पंखा फिरतो गरागरा

डॉ. बाळ फोंडके
सोमवार, 26 ऑगस्ट 2019

कुतूहल
 

‘पण नाना..’ हसणं आवरत चिंगी म्हणाली, ‘आपण पंख्याखाली बसलो तरीही आपल्याला गार वाटतं!’ 
‘हो ना, तिथं काही झाडं नसतात; पाणी बाहेर फेकून तापमान कमी करायला,’ गोट्यानंही दुजोरा दिला. 
‘..आणि मुख्य म्हणजे तापमान कमी होतच नाही. आम्ही मुद्दाम मोजून बघितलंय,’ मिंटी म्हणाली. ‘आमच्या सरांनी आम्हाला प्रयोग करून बघायला सांगितलं होतं. तेव्हा पंखा फुलवर चालू ठेवलेल्या खोलीतलं आणि पंखा बंद असलेल्या खोलीतलं, दोन्ही ठिकाणचं तापमान एकाच वेळी मोजलं आम्ही. दोन्हींमध्ये काहीही फरक नव्हता.’ 

‘तरीही पंखा असलेल्या खोलीत थंड वाटत होतं ना,’ चंदूनं विचारलं. 
‘वा... चांगलं निरीक्षण करताय तुम्ही आणि विचारही करताय. तुमचं बरोबर आहे. पंखा म्हणजे काही एअरकंडिशनर नसतो उष्णता बाहेर फेकून तापमान कमी करायला! तेव्हा पंख्यामुळं तापमानात फरक पडत नाही हे बरोबरच आहे. आता तरीही थंड वाटण्याचं कारण... मला सांगा, तापमान चढलं, उकाडा वाढायला लागला की काय होतं?’ 

‘घामाघूम व्हायला होतं. नुसत्या धारा लागतात घामाच्या. पुसता पुसता पुरेवाट होते...’ चिंगीनं सांगितलं. 
‘अगदी बरोबर. कारण आपलं शरीर त्याचं तापमान स्थिर राखण्याची धडपड करत असतं. शरीराच्या तापमानात असे चढउतार होत राहिले, तर ते आपल्या आरोग्यासाठी ठीक नसतं. त्यामुळं बाहेरचं तापमान चढलं काय किंवा उतरलं काय, शरीराकडं आपलं तापमान स्थिर राखण्याची यंत्रणा असते. घाम येतो तो त्यामुळेच. आपल्या शरीरावर सर्वत्र पसरलेली ही कातडी आहे ना तिचं कामच मुळी हे तापमान राखण्याचं आहे,’ नाना म्हणाले. 

‘म्हणजे त्या एअरकंडिशनरला कसा तो थर्मास असतो तसा?’ बंड्यानं विचारलं. 
‘थर्मास नाही रे, थर्मोस्टॅट म्हणतात त्याला...’ कपाळावर हात मारून घेत मिंटी म्हणाली. 

‘बरं, बरं, जादा हुशारी नको करूस. नानांना समजलंय मला काय म्हणायचंय ते,’ बंडू गुरकावला. 
‘हो बंड्या, तसंच म्हणेनास. त्यामुळं उष्णता वाढली की कातडीखाली असलेल्या रक्तवाहिन्या रुंदावतात. त्यांच्यामधून रक्तप्रवाह वाढीस लागतो आणि आपल्या स्वेदग्रंथी कामाला लागतात. त्या शरीरातून पाणी बाहेर टाकायला लागतात. घामाच्या रूपानं ते कातडीवर यायला लागतं. त्या घामाचं जे पाणी असतं ते मग हवेतली उष्णता खेचून घेत स्वतःचं वाफेत रूपांतर करतं. बाष्पीभवन होतं. त्यामुळं उष्णता कमी होत आपल्याला दिलासा मिळतो,’ नाना म्हणाले. 

‘हे जर सगळं शरीरच करतं, तर मग पंखा काय करतो?’ चंदूला प्रश्‍न पडला. 
‘तो हवेला हलवून ती कातडीवरून वेगानं वाहील याची व्यवस्था करतो. त्यामुळं घामाचं बाष्पीभवन होण्याच्या प्रक्रियेला वेग येतो. वेगानं उष्णतेचा निचरा व्हायला मदत होते. आता शरीराच्या जवळच्या हवेचं तापमान अशा रीतीनं कमी झाल्यामुळं घाम येणंही कमी होतं. गार वाटायला लागतं,’ नानांनी उत्तर दिलं. 

‘नाही नाही नाना, आताच तर तुम्ही म्हणालात की पंखा चालू ठेवल्यामुळं तापमान उतरत नाही. या मिंटीनं तर मोजूनही बघितलंय आणि आता तुम्ही म्हणताय की तापमान कमी होतं... खरं काय?’ गोट्यानं विचारलं. 

‘शाबास गोट्या, चांगलंच पकडलंस की मला शब्दात. तापमान कमी होतं असं मी म्हटलं ते कातडीच्या जवळ असलेल्या हवेच्या थरात. बाकीच्या तापमानात काहीच फरक पडत नाही. खरं तर ते बाष्पीभवन वेगानं होत राहिल्यामुळं आपल्याला शरीराच्या वाढलेल्या उष्णतेचा निचरा झाल्यासारखं वाटतं आणि त्यामुळंच उकाडा थोडा सुसह्य होतो,’ नाना उत्तरले. 

‘ही कातडी बाहेरचं तापमान एकदम घसरलं तरी आपलं तापमान स्थिर राखतेच ना!’ चंदू म्हणाला. 
‘हो ना चंदू. थंडीच्या दिवसात तापमान घसरलं, आपल्या शरीराच्या तापमानाखाली गेलं की मग कातडीखालच्या रक्तवाहिन्या आकुंचन पावतात. आता त्यातून वाहणारा रक्तप्रवाह मंदावतो. शरीरातली उष्णता तिथंच राखून ठेवत ती बाहेर पडणार नाही याची तजवीज करतो. ती तशीच राहिल्यामुळं मग शरीराचं तापमान राखून ठेवायला मदत होते,’ नाना म्हणाले. 

‘पण मग लोकरीचे कपडे कशाला घालतो आपण?’ बंडूला प्रश्‍न पडला. 
‘अरे, बाहेरचं तापमान आणि शरीराचं तापमान यात किती फरक आहे यावर ते कसं राखलं जाईल हे अवलंबून असतं. बाहेरचं तापमान जरा अधिकच घसरलं की आपण कुडकुडायला लागतो तेही या रक्तवाहिन्या जास्ती आकुंचित होतात म्हणून. पण तापमान आणखीच घसरलं तर मग शरीराची क्षमता संपते. लोकरीचे कपडे शरीराचं तापमान घसरू नये याची खबरदारी घेतात. कारण लोकरीची उष्णतावाहकता कमी आहे. त्यामुळं शरीराची उष्णता आतल्या आत राखून ठेवण्यात ते मदत करतात..’ नानांनी माहिती दिली. 

तेवढ्यात पावसाची जोरदार सर आली. त्याबरोबर सगळे घराकडे पळाले.

संबंधित बातम्या