स्थिर राहता येईल? 

डॉ. बाळ फोंडके
सोमवार, 30 सप्टेंबर 2019

कुतूहल
 

‘तू ना, नुसता आळशी गोळा आहेस,’ जमिनीवर आडवा पसरलेल्या चंदूला गदागदा हलवून त्याला उठवण्याचा प्रयत्न करत चिंगी म्हणाली. 

‘नाही तर काय!’ तिच्या मदतीला येत मिंटीही म्हणाली. ‘नुसता लोद्या आहे हा. याला फक्त एके ठिकाणी स्वस्थ बसून आराम करायचंच माहिती आहे. थोडी म्हणून हालचाल करायला नको.’ 

‘तो एका जागी असेल पण स्वस्थ बसलेला नाही,’ चंदूची बाजू घेत गोट्या म्हणाला. 

‘स्वस्थ बसलेला नाही? मग काय करतोय?’ मिंटीनं विचारलं. 
‘तो ना, तो तासाला हजारो किलोमीटरच्या वेगानं फिरतोय, काय म्हणतात ते, ते.. हं भ्रमण करतोय,’ गोट्या म्हणाला. 

‘उगीच काही तरी भंकस करू नकोस. इथं नुसता लोळत तर पडलेला दिसतोय,’ चिंगी म्हणाली. 

‘तसं तुला वाटत असेल.. पण खरं तर तो - तो कशाला तू, ही मिंटी, मी, तो बंड्या आपण सगळेच प्रत्येक मिनिटाला काही हजार किलोमीटरच्या वेगानं धावतोय,’ गोट्या म्हणाला. 

यावर ती दोघं हमरीतुमरीवर येणार तो इतका वेळ पाठी उभं राहून त्यांची चर्चा ऐकणाऱ्या नानांनी गोट्याचं म्हणणं उचलून धरलं. 

‘गोट्या खरंच सांगतोय मुलींनो,’ ते म्हणाले. 
‘नाना, तुम्हीसुद्धा?’ थोड्या तक्रारीच्या सुरात चिंगी आणि मिंटी म्हणाल्या. 

‘हो. मला सांग तू जेव्हा आगगाडीत बसलेली असतेस तेव्हा तू स्वस्थ असतेस का?’ नानांनी विचारलं. 
‘हो तर. काहीही चुळबूळ न करता मी एका जागीच बसून राहते,’ चिंगी म्हणाली. 

‘मग गाडीनं एकदम ब्रेक दाबला की पुढच्या सीटवर कशी जाऊन आदळतेस? मोटारीतून जाताना पट्टा लावायला का सांगतात?’ नानांनी पुन्हा विचारलं. 

‘तेच तर सांगतोय मी मघापासून. अगं ती ट्रेन जर ताशी शंभर किलोमीटरच्या वेगानं धावत असेल तर मग तिच्यात बसलेले सगळेच जण त्याच वेगानं धावत असतात,’ गोट्या म्हणाला. 

‘तू डोळे मिटून बसशील तर तुला तुझा वेग जाणवणार नाही. पण खिडकीतून बाहेर पाहिलंस तर तिथले विजेचे खांब, झाडं, टेकड्या सगळेच उलट्या दिशेनं वेगानं धावताना दिसतात,’ नाना म्हणाले. 

‘.. आणि तुला तुझा वेग जाणवतो,’ गोट्यानं पुस्ती जोडली. ‘हो पण आता हा लोद्या कुठं ट्रेनमध्ये बसलाय? किंवा मी, ही मिंटी, नाना तुम्हीही..’ चिंगीनं विचारलं. 

‘ट्रेनमध्ये नसलो तरी या पृथ्वीवर तर आहोत आणि ही पृथ्वी अवकाशातून सूर्याच्या भवती प्रदक्षिणा घालण्यासाठी ताशी एक लाख दहा हजार किलोमीटरच्या भन्नाट वेगानं धावतेय. ती धावतेय म्हणजेच तिच्यावर बसलेलो आपण सगळेच त्या वेगानं धावतोय,’ नानांनी उत्तर दिलं. 

‘पण मग आपल्याला तो इतका भोवंडून टाकणारा वेग जाणवत का नाही?’ चिंगीनं विचारलं. 

‘पृथ्वीनं एकदम ब्रेक लावला तर तुला धक्का बसेल आणि जाणवेल,’ आडवं पडल्यापडल्याच चंदू म्हणाला. 
‘बाहेर पाहायचं तर खिडकी नाही. त्यामुळं तिथं काही दिसणार नाही,’ गोट्या म्हणाला. 

‘का? का? सूर्य दिसतो की!’ मिंटी म्हणाली.. आणि थोडं आठवून परत म्हणाली, ‘हो चंद्रसुद्धा. शिवाय इतर ग्रह तारे...’ 

‘आणि ते उलट्या दिशेनं जात असताना दिसतात ना!’ नानांनी विचारलं. 
‘पण मग नाना आपण सूर्यावर गेलो तर? तो तर स्थिरच आहे ना. मग तिथं खरोखरच स्वस्थ बसता येईल.’ चिंगी पुन्हा बोलली. 

‘जळून खाक झाली नाहीस तरची बात ना!’ बंड्याही आता त्या चर्चेत सामील झाला. 

‘पण समजा मुलांनो, की तुम्ही त्याची काही तरी व्यवस्था केलीत. कसला तरी जबरदस्त उष्णतारोधक पोषाख घातलात तरी तिथंही तुम्ही स्वस्थ बसू शकणार नाही. कारण सूर्यही आपल्या आकाशगंगेच्या केंद्राभवती तसाच भन्नाट वेगानं भ्रमण करत असतो,’ नानांनी माहिती दिली. 

‘मग त्या केंद्रावर तरी आराम करता येईल की नाही?’ मुली आपला हेका सोडायला तयार नव्हत्या. ‘नाही. कारण...’ 
‘...कारण ती आकाशगंगाही अशाच..., आलं लक्षात नाना,’ हसत हसत कोरस उत्तरला. 

‘तात्पर्य काय, की या विश्वात असं कुठंच एकदम स्वस्थ राहता येत नाही. आपलं हे विश्व मुळी सतत चालतच राहतं. ते सतत प्रसरण पावतंय म्हणजेच ते स्थिर नाही आणि ते स्थिर नाही तर आपण तरी कसे स्थिर राहू? काय?’ नाना म्हणाले.    

संबंधित बातम्या