अंतराळातला खून 

डॉ. बाळ फोंडके
सोमवार, 7 ऑक्टोबर 2019

कुतूहल
 

‘काय वाचतो आहेस रे?’ चिंगीनं चंदूला विचारलं. 
चंदूनं काहीच उत्तर दिलं नाही. तो वाचनात गुंगून गेला होता. चिंगीनं त्याच्या हातातलं पुस्तक हिसकावून घेत त्याच्या तंद्रीचा भंग केला.  ‘चिंगे, बऱ्या बोलानं ते पुस्तक दे पाहू,’ तिच्या अंगावर धावून जात चंदू म्हणाला. 

‘देईल, देईल ती. पण इतकं कसलं पुस्तक आहे की आम्ही इथं आल्याचंही तुझ्या लक्षात आलं नाही?’ बंड्या म्हणाला. 
‘अरे भलतीच इंटरेस्टिंग स्टोरी आहे ही. अंतराळातला खून,’ चिंगीच्या हातातून पुस्तक परत घेत चंदूनं सांगून टाकलं. 

‘म्हणजे डिटेक्टिव्ह स्टोरी असणार. कोणी खून केलाय ते शेवटी शेवटीच कळेल ना?’ मिंटीनं विचारलं. ‘पण जिचा खून झालाय ती व्यक्ती कशी मारली गेली हे तर सुरुवातीलाच सांगितलं असेल ना!’ गोट्यानं विचारलं. 
‘हो तर पिस्तुलातून गोळी झाडून खून केला गेलाय,’ चंदूनं सांगितलं. ‘मग मी सांगते कोणी खून केलाय ते,’ चिंगी सगळ्यांकडे पाहत आत्मविश्वासानं म्हणाली. ‘कोणी?’ सर्वांनी एकसाथ विचारलं. ‘कोणीच नाही. मुळात असा खून झालेलाच नाही. होणंच शक्य नाही,’ चिंगी म्हणाली. ‘का? का?’ सगळे पुन्हा ओरडले. 

‘कारण पिस्तुलातून गोळी झाडलीच जाणार नाही,’ चिंगीनं स्पष्ट केलं.  

‘असं कसं होईल?’ गोट्यानं शंका काढली. ‘पिस्तुलाचा घोडा दाबला की गोळी सटकन उडेलच ना.’ ‘तसं होणार नाही. कारण गोळीवर जेव्हा तो दट्ट्या आदळतो, तेव्हा त्या गोळीतल्या पहिल्या भागातल्या दारूचा स्फोट व्हायला हवा. तरंच ती गोळी वेगानं बाहेर पडेल,’ चिंगी म्हणाली. ‘मग त्यात काय अडचण आहे चिंगे?’ बंडूनं विचारलं. ‘अडचण अशी आहे, की अंतराळात ऑक्सिजनच नाही आणि स्फोट होण्यासाठी त्या दारूनं पेट घ्यायला हवा. तो ऑक्सिजनशिवाय कसा घेतला जाईल?’ युद्ध जिंकल्याच्या आवेशात सगळ्यांकडं पाहत चिंगी म्हणाली. ‘घेईल...’ इतका वेळ काहीही न बोलता मुलांचं संभाषण ऐकत तिथंच उभे असलेले नाना म्हणाले. ‘कारण आजकाल आधुनिक पिस्तुलांमध्ये ऑक्सिजनचा पुरवठा करण्याचीही व्यवस्था केलेली असते.’ 

‘म्हणजे हे अंतराळवीर कसे आपल्याला हवा असलेला ऑक्सिजन बरोबर घेऊनच जातात तसं?’ मिंटीनं विचारलं. ‘तसंच काहीसं. कसा हे महत्त्वाचं नाहीय. ऑक्सिजन असतो हे महत्त्वाचं. त्यामुळं गोळी झाडली जाईल,’ नाना म्हणाले. ‘मग खूनही करता येईल. चिंगे तुझं म्हणणं काही खरं नाही,’ मुलांनी तिला चिडवलं. 

