एम्पेम्बा इफेक्ट 

डॉ. बाळ फोंडके
बुधवार, 18 सप्टेंबर 2019

कुतूहल
 

चिंगीची टोळी बसूनच राहिली होती. नाना पुढं काय सांगतात ते ऐकायला उत्सुक होती... 

‘..तर हा टांझानियातला तुमच्यासारखाच बारा-तेरा वर्षांचा मुलगा, एरॅस्मो बार्थोलोम्यू एम्पेम्बा. तुम्हाला आता माहिती नाही, पण आमच्या लहानपणी आम्ही उन्हाळ्याच्या सुटीत घरीच आइस्क्रीम करत असू. त्यासाठी दूध, फळांचा रस, मलई वगैरेंचं मिश्रण अॅल्युमिनियमच्या भांड्यात घालून ते लाकडाच्या बादलीसारख्या भांड्यात ठेवलं जाई. या दोन भांड्यांच्या मधल्या जागेत बर्फ आणि खडे मीठ यांचं मिश्रण ठेवलं जाई,’ नाना माहिती देत होते. 

‘खडे मीठ? ते कशासाठी?’ चिंगीनं विचारलं. 

‘त्यामुळं त्या मिश्रणाचं तापमान आणखी कमी होतं. दुधाचं मिश्रण गोठून त्याचं आइस्क्रीम व्हायला मदत होते. तर हा एम्पेम्बा असंच आइस्क्रीम करायला शिकत होता. त्यावेळी त्याला याचा अनुभव आला. खरं तर त्याच्याबरोबरच्या इतरांनाही तो आला असणार. पण त्यांनी त्याकडं लक्ष दिलं नाही. एम्पेम्बानं दिलं. त्याची दखल घेतली. संशोधनाचा हा आणखी एक नियम. जे अनुभव येतात त्या सर्वांची प्रामाणिकपणे नोंद घ्यायची. अनेक महत्त्वाचे शोध अशा रीतीनंच लागलेले आहेत,’ नानांनी सांगितलं. 

‘म्हणजे एम्पेम्बानं हा शोध लावला?’ मिंटीनं विचारलं. 

‘तसंच आता म्हणायला हवं. वास्तविक अॅरिस्टॉटल, देकार्ते, फ्रान्सिस बेकन वगैरे दिग्गजांनीही त्याचा उल्लेख केलेला आहे. पण त्याकडंही इतरांनी फारसं लक्ष दिलं नाही. एम्पेम्बानं मात्र चिकाटी दाखवली. त्यानं आपला हा अनुभव आपल्या शिक्षकांना सांगितला,’ नाना म्हणाले. 

‘आणि त्यांनी त्याचं रहस्य उलगडून दाखवलं?’ चंदूनं विचारलं. 
‘नाही. तू समज तुझ्या सरांना असं सांगितलंस तर...?’ नानांनी विचारलं. 

‘...तर सर याला वर्गाबाहेरच काढतील. ज्यादा शहाणपणा करतो म्हणून हा आधीच बदनाम झालाय,’ गोट्यानं परस्पर उत्तर दिलं. 

‘एम्पेम्बाच्या शिक्षकांनी हेच केलं. त्यांनी त्याचं म्हणणं उडवून लावलं. पण असं करणं बरोबर नाही. त्यामुळं कुतूहल मारलं जातं. संशोधनाचा पायाच उखडला जातो. एम्पेम्बानं मात्र धीर सोडला नाही. एके दिवशी त्याच्या शाळेत डॉ. डेनिस ऑस्बोर्न हे दारे सलाम विद्यापीठातलं वैज्ञानिक व्याख्यान द्यायला आले होते. त्यांनाच भर सभेत एम्पेम्बानं प्रश्न विचारला, ‘जर तुम्ही अगदी एकसारखी दोन भांडी घेतलीत. त्यामध्ये सारख्याच आकारमानाचं पाणी भरलं. एक ३५ अंश सेल्सियस तापमानाचं आणि दुसरं शंभर अंश तापमानाचं. ती दोन्ही भांडी फ्रीजरमध्ये ठेवली तर शंभर अंशवालं पाणी आधी गोठतं. असं का होतं?’ 

‘वारे पठ्ठे, आपली बुवा नसती छाती झाली असलं काही करण्याची...’ बंड्या म्हणाला. 

‘अरे भ्यायचं कशाला? फार फार तर काय, तुझं म्हणणं चुकीचं ठरेल. पण त्यातूनही काही शिकायला मिळेलच. ऑस्बोर्नही चकित झाले. त्यांना सुरुवातीला हे खरं वाटेना. पण त्यांनी एम्पेम्बाला उडवून लावलं नाही. विचार करतो, असं सांगितलं. परत आपल्या प्रयोगशाळेत गेल्यावर त्यांनी तसा प्रयोग करून पाहिला. वैज्ञानिक पद्धतीनं. अनेक वेळा प्रयोग केला. निरनिराळ्या तापमानाच्या पाण्याचा वापर केला आणि त्या निरीक्षणावर आधारित शोधनिबंध त्यांनी एम्पेम्बाच्या बरोबरीनं, म्हणजे त्याचं नाव पहिलं आणि आपलं दुसरं असं, एका मान्यवर नियतकालिकात प्रकाशित केला. तोवर एम्पेम्बा कॉलेजमध्ये पोचला होता,’ नानांनी माहिती दिली. 

‘म्हणजे त्याचं शिक्षण अजून पूर्ण झालेलं नसतानाच तो वैज्ञानिक झाला?’ चिंगीनं विचारलं. 

‘तर काय? एवढंच नाही, तर पाण्याचा हा जो वैशिष्ट्यपूर्ण गुणधर्म आहे त्यालाही एम्पेम्बाचंच नाव दिलं गेलंय. एम्पेम्बा इफेक्ट. आहेस कुठं!’ नाना म्हणाले. 
‘त्यानं स्वतःच आपलं नाव दिलं त्याला?’ चंदूनं विचारलं. 
‘त्यानं नाहीच दिलं. पण त्याचा आणि ऑस्बोर्नचा तो पहिला शोधनिबंध प्रकाशित झाल्यावर इतरांनीही ते प्रयोग करून पाहिले. त्यावरून त्यांनी कोणत्या परिस्थितीत पाणी तसं वागतं हे निश्चित केलं. त्या परिस्थितीचं सांगोपांग वर्णन केलं. कोणकोणत्या तापमानाला तसा अनुभव येतो याचंही वर्णन केलं आणि ही जी सगळी प्रक्रिया होते तिला त्यांनी एम्पेम्बाचं नाव दिलं,’ नाना म्हणाले. 
‘ते सगळं ठीक आहे नाना, पण असं का होतं? गरम पाणी लवकर का गोठतं?’ मिंटीनं विचारलं. 
‘त्याचाही विचार वैज्ञानिकांनी केला आहे. पण तुझ्या प्रश्नाचं एकमेव उत्तर त्यांना अजून मिळालेलं नाही. अनेक तर्कवितर्क केले गेले आहेत. अजूनही संशोधन चालूच आहे. पण त्याबद्दल नंतर सांगेन,’ नाना म्हणाले.

संबंधित बातम्या