ताऱ्याचा जन्म 

डॉ. बाळ फोंडके
सोमवार, 27 जानेवारी 2020

कुतूहल
 

‘अ वकाशात दोन ताऱ्यांच्या मधल्या भागात वायू आणि धूलिकण फिरत असतात. वायूंचे रेणू आणि धूलिकणांची एकमेकात सतत टक्कर होत राहते...’ नाना सांगू लागले. 

‘टक्कर?’ मुलांनी विचारलं. 
‘हो टक्कर. तुम्ही नाही का घोळका करत जायला लागलात की एकमेकांशी धडकता, एकमेकांच्या पायात पाय अडकवता. पुढं जाता, दुसऱ्याच कोणाशी तरी भिडता. तसंच हे रेणू एकमेकांना धडकतात. त्यातूनच मग काही कण आणि रेणू एकमेकांना चिकटून बसतात. त्यांचे पुंजके तयार व्हायला लागतात. त्या पुंजक्यांच्या गुरुत्वाकर्षणाची ओढ इतर रेणूंना आपल्याकडं खेचून घेते. तेही येऊन त्यांना चिकटतात,’ नानांनी समजावलं. 

‘.. आणि ते पुंजके मोठे मोठे होत जातात. त्यांचं आकारमान वाढतं..’ चिंगी म्हणाली. 
‘त्यांचं वस्तुमानही वाढत असणार,’ मिंटीनं अंदाज केला. 

‘अर्थात. त्यांचं वस्तुमानही वाढतं आणि वस्तुमान वाढल्यावर काय होतं?’ नानांनी विचारलं. 
‘त्यांचं गुरुत्वाकर्षण वाढतं..?’ चंदूनं दबक्या स्वरात विचारलं. 

‘अरे वाढणारच ना..’ मिंटी म्हणाली. ‘कारण गुरुत्वाकर्षण वस्तुमानावर अवलंबून असतं. जितकं वस्तुमान जास्त, तितकी त्याच्या गुरुत्वाकर्षणाची ओढ जास्त; हो ना नाना?’ 
‘बरोबर बोललीस. त्यांचं गुरुत्वाकर्षण वाढतं. त्यापायी मग त्या पुंजक्यातले रेणू आतल्या दिशेनं, त्याच्या मध्यवर्ती भागाच्या दिशेनं ओढले जातात. तसंच आणखी काही रेणूही ओढले जाऊन त्या पुंजक्यात सामील होतात. तेही आतल्या दिशेनं ओढले जातात,’ नानांनी माहिती दिली. 

‘हो, पण मग त्याचं आकारमान कमी कमी होत जाईल ना..?’ बंड्यानं विचारलं. 
‘बरोबर ओळखलंस. थोडक्यात काय तर हळूहळू त्या पुंजक्याचं आकारमान कमी होत जातं पण वस्तुमान वाढत जातं. म्हणजेच त्याची घनता वाढत जाते. दाटीवाटी होते. वायूचे रेणू आणखी जवळजवळ येत जातात. मुख्यत्वे हायड्रोजन आणि हेलियम हेच वायू असतात. ते जसजसे जवळजवळ येतात तसतशी त्यांच्यातली ओढ असह्य होत जाते आणि एका क्षणी ते रेणू एकमेकांमध्ये मिसळून जातात. त्यांचं मीलन होतं,’ नाना म्हणाले. 

‘.. आणि त्यातून मग अणुभट्टी तयार होते,’ चिंगी म्हणाली. 
‘थापा नको मारूस चिंगे,’ गोट्या म्हणाला. ‘अणुभट्टी तर अणूच्या विघटनामुळं होते आणि तेही युरेनियमचे अणू जेव्हा फुटतात तेव्हा.’ 

‘तू म्हणतोस ते खरंच आहे. पण जशी युरेनियमच्या अणूंचं विघटन झाल्यामुळं प्रचंड प्रमाणात ऊर्जा बाहेर पडते तशीच हायड्रोजनच्या किंवा हेलियमच्या अणूंचं मीलन झाल्यामुळंही प्रचंड प्रमाणात ऊर्जा बाहेर पडते. यालाच फ्यूजन रिअॅक्शन म्हणतात,’ नानांनी माहिती दिली. 
‘तसं झालं की मग ती ऊर्जा प्रकाशाच्या रूपात बाहेर फेकली जाते. तो पुंजका स्वयंप्रकाशित होतो. त्याचा तारा होतो. ताऱ्याचा जन्म होतो,’ मिंटी म्हणाली. 

‘तारा जन्मला गं सखे तारा जन्मला...’ इति चंदू. 
‘झाली चंद्यांची भंकस सुरू. ते राम जन्मला गं सखे राम जन्मला असं आहे..’ चिंगी म्हणाली. 

‘माहिती आहे मला ते गाणं. पण ताऱ्याचा जन्म झाल्यावरही असं गाणं का नाही म्हणता येणार?’ चंदूनं आपली बाजू लावून धरली. 

‘अरे अरे वाद घालू नका. पण अशा रीतीनं त्या अणुभट्ट्या धडधडायला लागल्या की काय होतं तर त्यातून निर्माण झालेली ऊर्जा बाहेरच्या दिशेनं फेकली जाते. गुरुत्वाकर्षणाच्या ओढीच्या विरुद्ध दिशेनं काम करणारं बल तयार होतं. त्या दोन बलांचा समतोल साधला जातो आणि तारा स्थिर होतो. आपला सूर्यही असाच स्थिर झालेला तारा आहे. त्यामुळं तो आतल्या आत कोसळतही नाही की फुगत जाऊन फुटतही नाही,’ नाना म्हणाले. 

‘नाना कालच मी कुठं तरी वाचलं की चीन आता असाच एक प्रतिसूर्य जन्माला घालण्याच्या तयारीत आहे, खरं का ते?’ गोट्यानं विचारलं. 

‘हो. म्हणजे अनेक देश मिळून सहकार्यानं एक अशीच अणुमीलनाच्या तत्त्वावर काम करणारी अणुभट्टी बांधण्याचा प्रयोग करत आहेत. ‘आयटीएफआर’ असं त्या प्रकल्पाचं नाव आहे. चीनही त्याचा एक सभासद आहे,’ नानांनी माहिती दिली. 
‘आणि आपण?’ बंड्यानं विचारलं. 

‘आपणही त्यात भाग घेत आहोत. अशा प्रकारची अणुभट्टी बांधण्याचे प्रयत्न गेली किती तरी वर्षं चालू आहेत. त्यातून मिळणारी ऊर्जा पर्यावरणस्नेही असेल. कारण त्यातून कोणतेही घातक प्रदूषक बाहेर पडत नाहीत. त्यामुळं मग विजेचा मुबलक पुरवठा होऊ शकेल,’ नानांनी सांगितलं. 

‘हे बेस झालं. तो प्रतिसूर्य उगवला की खरोखरच तारा जन्माला येईल.. आणि तोही अवकाशात नाही तर चक्क आपल्या धरतीवर..’ मुलं म्हणाली.

संबंधित बातम्या