आकाशातला लपंडाव

डॉ. बाळ फोंडके
सोमवार, 16 डिसेंबर 2019

कुतूहल
 

‘नाना, तुम्हाला ज्या पद्धतीनं अदृश्य केलं तीच पद्धत विमानालाही अदृश्य करण्यासाठी नाही का वापरता येणार?’ मिंटीनं विचारलं. 
‘का नाही येणार? पण पहिल्यांदा अदृश्य का करायचं हे समजावून घ्या. शत्रूची आपल्या आकाशावर सतत नजर असते. त्या टेहळणीतून निसटून पुढं जाण्याचा विमानाचा इरादा असतो. थोडक्यात ती टेहळणी करणाऱ्या रडारला चकवायचं असतं,’ नानांनी सांगितलं. 

‘तेच तर म्हणतेय मी. अशी चकवाचकवी करायची तर त्या रडारकडून प्रसारित केलेल्या रेडिओलहरी विमानाकडून परतवल्या जाणार नाहीत, परावर्तित होणारच नाहीत अशी व्यवस्था करायला हवी,’ मिंटी म्हणाली. 
‘बरोबर. रेडिओलहरी या प्रकाशलहरींसारख्याच विद्युतचुंबकीय लहरी असतात. प्रकाशाचे किरण जसे काही पदार्थांकडून पूर्णपणे शोषून घेतले जातात, तसेच काही पदार्थ या रेडिओलहरींचं शोषण करण्यात वाकबगार असतात,’ नानांनी आणखी माहिती दिली. 

‘म्हणजे ते विमान या पदार्थांचं करतात की काय?’ चंदूनं विचारलं. 
‘हो चंदू, तसं म्हणायला हरकत नाही. वास्तविक विमानाच्या बांधणीसाठी वजनानं हलका, पण टणक पदार्थ आवश्यक असतो. निरनिराळे धातू एकमेकांमध्ये गुंतवून असे खास पदार्थ तयार करतात. त्यांना कॉम्पोझिट म्हणतात. हे पदार्थ आरशासारखे वागतात,’ नानांनी समजावलं. 

‘म्हणजे मग त्यांच्यावर आदळून रेडिओलहरी उलट्या फिरत असणार. मग विमान रडारबरोबर लपंडाव कसा खेळणार?’ बंड्याची शंका. 
‘पण बंड्या, यातल्याच काही पदार्थांवर प्रक्रिया करून ते रेडिओलहरी परावर्तित करणार नाहीत, उलट शोषूनच घेतील अशी व्यवस्था करता येते. आणखी काळजी घेण्यासाठी या पदार्थांवर रेडिओलहरींचं शोषण करणाऱ्या खास रंगांचा लेपही दिला जातो,’ नानांनी सांगितलं. 

‘म्हणजे प्रकाशकिरण शोषून घेणाऱ्या काळ्या रंगासारखा..’ गोट्या म्हणाला. 
‘बरोबर. तरीही विमानाचं नाक असलेला भाग अधिक गुळगुळीत असतो. त्याच्यावरून रेडिओलहरी परावर्तित होऊ शकतात. म्हणून या रंगाच्या वरही काही टेप चढवतात. एकदम कडेकोट बंदोबस्त करतात. त्यामुळं रडारला चुकवणं या चोरीछुपे जाणाऱ्या विमानांना शक्य होतं,’ नानांनी माहिती दिली. 

‘पण नाना ही विमानं भन्नाट वेगानं जात असणार. म्हणजेच हवेशी त्यांचं घर्षणही तसंच जबरदस्त होत असणार. त्यामुळं मग तो रंग खरवडून नाही निघत?’ चिंगीनं विचारलं. 
‘चांगला प्रश्न विचारलास चिंगे. म्हणून तर प्रत्येक उड्डाण करून आल्यावर विमानाची बारकाईनं तपासणी होते. कुठं रंग उडालेला असेल, टेप निसटलेली असेल तर त्याची लगेच डागडुजी करण्यात येते. पुढच्या उड्डाणासाठी त्याला सज्ज करण्यात येतं,’ नाना म्हणाले. 

‘पण नाना मी पाहिलंय यूट्यूबवर, या विमानांची इंजिनं बाहेरच्या बाजूला असतात. त्यांच्यावरून नाही का रेडिओलहरी परावर्तित होणार?’ मिंटीनं पुन्हा विचारलं. 
‘हो ना. झालंच तर ही विमानं बॉम्बफेकी असतात. त्या बॉम्बचं काय?’ चिंगीनंही विचारलं. 

‘त्याचीही व्यवस्था केलेली असते. इंजिनं बाहेरच ठेवावी लागतात. म्हणून त्यांच्याभोवतीही त्या खास कॉम्पोझिटचं आवरण ठेवलं जातं. झालंच तर त्यांची हवा खेचून घेण्याची नळीही इंग्रजी एस या अक्षरासारखी नागमोडी ठेवतात. म्हणजे बाहेर दिसलाच तर अतिशय लहान भागच दिसतो. बॉम्ब तर विमानाच्या आतच ठेवले जातात आणि ज्यावेळी फेकायचे त्याच वेळी त्या कप्प्याचं झाकण उघडून ते बाहेर फेकले जातात. ते झाकणही शक्यतो त्या खास कॉम्पोझिटचंच बनवलेलं असतं. तरीही ते त्या रेडिओलहरींना दिसलंच तरी तोवर बॉम्ब बाहेर पडलेले असतात,’ नाना उत्तरले. 

‘पण त्या बॉम्बना काही तसं कवच नसणार. ते तर रडारला दिसतीलच ना!’ गोट्याला प्रश्‍न पडला. 
‘दिसतील तर दिसूदेत. कारण तोवर उशीर झालेला असेल. त्या बॉम्बना अटकाव करण्यासाठी फारसं काही करता येणार नाही. ते फेकले जाण्यापूर्वी त्या विमानाचा सुगावा लागला तर ते शत्रूच्या तावडीत सापडू शकतं. एकदा का बॉम्ब फेकून झाले की विमान लागलीच परत फिरतं. वेगानं आणि जास्ती उंचीवरून पसार होतं. रडारला पूर्णपणे चकवून,’ नानांनी सांगितलं. 

‘म्हणजे मिशन सक्सेसफुल. चकवाचकवीचा खेळ आपणच जिंकलेला असणार...’ चंदू म्हणाला. 
‘पण हा झाला त्या लपंडावातला एकच पवित्रा. आणखीही युक्त्या आहेत...’ नाना म्हणाले. 

‘अरे हो, तुम्हीच म्हणाला होतात ना की त्या रेडिओलहरी परावर्तित तर होतील पण रडारपर्यंत पोचणारच नाही. भलतीकडंच जातील. तशीच काहीशी व्यवस्था असणार. हो ना नाना?’ चिंगीनं विचारलं. यावर नाना काहीच बोलले नाहीत. फक्त ओठांवर स्मितहास्य खेळवत टोळीकडं बघत राहिले. त्यांनीच विचार करून सांगावं असंच त्यांचं म्हणणं होतं...

संबंधित बातम्या