नाना झाले अदृश्य! 

डॉ. बाळ फोंडके
सोमवार, 9 डिसेंबर 2019

कुतूहल
 

‘मी  सांगतो, मी सांगतो...’ नानांना बाजारातून येताना पाहताच धावत धावत पुढं जाऊन त्यांना गाठत गोट्या म्हणाला. 

‘तुला उत्तर सापडलं तर!’ नाना म्हणाले. 
‘हो, म्हणजे नाही...’ गोट्या म्हणाला. 
‘मी नाही समजलो,’ नाना म्हणाले. 

‘म्हणजे तुम्ही कसे अदृश्य व्हाल हे समजलं. पण विमान कसं अदृश्य होतं हे नाही समजलं,’ गोट्या उत्तरला. 
‘काही नाही नाना, थापा मारतोय हा. याला काहीच समजलेलं नाही. उगीचच बढाया मारतोय,’ मिंटी म्हणाली. 

‘मग ऐक. नानांच्या अंगावरून सूर्याचे किरण परावर्तित होऊन माझ्या डोळ्यात शिरतात. म्हणून मी त्यांना पाहू शकतो. पण समजा तसे ते परावर्तित झालेच नाहीत तर मी त्यांना कसं पाहणार? म्हणजेच ते अदृश्य नाही का होणार?’ गोट्यानं सांगितलं. 
मिंटीला त्यावर काहीच उत्तर सुचलं नाही. तरीही गोट्याला श्रेय द्यायला ती तयार नव्हती. 

‘असे कसे परावर्तित नाही होणार?’ ती म्हणाली. 
‘मिंटी अगं काही पदार्थ प्रकाशकिरणांना आरपार जाऊ देतात. म्हणजेच ते परावर्तित नाही होत. उत्तम प्रतीची काच असेल तर ती चटकन दिसत नाही. कित्येक वेळा मॉलमध्ये लोक तिथं मोकळी जागा आहे असं समजून त्या काचेवर जाऊन धडकताना मी पाहिलेत,’ नाना म्हणाले. 

‘हो नाना, परवा आम्ही एअरपोर्टवर गेलो होतो तिथंही एकजण असाच काचेतून पलीकडं जायला निघाला होता. त्याला ती काच दिसलीच नाही. काच फुटली आणि त्यालाही बरंच लागलं,’ चिंगी म्हणाली. 
‘काचेचं ठीक आहे. पण माणसाच्या आरपार किरण कसे जातील?’ मिंटीनं विचारलं. 

‘नाही गेले पण ते किरण पूर्णपणे शोषून घेतले गेले तर? म्हणजे अशा एखाद्या पदार्थाचा कोट मी घातला तर मग ते किरण माझ्यावरून परावर्तितच होणार नाहीत. खरं ना मिंटी?’ नानांनी विचारलं. 
‘पण असे पदार्थ असतात?’ मिंटीला आपला हेका सोडवेना. 

‘हो. उत्तम प्रतीचा काळा रंग प्रकाश संपूर्ण शोषून घेतो. त्यामुळं तो रंग लावणारा पदार्थ अदृश्य होऊ शकतो,’ नाना म्हणाले. 
‘आणखीही एक युक्ती आहे नानांना अदृश्य करण्याची...’ आता चंदूलाही हुरूप आला.  

‘कोणती?’ बंड्या आणि गोट्यानं विचारलं. 
‘म्हणजे प्रकाशाचे किरण नानांच्या आरपारही गेले नाहीत की शोषलेही गेले नाहीत. ते परावर्तित झाले पण माझ्या डोळ्यांवर पडलेच नाहीत. भलतीकडंच गेले तर मग मला ते अदृश्यच राहतील, काय?’ चंदू उत्तरला. 

‘अॅहॅहॅ, म्हणे भलतीकडंच जातील. ते किरण म्हणजे काय चंदू आहे भलतीकडंच भरकटायला!’ चिंगी त्याला वेडावत म्हणाली. 
‘नाही चिंगे, चंदूचं म्हणणं अगदीच चुकीचं नाही. मला सांग ज्यावर प्रकाशकिरण पडतात तो पदार्थ आरशासारखा सपाट आणि गुळगुळीत असेल तर परावर्तित किरण सरळ उलटे फिरतील,’ नानांनी समजावलं. 

‘पण परावर्तनाच्या नियमानुसारच..’ मिंटी म्हणाली. ‘म्हणजे किरण ज्या कोनातून आरशावर आपटतो त्याच कोनातून पण विरुद्ध दिशेला तो परतेल.’ 
‘योग्य बोललीस. पण समजा तो पदार्थ खडबडीत असेल, गुळगुळीत नसेल तर काय होईल? तो पृष्ठभाग मग सपाट नसेल, त्यावर असंख्य खाचखळगे असतील. म्हणजेच एकच  एक पृष्ठभाग असण्याऐवजी अनेक निरनिराळ्या कोनातले पृष्ठभाग असतील. त्यापैकी प्रत्येकावर पडणाऱ्या किरणाचा कोन वेगवेगळा असेल. आणि मिंटी म्हणाली त्याप्रमाणं परावर्तनाच्या नियमांचं पालन झालं तरी परावर्तित किरण वेगवेगळ्या दिशेनं जातील. इकडंतिकडं विखुरले जातील. चंदू म्हणाला तसे ते भलतीकडेच भरकटतील. तुझ्या डोळ्यांपर्यंत ते पोचलेच नाहीत तर मग मी तुला दिसणारच नाही. अदृश्यच होईन. काय?’ नानांनी सांगितलं. 

‘आता आठवलं नाना, ती एक अदृश्य माणूस अशी गोष्ट होती ना! तिच्यातला माणूस कसा अदृश्य झाला होता?’ चिंगीनं विचारलं. 
‘एच. जी. वेल्स या आद्य इंग्रजी विज्ञानकथाकाराची गोष्ट होती ती. खूप गाजली होती. त्यात तो वैज्ञानिक स्वतःच्या अंगावर प्रकाश पूर्णपणे शोषून घेणाऱ्या पदार्थाचं लेपन करतो. त्यामुळं प्रकाश त्याच्या अंगावरून परावर्तित होतच नाही. म्हणून तो इतरांना दिसतच नाही. अदृश्य होतो,’ नानांनी समजावलं. 

‘पण या सगळ्याचा विमान अदृश्य होण्याशी काय संबंध? आपण त्याची वार्ता करत होतो ना!’ बंडू म्हणाला. 
‘अरेच्चा, ते तर तसंच राहिलं. पण आता तुम्हीच करा पाहू विचार,’ नाना म्हणाले.

संबंधित बातम्या