ताऱ्याचा मृत्यू 

डॉ. बाळ फोंडके
सोमवार, 3 फेब्रुवारी 2020

कुतूहल
 

‘पण नाना सांगत होते ते अवकाशातल्या ताऱ्याच्या जन्म आणि मृत्यूबद्दल..’ गोट्या म्हणाला. 
‘बरी आठवण केलीस गोट्या. तर अशा रीतीनं त्या धुळीच्या कणांचं ताऱ्यात रूपांतर झालं की तो तारा उजळतो, प्रकाश द्यायला लागतो,’ नाना म्हणाले. 

‘पण मग तो कायमचा प्रकाश देत का राहत नाही?’ चिंगीनं विचारलं. 

‘कारण त्यातलं इंधन काही अमर्याद नसतं. कधी ना कधी तरी ते संपतंच. हायड्रोजनच्या अणूंच्या मीलनातून हेलियम तयार होतो. हायड्रोजनचं इंधन संपलं की त्या अणुभट्ट्या विझतात. धडधडायच्या थांबतात. त्यातून ऊर्जा बाहेर पडत नाही,’ नानांनी सांगितलं. 

‘तसं झालं तर गुरुत्वाकर्षणाच्या ओढीला विरोध करणारं बलही नाहीसं होईल. तारा स्थिर राहणार नाही,’ मिंटी म्हणाली. 

‘अगदी बरोबर मिंटी. म्हणजे मग तिथं एकच बल काम करत राहील, गुरुत्वाकर्षणाचं बल. ते मग तिथं उरलेल्या वायूच्या रेणूंना आतल्या दिशेनं खेचत जाईल. दाटीवाटी आणखीच वाढेल. त्यामुळं मग त्याचं तापमानही वाढत जाईल. इतकं वाढेल, की एका क्षणी आता हेलियमच्या अणूंचं मीलन व्हायला लागेल. त्यातून त्याहूनही जड असे कार्बनचे अणू तयार होतील,’ नानांनी माहिती दिली. 

‘ते होऊदेत. पण त्या हेलियमच्या अणूंच्या मीलनामुळं ऊर्जा बाहेर फेकली जाईल की नाही? की फक्त हायड्रोजनच्या अणूंच्या मीलनातूनच ऊर्जा मिळते?’ बंडूला शंका आली. 

‘तुझी शंका बरोबर आहे बंड्या. हेलियमच्या अणूंच्या मीलनापोटीही ऊर्जा बाहेर पडतेच. त्यामुळं परत एकदा तारा उजळायला लागतो. प्रकाश देतो,’ नाना म्हणाले. 

‘.. आणि तो स्थिरही होत असणार. कारण गुरुत्वाकर्षणाच्या बलाला विरोध करणारं बाहेरच्या दिशेनं खेचणारं बलही तयार होईल,’ चंदू म्हणाला. 

‘अरे वा चंदू, तूही बरोबर ओळखायला लागलायस,’ नानांनी शाबासकी दिली. 

‘कधी तरी चुकून तो बरोबर बोलतो नाना,’ त्याची चेष्टा करत मिंटी म्हणाली. 

‘तरीही त्याचं म्हणणं बरोबरच आहे,’ नाना म्हणाले. 

‘पण नाना, जर हायड्रोजनचं इंधनही मर्यादित होतं आणि त्यामुळं ते एका क्षणी संपलं. तर मग त्याच्यापासून तयार झालेलं हेलियमचं इंधनही मर्यादितच असेल, हो की नाही?’ चिंगीनं विचारलं. 

‘एक्सलंट चिंगे. अगदी बरोबर बोललीस. एका क्षणी तेही संपतं, परत एकदा त्या अणुभट्ट्या धडधडायच्या थांबतात. तारा अस्थिर होतो. आतल्या आत कोसळायला लागतो. त्याची घनता वाढते. गुरुत्वाकर्षणाची ओढही वाढते. तापमानही वाढत जातं आणि आता कार्बनच्या अणूंचं मीलन होऊन त्याहून जड मूलतत्त्वाचे अणू तयार होतात. तारा परत प्रकाश द्यायला लागतो,’ नानांनी माहिती दिली. 

‘तर मग हा सिलसिला असाच चालू राहायला हवा. नेहमीच. अगदी अव.. अव...  अव्याहत..’ गोट्या म्हणाला. 

‘म्हणजे मग तारा मरणारच नाही..’ चंदूनं त्याला दुजोरा दिला. 

‘हो आणि नाही... म्हणजे हे चक्र चालू राहतं पण फक्त लोह म्हणजे आयर्नचे अणू तयार होईपर्यंत. त्या अणूंचं मीलन मात्र होऊ शकत नाही. त्यामुळं मग त्या अणुभट्ट्या कायमच्या थंडावतात. तारा मरणपंथाला लागतो. आतल्या आत कोसळत जातो. घनता प्रचंड प्रमाणात वाढत जाते. दाटीवाटी इतकी असह्य होते, की ताऱ्याचा स्फोट होतो. बाहेरचे थर इकडंतिकडं फेकले जातात आणि गाभ्यातला भाग अधिकच घट्ट होतो. त्या वेळी तो तारा शेवटचे आचके दिल्यासारखा परत प्रकाशित होतो,’ नानांनी स्पष्ट केलं. 

‘म्हणजे विझण्यापूर्वी ज्योत मोठी होते म्हणतात तसा?’ गोट्यानं विचारलं. 

‘अगदी तसाच गोट्या. इतका मोठा की त्याचा प्रकाश संपूर्ण आकाशगंगेइतकाही असू शकतो. त्यालाच सुपरनोव्हा म्हणतात. आतला गाभा जो असतो त्याचं एक तर न्यूट्रॉन ताऱ्यात रूपांतर होतं. म्हणजे त्यातून प्रकाश बाहेर पडत नाही आणि मुळातच तो तारा जर आपल्या सूर्याच्या दीडपटीहून अधिक वजनदार असेल तर त्याचं कृष्णविवरात रूपांतर होतं. ब्लॅक होल,’ नाना म्हणाले. 

‘पण तुम्ही तर म्हणाला होतात की त्याचा पुनर्जन्म होतो,’ बंडूनं विचारलं. 

‘हो, कारण त्या ताऱ्यातून बाहेर फेकले गेलेले अणूरेणू परत एकत्र येऊन त्यांच्यापासून दुसरा तारा जन्माला येऊ शकतो. आपला सूर्य असाच दुसऱ्या पिढीचा तारा आहे. म्हणजे पूर्वी मरण पावलेल्या एका ताऱ्याच्या अवशेषांपासून त्याचा जन्म झाला आहे,’ नाना म्हणाले. 

‘तरीही तो काही अमरपट्टा घेऊन आलेला नाही,’ चिंगी म्हणाली. 

‘बरोबर. त्यालाही मरण काही सुटलेलं नाही. पण त्याला अजून खूप काळ जावा लागणार आहे. काही अब्ज वर्षं. तेव्हा तू त्याची काळजी नको करूस, समजलं चिंगे?’ नाना म्हणाले. 

चिंगीलाही नानांनी गप्प केल्याचं पाहून इतर सगळ्यांनी तिच्याभोवती फेर धरत तिला चिडवायला सुरुवात केली. ते पाहून हसत हसत नाना घराकडं निघाले...

संबंधित बातम्या