बूमरॅंग 

डॉ. बाळ फोंडके
सोमवार, 25 नोव्हेंबर 2019

कुतूहल
 

‘ना ही. पण नाना आलीच एखाद्याला हुक्की आणि सहज चाळा म्हणून त्यानं झाडलीच ती गोळी तर?’ गोट्यानं विचारलं. 
‘शक्य आहे. तुमच्यासारखा तो अंतराळवीरही उचापती असेल तर! तुम्ही नाही का रमतगमत फिरत असताना उगीचच समोरचा दगड  उचलून भिरकावून देता,’ नाना म्हणाले. 

‘हा चंदू उद्या जर अंतराळवीर झाला तर नक्की तसं करेल,’ बंडू म्हणाला. 
‘.. तर या चंद्यानं अंतराळात ते झाडलंच. समजा गुरू ग्रहाच्या जवळ असताना त्याच्या दिशेनं ते झाडलं तर?’ चिंगीनं विचारलं. 

‘अगं, गुरू हा प्रचंड मोठा ग्रह आहे. त्यामुळं त्याचं गुरुत्त्वाकर्षणही जबरदस्त आहे. त्याच्या असा जवळ एखादा वीर गेलाच, तर तोच त्याच्याकडं ओढला जाईल. मग त्या गोळीचं काय! ती तर गुरू अंतराळातून अक्षरशः खेचूनच घेईल आणि मग ती वेटोळ्या वेटोळ्या मार्गानं गुरूच्या अंतरंगात गडप होऊन जाईल. श्यूल्ट्झ या वैज्ञानिकानं त्याचं गणितही केलंय. त्यानुसार जर थेट गुरूच्या दिशेनंच गोळी झाडली गेली तर गुरूच्या गुरुत्त्वाकर्षणाच्या प्रभावाखाली ओढली जाऊन तिचा वेग वाढेल,’ नानांनी समजावलं. 
‘किती होईल?’ मिंटीनं विचारलं. 

‘गुरूची सीमा पार करून त्याच्या अंतरंगात शिरता शिरता त्या गोळीचा वेग सेकंदाला साठ किलोमीटर इतका होईल,’ नाना उत्तरले. 
‘म्हणजे सुपरसॉनिक विमानापेक्षाही जास्त?’ चंदूनं विचारलं. 

‘ हो तर.. आणि अशी आत शिरलेली गोळी गरागरा फिरत त्या ग्रहाच्या गाभ्यात जाऊन पडेल. म्हणजे तोवर त्या वेगापायी तिचे तुकडे तुकडे झाले नसले तर..’ नाना म्हणाले. 
‘पण जिथं जवळपास असा कोणताच ग्रह किंवा इतर काही नाही, अशा ठिकाणी ती झाडली गेली तर?’ गोट्याला प्रश्‍न पडला. 

‘लक्षात घ्या की ज्या यानातून ते अंतराळवीर तिथवर पोचले असतील ते यान कोणत्या तरी ग्रहाभोवती प्रदक्षिणा घालत असणार. त्यामुळं तो अंतराळवीरही अशा एखाद्या कक्षेत परिभ्रमण करत असणार. त्यामुळं त्यानं जर सरळ रेषेत आणि विशिष्ट उंचीवरून ती गोळी झाडली तर तीही अशीच वर्तुळाकार फिरत प्रदक्षिणा घालायला लागेल,’ नानांनी समजावलं. 
‘अरे बापरे!’ मिंटी एकदम ओरडली. 

‘काय गं, काय झालं?’ नानांनी विचारलं. 
‘चंदू तुझी काही खैर नाही. अशी गोळीबिळी झाडू नकोस बाबा,’ मिंटी म्हणाली. 

‘का? यात चंदूची खैर नसायला काय झालं?’ बंडूनं विचारलं. 
‘तिचं म्हणणं बरोबरच आहे. अरे मुलांनो, तुमच्या लक्षात कसं येत नाही. ती गोळीही जर अशीच प्रदक्षिणा घालायला लागली तर मग वर्तुळाकार फिरून जिथून ती सुटली होती तिथंच परत येईल की नाही!’ नाना म्हणाले. 

‘आणि तिथंच चंदू उभा असेल,’ मिंटी म्हणाली. 
‘म्हणजे गोळी झाडल्याची प्रतिक्रिया म्हणून तो फार पाठी गेला नसला तर.. आणि गेला असलाच तरी तो त्या बूमरॅंगसारख्या परत फिरणाऱ्या गोळीच्या वाटेतच असेल. तिच्याकडं पाठ करून,’ नाना म्हणाले. 

‘.. आणि गोळी नेमकी त्याच्या पाठीत शिरेल. त्यानंच झाडलेली गोळी त्याच्याच पाठीत घुसेल,’ गोट्या म्हणाला. 
‘म्हणजे अंतराळात खून नाही झाला तरी आत्महत्त्या होईल,’ चिंगी म्हणाली. 

‘नाही नाही, तो खूनच असेल. फक्त खुनी आणि ज्याचा खून झालाय तो एकच असेल. पोलिसांना त्या केसचा निकाल लावणं कठीणच जाईल. त्यांचं काम सोपं करण्यासाठी श्यूल्ट्झनी तसा प्रयोगच करण्याचं ठरवलं होतं,’ नानांनी सांगितलं. 
‘मग केला का तो प्रयोग?’ चिंगीनं विचारलं. 

‘नाही. कारण ते गणित इतकं गुंतागुंतीचं व्हायला लागलं की प्रत्यक्ष प्रयोग न करता त्यांनी संगणकाकडून ते सोडवून घेण्यावरच समाधान मानलं. त्याचं उत्तरही मोठं मजेशीर आहे. श्यूलट्झच्या म्हणण्यानुसार अशी अंतराळात आत्महत्त्या करण्याची लहर कोणाला आलीच तर त्यानं चंद्रावरच्या पर्वतावर जावं. तिथून क्षितिजाच्या दिशेनं सेकंदाला १६०० मीटर या वेगानं गोळी झाडावी. त्याचा नेम अचूक असेल तर ती बरोबर त्याच्या पाठीत घुसेल आणि त्या वेगानं ती आरपार जाऊन बाहेर पडेल,’ नाना म्हणाले. 
‘छे.. या वैज्ञानिकांचं डोकं फिरलंय की काय? कोण करेल असला उपद्‍व्याप? त्याऐवजी ही ‘अंतराळातला खून’ ही गोष्टच वाचणं चांगलं,’ चंदूनं समारोप करत म्हटलं.

संबंधित बातम्या