांबला, की परत अंगातून घामाच्या धारा वाहायला लागत. रात्रभर धो धो कोसळणारा पाऊस सकाळपासून थांबला होता. आता उन्हं चांगलीच वर आली होती. उकडहंडी झाली होती. चिंगीची टोळी अशीच घामानं चिंब होऊन वैतागली होती. 

कट्ट्यावर सगळे जमले. तिथं झाडाखाली बसल्यावर त्यांना जरासं थंड वाटायला लागलं. नानाही असेच जरा पाय मोकळे करण्यासाठी बाहेर पडले होते. चिंगीच्या गॅंगला पाहून ते थबकले. 

‘अरे आज तुम्ही असे मधेच इथं कसे? पावसानं शाळेला सुटी मिळाली की काय?’ नानांनी विचारलं. 
‘नाही नाना, पावसानं तुंबई झालीय खरी. पण आज रविवार. एरवीही शाळा बंदच होती,’ चिंगीनं सांगितलं. 

‘त्यात सकाळपासून पावसानंही दडी मारलीय. उकाड्यानं जीव हैराण झालाय. म्हणून इथं येऊन बसलो. पण नाना मला एक कळत नाही. तापमान सगळीकडं सारखंच असतं ना, मग इथं झाडाखाली गारवा का वाटतो?’ बंडूनं विचारलं. 
‘मला सांग झाडाखाली काय असतं?’ नानांनी विचारलं. 
‘काय म्हणजे? पालापाचोळा असतो,’ चंदू म्हणाला. 

‘वाटलंच मला तू असं काहीतरी बडबडणार म्हणून,’ त्याला फटकारत मिंटी म्हणाली. ‘अरे झाडाखाली सावली नसते का?’ 
‘बरोबर ओळखलंस मिंटी. सावलीतलं तापमान नेहमीच भर उन्हातल्या तापमानापेक्षा कमी असतं. कारण तिथल्या हवेला आणि जमिनीलाही कमी उष्णता मिळते. हवामान खातंही तापमानाचे आकडे जाहीर करतं ते सहसा ‘टेंपरेचर इन द शेड - सावलीतलं तापमान’ अशाच प्रकारचं असतं. म्हणून तर क्रिकेटचा सामना सुरू असताना तंबूतल्या तापमानापेक्षा मैदानावरचं तापमान नेहमीच जास्त असतं. आता विम्बल्डनचे सामने झाले ना त्यावेळीही खेळाडूंना भर मैदानातल्या तापमानाचाच सामना करावा लागत होता,’ नानांनी सांगितलं. 

‘तरीही असा कितीसा फरक पडणार आहे नाना तापमानात?’ चिंगीनं विचारलं. 
‘का? चांगला तीन-चार अंशांचा फरक पडतो काही वेळा. पण झाडाखाली गारवा जाणवण्याचं आणखीही एक कारण आहे. खरं तर तेच मुख्य आहे,’ नाना म्हणाले. 
‘झाडं काय एअरकंडिशनिंग करतात का?’ बंड्यानं चेष्टा करण्याच्या सूरात विचारलं. 

‘तसंच म्हणेनास. मात्र त्यांची पद्धत वेगळी असते. झाडांच्या पानांवर असलेल्या छिद्रातून सतत पाणी बाहेर पडत असतं. मुळाशी घातलेलं पाणी झाडांकडून शोषलं जातं, पण त्यातलं काही सतत या छिद्रांमधून बाहेर फेकलं जातं. याला ट्रान्सपिरेशन असं वैज्ञानिक म्हणतात,’ नानांनी माहिती दिली. 
‘ट्रान्सपिरेशन? म्हणजे घाम? आपल्याला येतो तसा?’ गोट्यानं विचारलं. 

‘नेहमीप्रमाणं तू गोंधळ घातलास बघ गोट्या,’ मिंटीनं आता त्यालाही फटकारलं. ‘घाम म्हणजे पर्स्पिरेशन. नाना ट्रान्सपिरेशन म्हणाले.’ 
‘बरोबर, तरीही त्याला झाडांचा घाम म्हणायला हरकत नाही. कारण ते पाण्याचे थेंब सूर्याची उष्णता शोषून घेतात आणि त्याची वाफ होते. बाष्पीभवन होतं. आजूबाजूची झुडुपं, गवत हीही असंच पाणी बाहेर फेकत असतात. त्यामुळं सूर्याच्या उष्णतेचा निचरा होऊन तापमान उतरतं. वातावरण थंड व्हायला लागतं. या कट्ट्यावरच्या एकट्या दुकट्या झाडापेक्षा बागेत गेलात, तर तुम्हाला याचा चांगलाच अनुभव येईल. कारण तिथं सगळीकडं हिरवाई असते. आजूबाजूचीच नाही, तर पानापानांमधली हवाही थंड व्हायला लागते. परिसरातल्या हवेपेक्षा तापमान कमी झालेलं असतं,’ नाना म्हणाले. 

‘पण मग थंडी वाजायला हवी. तशी तर काही वाजत नाही,’ मिंटी म्हणाली. 
‘हिवाळ्यात जा झाडांखाली मग वाजायला लागेल थंडी. त्यावेळी उलट उन्हाची उबच बरी वाटते,’ चिंगीनंच तिला परस्पर उत्तर दिलं. 

‘चांगलं सांगितलंस चिंगे. कारण गारवा असतो म्हणजे तापमान काही घसरत नाही एकदम. उघड्यावरच्या तापमानापेक्षा तीन-चार अंशच कमी असतं. उघड्यावर जर छत्तीस अंश असेल, तर झाडाखाली ते बत्तीस-तेहतीस असेल. पण शरीराला तेवढा फरकही जाणवतो आणि गार वाटतं. हिवाळ्यात जर बाहरेचं तापमानच पंधरा अंश असेल तर झाडाखाली ते बाराच होईल,’ नानांनी अधिक माहिती दिली. 

‘मग लागशील थंडीनं कुडकुडायला. जा शाल घेऊन ये जा,’ तिच्यावर बाजी उलटवत चंदू म्हणाला. 

मिंटी रडवेली झाली, पण नानांसकट सगळे खो खो हसायला लागले.

संबंधित बातम्या