नरमगरम 

डॉ. बाळ फोंडके
सोमवार, 2 सप्टेंबर 2019

कुतूहल
 

नाना कामासाठी बाहेर जाण्याच्या तयारीत होते तो चिंगीची टोळी येऊन धडकली. आता आपल्याला वेळेवर कामासाठी जाता येईल की नाही याची चिंता नानांना लागून राहिली... 

‘नाना हा चंदू बघा, नेहमीप्रमाणं काहीतरी विचित्रच सांगतो आहे...’ चिंगीनं तक्रारीच्या सुरात सांगितलं. 
‘वाटत असेल तुम्हाला विचित्र, पण तेच खरं आहे. माझ्या विनूदादानं सांगितलंय. तो सायंटिस्ट आहे,’ चंदूनं स्वतःचा बचाव केला. 

‘काय सांगितलंय तुझ्या विनूदादानं?’ नानांनी विचारलं. 
‘हेच की गरम पाणी थंड पाण्यापेक्षा लवकर गोठतं,’ चंदूनं उत्तर दिलं. 
‘थंड म्हणजे बर्फासारखं थंडगार? थापा मारू नकोस...’ मिंटीनंही आता त्याला छेडलं. 
‘तेवढं थंड नाही काही. पण नळाला येतं ना त्या तापमानाचं. विनूदादा त्याला रम की कायसं म्हणाला,’ चंदू म्हणाला. 

‘रूम टेम्परेचर असेल,’ नानांनी दुरुस्ती केली. 
‘हो नाना, तेच ते रूम टेम्परेचर,’ चंदू उत्तरला. 
‘म्हणजे आसपासचं सर्वसाधारण तापमान असतं ते,’ नानांनी माहिती दिली. 
‘तरीही गरम पाणी त्याच्यापेक्षा लवकर कसं गोठेल?’ गोट्यालाही प्रश्‍न पडला. 
‘तुझा विश्वास नाही ना बसत?’ चंदू वैतागला होता. 

‘कसा बसेल? कारण तापमानात बदल घडवून आणायला उष्णता द्यावी तरी लागते किंवा काढून तरी घ्यावी लागते. हो ना?’ चिंगी म्हणाली. 
‘बरोबर,’ नाना म्हणाले. 
‘.. आणि ती त्या पदार्थाच्या विशिष्ट उष्णतेवर, स्पेसिफिक हीटवर, तापमानातल्या फरकावर आणि पदार्थाच्या वजनावर अवलंबून असते. तर मग गरम पाणी आणि पाण्याचा गोठणबिंदू यातला फरक रुम टेम्परेचर आणि गोठण बिंदू याच्यातल्या फरकापेक्षा जास्त नाही का असणार? मग त्यासाठी कमी उष्णता कशी लागेल आणि ते लवकर कसं गोठेल, सांगा नाना,’ मिंटीनं हट्टच धरला. गोट्याही तिचीच री ओढत तिच्या आणि चिंगीच्या गटात सामील झाला. 

‘तुझं म्हणणं तसं खरं आहे मिंटी, पण पाणी निदान एका बाबतीत तरी विचित्र वागतं याचा प्रत्यय नाही का घेतलात तुम्ही?’ नानांनी विचारलं. 
‘विचित्र वागतं?’ मुलांचा कोरस. 

‘उष्णता मिळाली की पदार्थ प्रसरण पावतो, ती काढून घेतली की तो आकुंचन पावतो हा सर्वसाधारण नियम. पण पाण्याचं तापमान चार अंश सेल्सिअस झाल्यावर उष्णता काढून घेतली तरी ते प्रसरणच पावतं हे माहिती असेल तुम्हाला,’ नानांनी पुन्हा विचारलं. 
‘हो, अॅनॉमलस एक्स्पान्शन ऑफ वॉटर. पाण्याचं विचित्र प्रसरण. जय हो..’ चंदूला आता जोर चढला. 

‘तर मग पाण्यामध्ये आणखीही काही विचित्र गुणधर्म असण्याची शक्यता आहे हे तर मान्य करशील की नाही चिंगे?’ नानांनी असं पेचातच पकडल्यावर चिंगीला होकार देण्यावाचून गत्यंतरच उरलं नाही. तरीही तोंडानं काहीही न बोलता तिनं नुसतीच मान हलवली. 
पुढच्याच क्षणी मात्र परत उसळून ती म्हणाली, 

‘पण एकदा तसं वागलं म्हणजे नेहमीच तसं वागेल असंही नाही ना?’ 
‘हेही बरोबर आहे,’ नाना उत्तरले. 

इतका वेळ नाना आपल्या बाजूला आहेत असं वाटून हुरूप आलेल्या चंदूचा चेहरा आता पडला. 
‘हे बरोबर नाही, नाना,’ इतका वेळ गप्प बसलेला बंड्या म्हणाला. ‘चिंगीचंही बरोबर आणि चंदूचंही बरोबर. दोघंही कसे बरोबर असतील?’ 

‘तुझंही बरोबर,’ हसत हसत नाना म्हणाले. ‘पण असा नुसताच फुकाफुकी वाद हवाच कशाला? अशी दोन एकमेकांविरुद्धची मतं समोर आली, की वैज्ञानिक काय करतात? पडताळा घेण्यासाठी प्रयोग करतात. तर मग तुम्हीही प्रयोग करा आणि काय दिसतं ते पाहा.. मग बोलू. चंदू, तूही प्रयोग कर आणि चिंगी तूही प्रयोग कर.’ 
‘प्रयोग? कसला?’ कोरसनं विचारलं. 

‘हाच.. दोन एकसारखे ग्लासेस घ्या. एकामध्ये नळाचं पाणी थेट भरा. दुसऱ्यात थोडंसं तापवलेलं म्हणजे साधारण चाळीस अंश सेल्सिअस तापमान असलेलं पाणी भरा. दोन्हीमध्ये बरोबर तेवढंच पाणी असलं पाहिजे. आता दोन्ही ग्लास तुमच्या फ्रीजरमध्ये ठेवा आणि ते पाणी गोठायला किती वेळ लागतो ते पाहा. चला पळा, प्रयोगाची निरीक्षणं घेऊन उद्या या. मला आता कामाला गेलं पाहिजे...’ 

आणि उठून नाना बाहेर चालायलाही लागले...

Tags

संबंधित बातम्या