आगीच्या उड्या 

डॉ. बाळ फोंडके
बुधवार, 26 फेब्रुवारी 2020

कुतूहल
 

नाना आपलं काम आटोपून परत येतात तो चौकडी अजूनही तिथंच बसून राहिलेली दिसली. नानांना पाहताच सगळ्यांनी त्यांना गराडा घालत आपल्यात ओढून घेतलं. 

‘नाना आग लागते कशी हे कळलं. पण ती इतक्या दूरवर पसरते कशी?’ चिंगीनं विचारलं. 

‘कारण तिला वाऱ्याची साथ मिळते. वारा आगीचे लोळ पुढं पुढं ढकलत जातो. त्यामुळं तिथं असलेला पालापाचोळा पेट घेतो,’ नानांनी उत्तर दिलं. 

‘म्हणजे आग चालत चालतच पुढं जात राहते म्हणा की!’ आपल्या कल्पनेची गंमत वाटून चंदू गालातल्या गालात हसत म्हणाला. 

‘अरे चालते काय, उड्याही मारते. कारण या आगीत जळणारे काही हलके ढलपे वाऱ्याबरोबर विहरत उडी घेतात. मग त्या आगीपासून जरा दूर असलेल्या वाळक्या काटक्यांवर, त्या सरपणावर जाऊन आदळतात. त्यांना पेटवतात,’ नाना म्हणाले. 

‘.. आणि तिथं असं एकदम वाळून कोळ झालेलं सरपण नसेल तर? मग आग तिथंच थबकून राहते की काय?’ आता गोट्याला प्रश्‍न पडला. 

‘असंच काही नाही. कारण प्रत्येक पदार्थाला जसजशी उष्णता मिळत जाते, तसतसा त्याच्या अवस्थेत बदल होत राहतो. पाणी तापवत राहिलं, की शंभर अंश सेल्सियसच्या जवळ आल्यावर उकळायला लागतं. त्याची वाफ होते. बर्फाला उष्णता मिळाली की तो वितळतो. लोखंडही एका तापमानाला वितळत राहतं. एवढंच काय पण टणक असे दगडही वितळतात. त्यांचं लाव्हारसात रूपांतर व्हायला लागतं,’ नाना उत्तरले. 

‘हो नाना, परवाच पाहिलं टीव्हीवर. ते फिलिपाईन्स की कुठं ज्वालामुखीचा उद्रेक झाला तेव्हा त्याच्यातून असाच तळपता ज्वालारस बाहेर पडला. आगीची वाहती नदी असल्यासारखीच दिसत होती,’ बंडू म्हणाला. 

‘बरोबर तसंच एका विशिष्ट तापमानाला पदार्थ पेटही घेतो. त्याला इग्निशन पॉइंट म्हणतात. तेलही बघना, तापवत राहिलं की उकळतं. पण तापमान आणखी वाढलं की पेटही घेतं. तसंच मग फारसा सुका नसलेला पालापाचोळाही पेट घेऊ शकतो. कारण वाऱ्यामुळं हवाही तापते. ती पुढं वाहत जाऊन तिथलं तापमान वाढवते. ते जास्त वाढलं की मग तिथला तेवढा कोरडा न पडलेला पालापाचोळाही पेट घेतो. आग उडी मारत पुढं जात राहते,’ नानांनी समजावलं. 

‘तरी पण झाडी संपली, चांगला सिमेंट कॉंक्रिटचा रस्ता आडवा आला की ती तिथंच थांबत असेल ना?’ मिंटीनं विचारलं. 

‘नाही. काही वेळा तिचा आणि वाऱ्याचाही जोर असा असतो की ती चक्क त्या रस्त्यावरून उडी घेत रस्त्याच्या दुसऱ्या बाजूला असलेल्या झाडीवर आक्रमण करते. तिलाही पेटवून देते. आग पसरतच जाते,’ नाना म्हणाले. 

‘अशीच ती मग गावागावांपर्यंत पोचत असेल..’ गोट्यानं विचारलं. 

‘अर्थात. शिवाय ऑस्ट्रेलियात जमिनीचा तुटवडा नसल्यामुळं तिथं बहुमजली इमारती फारशा नाहीतच. अगदी शहरांमध्येही इथल्यासारखी फ्लॅटसंस्कृती नाही. आता आता जरा कुठं असे फ्लॅट उभे राहायला लागले आहेत. त्यामुळं ऑफिसेस वगैरे असलेला भाग सोडला, तर सगळीकडं स्वतंत्र घरं, बंगलेच असतात. फार फार तर तळमजला आणि पहिला मजला. त्यामुळं बहुतेक घरं लाकडांचीच बांधलेली असतात. बाहेरची भिंत सोडली, तर घरात सगळीकडं लाकडाचाच वापर. अधल्यामधल्या भिंती लाकडी बोर्डाच्याच असतात. साहजिकच ती भराभरा पेट घेतात. म्हणूनच तर यंदा गावंच्या गावं बेचिराख झालेली आहेत. गाड्या जळून खाक झाल्या आहेत. गुरंढोरंही प्रचंड संख्येनं आगीत सापडली आहेत. कल्पना करता येणार नाही असं नुकसान झालंय. फक्त वेळीच लोकांना दुसरीकडं हलवलं गेल्यामुळं माणसं वाचली आहेत. आगीशी लढणाऱ्या अग्निशमन दलाच्या काही जणांचा मात्र बळी गेला आहे,’ नानांनी सांगितलं. 

‘ही आग अशी झाडाझाडांवरून उड्या घेत जाते म्हणजे माकडासारखीच आहे म्हणाना!’ परत एकदा आपल्या कल्पनेवर चंदू खूष झाला. 

‘हो, तुझ्यासारखीच, त्यातही शेपूट पेटलेली माकडं. मग ती सगळीकडं आग लावतच सुटणार,’ बंडूनं त्याला चिडवलं. 

‘पण मग हे वणवे विझवतात कसे?’ चिंगीनं विचारलं. 
‘त्यांच्यावर पाण्याचे जोरदार फवारे तर मारतातच. पण आकाशातून हेलिकॉप्टरमधून त्यांच्यावर आग रोखणाऱ्या काही रसायनांचा फवाराही मारला जातो. जितके प्रयत्न करता येतील तितके केले जातातच. पण शेवटी निसर्गाचीही मदत लागतेच. आताही बघना, कालच मी टीव्हीवर पाहिलं, तिथं जोरदार वादळी पाऊस, गारांचा वर्षाव होतोय. त्यामुळंही बरंच नुकसान होतंय. पण वणवे विझवायलाही त्याची मदत होते आहे,’ नानांनी सांगितलं.

संबंधित बातम्या