‘गोळी उडणार नाही हे तिचं म्हणणं तितकंस खरं नाही. पण ती गोळी एकाच वेगानं सरळ रेषेतच जात राहील. कारण ती न्यूटनच्या पहिल्या नियमाचं पालन करेल. तो नियम काय सांगतो?’ नानांनी विचारलं. ‘हेच की जोवर कोणत्याही बाह्य बलाचा प्रभाव पडत नाही तोवर कोणतीही वस्तू आहे त्या स्थितीतच राहते. म्हणजे ती एखाद्या जागी फतकल मारून बसली असेल तर तिथंच तशीच राहील,’ मुलं एकसुरात उत्तरली. ‘आणि ती काही वेगानं पुढं पुढं जात असेल तर तशीच पुढं पुढं जात राहील.’ ‘तर ती गोळीही तशीच पुढंपुढं जात राहील. हे विश्व प्रसरण पावतंय. ते सतत वाढतच चाललंय आणि त्या प्रसरणाचा वेग गोळीच्या वेगापेक्षा किती तरी पटीनं जास्त असल्यामुळं त्या गोळीला अटकाव करू शकेल असं काही वाटेत येण्याची शक्यता कमीच आहे,’ नाना म्हणाले. ‘ती सरळ रेषेतच जात राहिल्यामुळं त्या रेषेपासून बाजूला झालं तर ती कोणालाही लागणार नाही,’ चिंगी म्हणाली. 

‘पण ती पिस्तुलातून झाडली गेल्याचं कळलं तरच तिच्या वाटेत येणारा बाजूला होऊ शकेल ना!’ चंदू म्हणाला. 

‘का नाही कळणार? पिस्तुलातून ती झाडल्याचा आवाज ऐकू येईलच ना! हो की नाही नाना?’ मिंटीनं विचारलं. 

‘नाही मिंटी. विसरलीस का की तिथं निर्वात पोकळी आहे. हवाच नाही. आवाज म्हणजेच ध्वनिलहरींना प्रवास करायला माध्यम लागतं. आवाजामुळं हवेत जी कंपनं होतात, जे तरंग उठतात तेच सगळीकडं पसरत जातात. तेव्हाच तो आवाज ऐकू येतो. पण अंतराळात ते शक्यच नाही. त्यामुळं गोळी झाडली गेल्याचा आवाज ऐकू येणार नाही. तरीही ती झाडल्याचं पाहणाऱ्याला कळू शकेल,’ नानांनी समजावलं. 

‘कसं?’ मुलांनी विचारलं. 
‘करा विचार. अरे असं काय करता! गोळी झाडल्यावर तिथल्या दारूचा जो स्फोट होईल त्यामुळं धूर निघेल. सहसा हा धूरही पिस्तुलातून बाहेर पडल्यावर पसरत जातो. पण अंतराळात गुरुत्वाकर्षण शून्यवत असल्यामुळं तो तिथल्या तिथंच घोटाळत राहील. त्याचं थारोळं माजेल. ते दिसलं की गोळी झाडली गेलीय हे ओळखता येईल की नाही!’ नानांनी प्रतिप्रश्‍न केला. 

‘म्हणजे त्या पिस्तुलाला आवाज येऊ नये म्हणून ती कसलीशी नळी बसवतात ना...’ बंडू म्हणाला. 
‘... सायलेन्सर म्हणतात तिला,’ मिंटी म्हणाली. 

‘तर ती बसवण्याचं कारणच नाही आणि तरीही त्या धुराच्या थारोळ्यापायी ते पिस्तूल वापरल्याचा सुगावा लागेलच,’ गोट्या उत्तरला.  

‘वाह, डिटेक्टिव्ह गोट्या!’ कोरस म्हणाला. 

संबंधित बातम्या