अदृश्य विमान 

डॉ. बाळ फोंडके
सोमवार, 2 डिसेंबर 2019

कुतूहल
 

‘चिंगे, चिंगे, ऐकलंस का?’ चंदू धावता धावता ओरडत होता. सगळी टोळी कट्ट्यावर जमली होती. चंदूच्याच येण्याची वाट पाहात होती. 

‘चंद्या, एवढं झालं काय घसा फोडायला?’ मिंटीनं विचारलं. 
‘ती बातमी ऐकलीस? आपण म्हणजे आपल्या नौदलानं एक नवी पाणबुडी घेतलीय, खांदेरी. ती अदृश्य राहणार आहे,’ चंदूनं माहिती पुरवली. 

‘हॅ, यात काय मोठं सांगितलंस!’ गोट्या हेटाळणीच्या सूरात बोलला. ‘पाणबुडी आहे ना ती! मग ती पाण्याखालीच राहणार. दिसणारच नाही. म्हणजेच अदृश्य नाही का झाली?’ 
‘तसं नाही रे. वरून नाही ती दिसणार, पण पाण्याखाली गेलो तर दिसेल की नाही. पाण्याखालून जाणाऱ्या दुसऱ्या पाणबुडीला दिसेलच ना!’ बंडूनं त्याची री ओढली. 

‘नाही, पाण्याखाली तसं स्पष्ट दिसत नाही. आपण नाही का परवा समुद्राच्या तळावर असलेल्या वनस्पतींवरचा व्हिडिओ पाहत होतो, डिस्कव्हरी चॅनेलवर. तर ते पाणबुडे कपाळाला फ्लॅशलाईट लावूनच फिरत होते. त्याच्या उजेडातच तिथं पाहता येत होतं,’ चंदू म्हणाला. 
‘पाणबुडीचं सोडा,’ चिंगी म्हणाली, ‘पण मी तर ऐकलंय की हवाई दलाकडं अदृश्य विमानंही आहेत. म्हणजे शत्रूला न दिसता ती त्याच्यावर बॉम्बहल्ला करू शकतात.’ 

‘फार उंचावरून उडत असणार ती,’ बंड्या म्हणाला, ‘म्हणूनच ती दिसत नाहीत.’ 
‘मला नाही वाटत. कारण अशा उंचीवरून उडणाऱ्या विमानांवरही नजर ठेवण्यासाठीच त्या रडारचा वापर करतात ना. दुसरीच काहीतरी युक्ती असली पाहिजे. नानांनाच विचारायला हवं.. चला...’ चिंगी म्हणाली. 

नानांकडं जाण्यासाठी मुलं उठणार तो नानाच आले. ते केव्हा त्यांच्यापाठी येऊन त्यांची चर्चा ऐकत होते हे टोळीला कळलंच नाही. 
‘उठायची गरजच नाही. नानाच इथं हजर झाले आहेत. ही विमानं कशी अदृश्य होतात, त्या रडारला कसं चकवतात हेच विचारायचंय ना तुम्हाला?’ त्यांनी विचारलं. 

‘हो नाना...’ कोरस ओरडला. 
‘सांगतो, पण त्या आधी तुम्ही मला सांगा मी तुम्हाला कसा दिसतो?’ नानांनी प्रश्‍न विचारला. 

‘कसे म्हणजे!’ गोंधळलेली मिंटी पुटपुटली. ‘नेहमीसारखेच. थोडे थकलेले वाटता. पण नेहमीसारखेच दिसताय.’ 

‘तसं नाही गं. दिसतो कसा म्हणजे तुम्ही मला कसे पाहू शकता?’ नानांनी पुन्हा विचारलं. 
‘हं हं, ते होय. म्हणजे सूर्याचा प्रकाश तुमच्यावर पडतो. तो तुमच्या अंगावरून परावर्तित होतो आणि आमच्या डोळ्यांमध्ये शिरतो. त्यामुळं आम्ही तुम्हाला पाहू शकतो,’ चिंगी उत्तरली. 

‘पण आता रात्र असती, सूर्यप्रकाश नसता, अंधार असता तर मग..?’ नानांनी पुन्हा प्रश्‍न केला. 
‘तर मग तुम्ही दिसला नसता. पण आमच्याकडं टॉर्चलाईट किंवा कंदील असता तर त्याच्या प्रकाशात तुम्ही दिसला असता. परत तेच त्या प्रकाशाचे किरण तुमच्या अंगावरून परावर्तित होऊन आमच्या डोळ्यापर्यंत आले असते आणि तुम्ही दिसला असता,’ चिंगीनं उत्तर दिलं. 

‘बरोबर. अर्थात आपल्याला तानापिहिनिपाजा या पट्ट्यातलाच प्रकाश दिसू शकतो. पण हा दृश्यप्रकाश विद्युतचुंबकीय लहरींच्या लांबलचक पट्ट्यातला एक लहानसा भाग आहे. त्याच्या दोन्ही बाजूला इतरही किरण पसरलेले आहेत. त्यापैकीच एक, रेडिओलहरींचा वापर रडारमध्ये केला जातो. अर्थात तत्त्व तेच,’ नाना म्हणाले. 
‘तेच म्हणजे?’ मुलांनी विचारलं. 

‘म्हणजे जमिनीवरून रडारची अँटेना रेडिओलहरी आकाशात फेकत राहते. त्या लहरींना जोवर काही अडथळा होत नाही तोवर त्या तशाच जात राहतात. पण जर तिथं विमान असेल तर त्या लहरी त्याच्यावर जाऊन धडकतात, त्याच्यावरून त्या परावर्तित होतात आणि अशा परत येणाऱ्या लहरी परत रडारच्या अँटेनाकडून पकडल्या जातात आणि रडारला ते विमान दिसतं.’ नानांनी माहिती दिली. 
‘पण ते विमानच आहे, दुसरंच काही नाही हे कसं समजतं?’ चंदूनं विचारलं. 

‘कारण त्या परत आलेल्या रेडिओलहरी पकडताना त्यांच्यावर काही प्रक्रिया केल्या जातात. त्यानुसार मग ती वस्तू काय आहे, तिचं आकारमान किती आहे, आकार कसा आहे, ती एकाच जागी स्थिर आहे की चालती आहे, धावती असेल तर तिचा वेग किती आहे, ती कोणत्या दिशेनं जात आहे हे सगळं ओळखण्याची सोय केलेली असते. एवढंच काय पण प्रत्येक विमानाचं एक विशिष्ट इलेक्ट्रॉनिक ओळखपत्रही असतं, त्याची सही म्हणतात त्याला, त्याच्यावरून त्या विमानाची ओळखही पटवता येते,’ नानांनी सांगितलं. 

‘पण मग ते अदृश्य कसं होतं? रडारला कसं चकवतं?’ गोट्याला प्रश्‍न पडला. 

‘वाटलंच मला तू हे विचारणार म्हणून. पण तूच विचार करून मला सांग. तोपर्यंत मी बाजारात जाऊन येतो,’ नाना म्हणाले...

संबंधित बातम्या