‘आमचंपण नाव...’

डॉ. बाळ फोंडके
सोमवार, 23 सप्टेंबर 2019

कुतूहल
 

‘नाही, नाही.. आज आम्ही तुमच्याकडून त्या कोड्याचं उत्तर ऐकल्याशिवाय जाणारच नाही,’ तिथल्या तिथं फतकल मारून बसत चिंगी म्हणाली. 

‘हो नाना, आम्हाला नेहमी सांगता, शंका आली तर बेधडक विचारा. पण ती विचारल्यावर त्याचं उत्तर काही देत नाही तुम्ही,’ मिंटीही आता तिला सामील झाली. 

‘अरे, अरे.. आत्तापर्यंत कसलेही चित्रविचित्र प्रश्न घेऊन आलात तरी त्यांचं उत्तर देण्याचा प्रयत्न केलाय मी. पण मलाही सगळी उत्तरं येतातच असं नाही,’ नाना म्हणाले. 

‘पण या प्रश्नाचं उत्तर माहिती आहे तुम्हाला. नंतर सांगेन असंही म्हणाला होतात,’ एकसुरात मुले म्हणाली. 

‘तोच एम्पेम्बा इफेक्ट. तो का होतो हे सांगितलंच नाही तुम्ही,’ गोट्या म्हणाला. 

‘ते होय. अरे पण त्याचं उत्तर वैज्ञानिकांनाच अजून सापडलेलं नाहीय. तर मी तरी काय सांगणार?’ नाना म्हणाले. 

‘पण अनेक तर्कवितर्क केले गेलेत असं म्हणाला होतात ना,’ चंदूनं विचारलं. 

‘अच्छा. काही जणांचं असं मत पडलं, की त्या भांड्यांमध्ये पाणी घातल्यावर त्या भांड्याच्या पृष्ठभागाचं तापमानही थोड्याच वेळात त्या पाण्याइतकंच होतं. गरम भांड्यांची उष्णतावाहकता थंड भाड्यांपेक्षा जास्त असते. त्यामुळं बाहेरच्या थंड वातावरणाचा आतल्या पाण्यावर वेगानं परिणाम होऊन ते लवकर गोठतं,’ नानांनी सांगितलं. 

‘कमाल आहे, असं कसं होईल?’ बंडूनं शंका विचारली. 

‘इतर वैज्ञानिकांचीही अशीच प्रतिक्रिया आली. त्यांना हे पटलं नाही. त्यांनी एक वेगळाच तर्क केला. ते म्हणाले, की गरम पाण्याची वाफ होते. बाष्पीभवन होतं. त्यामुळं त्यातली उष्णता लवकर विरून जाते. साहजिकच मग ते लवकर थंड व्हायला मदतच होते,’ नानांनी माहिती पुरवली. 

‘पण नाना, अशी वाफ होऊन ती उडून गेली तर मग त्या पाण्याचं आकारमान कमी होईल. गोठल्यावरही ते कमी झाल्याचं लक्षात येईलच ना?’ चिंगीनं विचारलं. 

‘बरोबर बोललीस चिंगे. हीच शंका इतरांनाही आली. म्हणून त्यांनी प्रत्यक्ष ते आकारमान मोजूनही पाहिलं. पण त्यात काही लक्षणीय फरक पडलेला त्यांना आढळला नाही. त्यामुळं त्याही तर्काला सगळ्यांचा पाठिंबा मिळाला नाही,’ नाना म्हणाले. 

‘म्हणजे अजूनही ते कोडं सुटलेलंच नाही?’ मिंटीनं विचारलं. 

‘जवळजवळ तसंच म्हणायला हवं. पण अलीकडेच सिंगापूरच्या नान्यांग टेक्नॉलॉजिकल विद्यापीठातल्या शी झांग यांनी वेगळाच मुद्दा मांडला आहे. त्यांच्या मते, ही सगळी करामत पाण्यातल्या रासायनिक बंधांची आहे,’ नाना म्हणाले. 

‘रासायनिक बंध? म्हणजे?’ एकमेकांकडं पाहत कोरसचा प्रश्‍न. 
‘मला सांगा, पाण्याचं रासायनिक नाव काय आहे?’ नानांनी विचारलं. 

‘एच टू ओ. म्हणजे त्याच्यात हायड्रोजनचे दोन अणू आणि ऑक्सिजनचा एक अणू असतो,’ मुले उत्तरली. 

‘शाब्बास. पण या अणूंना एकत्र बांधून ठेवणारं कोणी तरी हवं का नको? तर ते असतात रासायनिक बंध, कोव्हॅलंट बंध. ते तसे चांगलेच मजबूत असतात. पण होतं काय, की पाण्याचे दोन रेणू जवळजवळ आले की कधी एका रेणूतला हायड्रोजन दुसऱ्या रेणूतल्या ऑक्सिजनजवळ येतो आणि त्यांच्यात चुंबाचुंबी व्हायला लागते,’ नाना म्हणाले. 

‘अय्या.. चुंबाचुंबी?’ चिंगी आणि मिंटी दोघी ओरडल्या. 

‘म्हणजे ते एकमेकांकडं ओढले जातात आणि त्यांच्यामध्ये एक दुसराच बंध तयार होतो. त्याला हायड्रोजन बंध म्हणतात. तो तसा दुबळाच असतो. पण तो तशी महत्त्वाची भूमिकाही बजावतो. त्यामुळंच पाण्याचा उत्कलन बिंदू तशा प्रकारच्या इतर द्रवापेक्षा जास्त आहे. कारण त्या पाण्याची वाफ होते तेव्हा जे रेणू इतरांना सोडून जातात त्यांना हे हायड्रोजन बंध रोखण्याचा प्रयत्न करतात. साहजिकच जास्त ऊर्जा म्हणजेच उष्णता खर्ची घालावी लागते. तसंच झाडांच्या पानांमधून पाणी उडून जाण्याची जी प्रक्रिया होते, त्यावेळीही या हायड्रोजन बंधांच्या जोरापायी इतर रेणू वरच्या दिशेनं खेचले जातात. म्हणून तर उंच झाडांच्या मुळाशी घातलेलं पाणी पार शेंड्यापर्यंत सहज पोचतं. तर या हायड्रोजन बंधांच्या लुडबुडीपायी गरम पाणी लवकर थंड होतं, असा सिद्धांत झांगनी मांडलेला आहे. त्याचा पडताळा घेण्याचे प्रयत्न इतर वैज्ञानिक करत आहेत. त्या मंथनातून कदाचित एम्पेम्बा इफेक्टच्या रहस्याचा उलगडा होईल. तुम्हीसुद्धा करू शकाल तो,’ नाना म्हणाले. 

‘करूच आम्ही. मग आमचंही नाव दिलं जाईल त्या कल्पनेला.. चला रे...’ सगळ्यांना आपल्या बरोबर घेत चिंगी गेली.

संबंधित बातम्या