तारे झाले अदृश्य 

डॉ. बाळ फोंडके
गुरुवार, 23 जानेवारी 2020

कुतूहल
 

‘काही तरी काय सांगतोस चंद्या,’ चिंगी म्हणाली, ‘असा कसा होईल अदृश्य..’ 
‘आता कोण झालं अदृश्य?’ धावत धावत येऊन कंपूत सामील झालेल्या गोट्यानं विचारलं. 

‘तारा..’ एका सुरात उत्तर आलं. 
‘तारा.. म्हणजे तुझी ती शेपटेवाली मैत्रीण? ती कशी झाली अदृश्य?’ गोट्यानं विचारलं. 

‘अरे नाना नव्हते का सांगत, की तो प्रकाश शोषून घेणारा पोशाख घातला की माणूस इतरांना दिसत नाही. म्हणजेच अदृश्य होतो,’ बंडू म्हणाला. 
‘उगीच काही तरी बडबडू नका..’ अस्वस्थ झालेली चिंगी म्हणाली. ‘तारा म्हणजे मुलगी नाही, आकाशातला तारा.’ 

‘तो कसा अदृश्य होईल? तारा तर स्वयंप्रकाशी असतो ना, म्हणजे तो स्वतःच प्रकाश देतो. त्याच्यावरून कोणताही प्रकाश परावर्तित होण्याचा प्रश्नच नाही,’ चंदू म्हणाला. 
‘हो. तरीही तो प्रकाश मधेच कुठं अडवला गेला, आपल्यापर्यंत पोचलाच नाही तर तो तारा दिसणारच नाही. म्हणजेच तो अदृश्य होईल, नाही का?’ बंड्यानं विचारलं. 

‘तसं नाही, अदृश्य म्हणजे गायब, नाहीसाच झालाय. काय म्हणतात तो अंतर्धान पावलाय,’ चंदूनं आपल्या म्हणण्याचं स्पष्टीकरण दिलं. 

‘कोण म्हणतं असं? तू काही तरी चुकीचं ऐकलं असशील,’ गोट्या म्हणाला. 
‘नाही, एक तर मी तसं वाचलंही आहे. शिवाय काल मी डिस्कव्हरी चॅनेल पाहात होतो तर तिथं एक सायंटिस्ट आले होते. असतोपि असे काही तरी होते,’ चंदू म्हणाला. 

‘अॅस्ट्रोफिजिसिस्ट..’ मिंटी म्हणाली, ‘म्हणजे खगोल वैज्ञानिक.’ 
‘तेच ते, त्यांनाच विचारलं होतं की असे एक नाही तर अनेक तारे अदृश्य होताहेत तर काय आहे हे गौडबंगाल!’ चंदू म्हणाला. 

‘मग काय म्हणाले ते?’ मुलांनी विचारलं. 
‘मला सगळं काही नीटसं समजलं नाही. पण ते म्हणाले, की तारा जेव्हा प्रकाशच द्यायचा बंद होतो तेव्हा तो कायमचा नाहीसा झालाय असं म्हणतात,’ चंदूनं उत्तर दिलं. 

‘प्रकाश द्यायचा बंद होतो? अरे तारा म्हणजे काय आपली वीज कंपनी आहे का, की वीज द्यायची बंद होते आणि मग घरातले दिवेच पेटत नाहीत,’ बंडू म्हणाला. 
‘ते कसं होतं ते त्यांनी सांगितलं. पण ते फार अवघड होतं समजायला. हो, ते म्हणाले की ताऱ्यांचाही जन्म होतो आणि तसंच त्यांना मरणही येतं,’ चंदू म्हणाला. 

‘झाली चंद्याची भंकस सुरू..’ आता गोट्याही म्हणाला. ‘ताऱ्यांचा जन्म आणि मृत्यू आणि त्यांचं डेथ सर्टिफिकेट कोण देतं?’ 
सगळे खो खो हसत चंदूची टिंगल उडवायला लागले. तो जोरजोरानं आपलं म्हणणं खरं असल्याचं सांगत होता. पण कोणीच ऐकत नव्हतं. 

‘चंदू सांगतो ते खरंच आहे...’ 

हे कोण बोललं म्हणून सगळे पाहतात तो नाना तिथं आलेले. 
‘मघापासून तुमची चर्चा ऐकतोय मी. तुम्ही असे प्रश्न विचारताय हे चांगलंच आहे. पण नवीन काही ऐकल्यावर त्याच्यावर सहजासहजी विश्वास जसा ठेवायचा नसतो तसंच त्याची टिंगलटवाळी करत ते उडवूनही लावायचं नसतं,’ नाना म्हणाले. 

‘म्हणजे हा चंद्या काय सांगतोय ते खरं आहे?’ मुलांनी विचारलं. 
‘हो आणि नाही. म्हणजे काही तारे अकस्मात अदृश्य होताहेत असं काहीजणांचं म्हणणं आहे. ते अजूनही सिद्ध झालेलं नाही. पण बेटेलगस या नावानं ओळखला जाणारा तारा मृत्यूपंथाला लागलाय असं काही वैज्ञानिकांचं म्हणणं आहे,’ नानांनी माहिती दिली. 

‘सांगत नव्हतो मी, की ताऱ्यांनाही मरण येतं,’ चंदू म्हणाला. 
‘अरे गीतेतला तो श्लोक आहे ना, ‘जातस्य ही ध्रुवो मृत्यू ध्रुवं जन्म मृतस्य च।’ ज्याचा जन्म झालाय त्याला एक दिवस मृत्यूही येणार आहे आणि त्याचा परत जन्मही होणार आहे.’ नाना म्हणाले. 

‘म्हणजे नाना, तुमचा पुनर्जन्मावर विश्वास आहे?’ कोरसनं विचारलं. 
‘हो, माझं म्हणणं नाही हे. वैज्ञानिकांनीच सांगितलंय. ताऱ्यांच्या संदर्भात! पण पुनर्जन्म म्हणजे तुम्ही कथा कादंबऱ्यांत वाचता किंवा सिनेमा - सिरियलमध्ये पाहता तसा नाही. ती एक वेगळीच वैज्ञानिक घटना आहे. ती तशी तुम्हाला सविस्तरच सांगायला हवी..’ नाना म्हणाले. 

‘मग सांगा ना..’ नानांच्या जवळ कोंडाळं करत सगळे एकसाथ म्हणाले.

संबंधित बातम्या