चकवाचकवी 

डॉ. बाळ फोंडके
सोमवार, 23 डिसेंबर 2019

कुतूहल
 

‘प ण त्या रडारच्या लहरींना भरकटायला लावायचं तर पृष्ठभाग खडबडीत हवा. तो कसा असेल? विमानाचा बाहेरचा पृष्ठभाग तसा सपाटच असणार ना?’ गोंधळलेल्या गोट्यानं विचारलं. 
‘अरे, सपाट पृष्ठभागावरूनही किरण दुसरीकडंच पाठवता येतात. तुम्ही पेरिस्कोप पाहिला आहेत,’ नाना म्हणाले. 
‘हो नाना..’ कोरस म्हणाला... ‘तो वापरून पाणबुडीतल्या लोकांना पाण्याच्या वरच्या भागातलं दृश्य दिसू शकतं.’ 

‘हो ना. त्यात सपाटच आरसे वापरलेले असतात. पण ते ४५ अंशाच्या कोनात बसवलेले असतात. त्यामुळं त्याच्यावरून परावर्तित होणारे किरण सरळ परत फिरत नाहीत. ते दुसरीकडंच जातात. म्हणजे बघ, तू तुझ्या समोर आरसा धरलास तर तुझ्या अंगावरून परावर्तित होणारे सूर्याचे किरण त्या आरशावर पडतात,’ नानांनी माहिती दिली. 

‘.. आणि तो आरसा सरळ समोर असल्यामुळं ते किरणही सरळ उलट फिरतात. मला माझं प्रतिबिंब दिसतं,’ मिंटी म्हणाली. 
‘एक्झॅक्ट्ली मिंटी! पण तोच आरसा जर तिरपा धरला, तर मग तुझ्या अंगावरून आरशावर पडलेले किरण वर छताच्या दिशेनं जातील आणि छतावरून आलेले किरण तुझ्या दिशेनं येतील. तुला त्या छताचं प्रतिबिंब दिसेल. म्हणजेच ते किरण भलतीकडंच गेले असं होईल की नाही?’ नानांनी विचारलं. 

‘ते बरोबर आहे नाना. आरशाचं ठीक आहे, पण विमानाचा पृष्ठभाग असा तिरपा कसा करता येईल?’ चंदूला प्रश्‍न पडला. 
‘नाही येणार, बरोबर आहे तुझं चंदू. एक उदाहरण म्हणून सांगितलं मी. आता बघ तोच आरसा सपाट असण्याऐवजी वक्र असेल तर मग त्याच्यावर पडलेले किरण सरळ उलट्या दिशेनं येणार नाहीत. तेही असे दुसरीकडंच जातील. मोटारीच्या बाहेरच्या बाजूला लावलेले आरसे असेच वक्र असतात. त्यामुळं तुला त्यात तुझं प्रतिबिंब सहजासहजी दिसत नाही. पण मागून येणाऱ्या गाडीचं प्रतिबिंब स्पष्ट दिसतं आणि ते तुला दिसतंय हे त्या गाडीला कळत नाही. वक्र पृष्ठभागाची हीच तर गंमत आहे,’ नानांनी समजावलं. 

‘म्हणजे या विमानांचा पृष्ठभाग असा वक्र केलेला असतो?’ चिंगीनं विचारलं. 
‘या विमानांचा आकारही वेगळा असतो. त्याचा वरचा आणि खालचा पृष्ठभाग त्या तिरप्या धरलेल्या आरशासारखा त्यांच्यावर आपटणाऱ्या रेडिओलहरी रडारपर्यंत पोचणार नाहीत अशा रीतीनं परावर्तित करतात. अर्थात ते रडार सरळ त्या विमानाच्या नेमकं खालीच असेल तर बाब वेगळी. पण तसं होणार नाही याची काळजी पायलट घेतोच. बाकीच्या बाजूच्या पृष्ठभागाला जागोजागी बाक येतील अशी व्यवस्था केलेली असते. त्यामुळं त्यांच्यावरून परावर्तित होणाऱ्या रेडिओलहरी रडारला दिसत नाहीत. विमान रडारला चकवू शकतं,’ नानांनी उत्तर दिलं. 

‘पण नाना या विमानातला पायलट जमिनीवरच्या नियंत्रण कक्षाबरोबर बोलत असेलच ना. ते संभाषणही रेडिओलहरी वापरूनच होत असेल ना! मग त्या लहरी नाही का रडारकडून पकडल्या जाणार? तसं झालं की विमानही पकडलं जाईल.. आणि राज्य विमानावर येईल,’ बंड्या म्हणाला. 

‘बंड्या, तू म्हणजे भोट आहेस,’ चिंगी म्हणाली. ‘ते काय तिथं लपाछपी खेळतात? रडारला सुगावा लागला की संपलंच. विमानावर तोफेचे गोळेच येऊन आदळतील, रेडिओलहरी नाही.’ 

‘म्हणूनच चिंगे त्याही लहरींचा बंदोबस्त केलेला असतो. एक तर त्या लहरी क्षीण असतील हे बघितलं जातं. शिवाय त्या अतिशय केंद्रित केलेल्या असतात. म्हणजे त्या जमिनीवरच्या आपल्याच स्टेशनकडं पोचतील, दुसरीकडं जाणार नाहीत याची तजवीज केलेली असते. पण आणखीही एक युक्ती आहे, बरं का...’ नाना म्हणाले. 

‘आता आणखी कोणती युक्ती राहिली?’ मुलांनी विचारलं. 
‘त्याचं काय आहे की या रडारच्या अँटेना सहसा उंचावरच्या जागेवर बसवलेल्या असतात. म्हणजे त्यांच्याकडून प्रसारित होणाऱ्या रेडिओलहरींना डोंगरकड्यांचा अडथळा होत नाही. त्या सरळ आकाशात जाऊ शकतात. पण त्यांच्या सोयीसाठी केलेल्या या व्यवस्थेचाच फायदा विमानालाही घेता येतो,’ नाना म्हणाले. 

‘तो कसा काय?’ गोट्यानं विचारलं. 
‘अरे सोप्पं आहे. वाचलं होतं मी परवाच कुठं तरी,’ मिंटी म्हणाली. ‘विमान खालून म्हणजे कमी उंचीवरून उडवायचं. म्हणजे मग त्या रेडिओलहरी त्यांच्या डोक्यावरून निघून जातात. त्यांच्यापर्यंत पोचतच नाहीत. मग त्या परावर्तित होण्याचा सवालच नाही.’ 

‘म्हणजे सरांनी सांगितलेलं सगळं या बंड्याच्या डोक्यावरून निघून जातं, त्याच्या मेंदूत काही शिरतच नाही तसं!’ चंदू म्हणाला. 
यावर बंड्या उसळून चंदूच्या अंगावर धावून जाणार तो नानांनी त्याला अडवलं, समजावलं आणि चिंगीची टोळी त्या विमानांचाच विचार करत निघून गेली.

संबंधित बातम्या