न्यूटनचे नियम
कुतूहल
‘नाना, तुम्ही मघाशी म्हणालात की ती गोळी न्यूटनच्या पहिल्या नियमाचं पालन करेल म्हणून. म्हणजे अंतराळातही त्या नियमांचं पालन होतं?’ चंदूनं विचारलं.
‘अर्थात, विश्वात सगळीकडंच ते नियम लागू होतात,’ नानांनी माहिती दिली.
‘मग त्याचे इतर नियमही पाळले जात असतील,’ चिंगीनं विचारलं.
‘जातात तर! त्याच्या तिसऱ्या नियमाचं पालन झाल्यामुळं काय गंमत होते ती ऐकायचीय?’ नानांनी विचारलं.
‘सांगा, सांगा नाना,’ सगळ्यांनी गलका केला.
‘सांगतो, पण त्याआधी तो नियम काय आहे हे तुम्ही सांगा,’ हसत हसत नाना म्हणाले.
‘क्रिया आणि तिची प्रतिक्रिया समान मात्रेत एकमेकींच्या विरोधी दिशेनं काम करतात,’ गोट्याच्या पाठीत धपाटा घालत बंड्या म्हणाला.
‘एकदम बरोब्बर! ही अश्शी!’ बंड्याच्या पाठीत गुद्दा मारत गोट्यानं त्याची परतफेड केली.
‘तर मग जेव्हा पिस्तुलातून ती गोळी झाडली जाईल तेव्हा त्या गोळीला वेग मिळून ती पुढच्या दिशेनं ढकलली जाईल. त्याची प्रतिक्रिया म्हणून ती झाडणारा त्याच्या विरुद्ध दिशेनं ढकलला जाईल. मागं मागं जात जाईल,’ नाना म्हणाले.
‘तेवढ्याच वेगानं? म्हणजे झालंच, त्याची वाटच लागणार, वाट उलटी होणार,’ चिंगी म्हणाली.
‘बरोबर आहे चिंगी तुझं. पण त्याला आपण पाठी पाठी जात असल्याचं समजेलच असं नाही. जर तो ज्या यानातून तिथवर पोचला ते यान जवळ असेल तरच त्या भोज्ज्यापासून आपण दूर जातोय हे त्याच्या ध्यानात येईल. पण असा काही खुंट तिथं नसेल तर मग आपण एकाच जागी स्थिर आहोत, की पाठी जात आहोत याची जाणीवच होणार नाही.. आणि हो चंदू तू त्याच्या वेगाचं म्हणालास ना तर मला सांग त्या गोळीच्या वजनाच्या तुलनेत त्या अंतराळवीराचं वजन किती असेल?’ नानांनी विचारलं.
‘तसं नक्की नाही सांगता यायचं. पण किती तरी पट जास्ती असेल,’ चंदू उत्तरला.
‘म्हणूनच त्याचा वेग त्या गोळीइतका नसेल. समजा ती गोळी दर सेकंदाला एक हजार मीटर या वेगानं जात असेल तर तो अंतराळवीर सेकंदाला काही सेंटीमीटर या वेगानंच पाठी पाठी सरकत राहील. आपण असं सरकतोय हे त्याला न कळण्याचं हे आणखी एक कारण,’ नाना म्हणाले.
‘पण नाना, मला एक प्रश्न पडलाय. मुळात या अंतराळवीराजवळ पिस्तूल आलंच कुठून? म्हणजे आपल्याच सहकाऱ्याचा खून करण्याची सगळी तयारी त्यानं जमिनीवरून अवकाशात झेप घेतानाच केलेली असणार. त्याचा सुगावा लागणार नाही का?’ चिंगीनं विचारलं.
‘चांगला प्रश्न विचारलास चिंगी. म्हणजे तो अंतराळवीर मुळातच खुनशी स्वभावाचा असला पाहिजे. या अंतराळवीरांची शारीरिक, मानसिक सगळी काटेकोर तपासणी होत असते. त्यातून तावून सुलाखून पार पडल्यानंतरच त्यांची निवड होते. त्यामुळं अशा सूड घेण्याच्या इच्छेनं झपाटलेल्या व्यक्तीची निवडच होणार नाही. पण रशियाच्या अंतराळवीरांना त्यांच्याबरोबर न्यायच्या सामानातच पिस्तूल देण्यात येतं. आपण वापरतो तसलं नाही. ते खास असतं. नळ्यानळ्यांचं केलेलं असतं. त्याची घडीही होऊ शकते. अंतराळात गेल्यावर ते जोडलं जाऊ शकतं,’ नाना म्हणाले.
‘पण कशासाठी त्यांना ते दिलं जातं?’ मिंटीनं विचारलं.
‘अंतराळात त्याचा फारसा उपयोग नसतो. पण सुरुवातीच्या काळात हे अंतराळवीर जेव्हा परत पृथ्वीवर येत तेव्हा त्यांचं पॅराशूट भरकटलं आणि ते कुठंतरी कडेकपारीला जाऊन पडले तर स्वतःचं संरक्षण करण्यासाठी काही साधन असावं म्हणून त्यांना ते दिलं जात होतं. अगदीच काही नाही तर ते झाडून आपण कुठं आहोत हे इतरांना कळवण्याची सोय व्हावी हा उद्देश होता,’ नाना म्हणाले.
‘म्हणजे अंतराळात असताना त्याचा वापर करण्यासाठी ते दिलं गेलं नव्हतंच,’ गोट्यानं विचारलं.
‘तसा वापर करण्याचं काही कारणच दिसत नाही. तशी समजही त्यांना दिलेली असते. त्यामुळं उगीचच त्याचा वापर कोणी अंतराळवीर करेल असं वाटत नाही,’ नाना म्हणाले.
‘हा चंदू वाचतोय तशा गोष्टीमध्येच तसा वापर करण्याची कल्पना केली जाईल. थोडक्यात काय चंदू, ती एक सुरस आणि चमत्कारिक कथाच आहे. त्या अरबी भाषेतल्या सुरस कहाण्यांसारखी,’ बंडू म्हणाला.