विषावर उतारा 

डॉ. बाळ फोंडके
सोमवार, 2 मार्च 2020

कुतूहल
 

‘म्हणजे मग नाना या मिंटीचे मामा राहतात तिथंही आग लागली म्हणूनच त्यांचा फोन लागत नाहीय का?’ गोट्यानं विचारलं. 

‘नाही, नाही.. ते मेलबर्न शहरात राहतात ना? मग तिथं आग लागलेली नाही. त्यांच्यापासून तीन एकशे किलोमीटर तरी दूर आहेत हे वणवे. पण ते इतके भयानक आहेत, की त्यांच्यापासून निघालेला धूर वाऱ्याबरोबर ते अंतर पार करून शहरापर्यंत पोचतो. तिथल्या हवेत मग धुराचं साम्राज्य पसरतं. श्वासोच्छवास करणं कठीण होतं. तरी बरं तिथं सध्या उन्हाळा आहे,’ नानांनी उत्तर दिलं. 

‘उन्हाळा कसा नाना? हिवाळा आहे ना? दिल्ली गारठली. इथं मुंबईलाही हुडहुडी भरली होती..’ चिंगीला प्रश्‍न पडला. 

‘अगं हिवाळा इथं, चिंगे. आपण विषुववृत्ताच्या उत्तरेला म्हणजे उत्तर गोलार्धात आहोत. ऑस्ट्रेलिया विषुववृत्ताच्या दक्षिणेला, पार दक्षिणेला आहे. दक्षिण गोलार्धात आहे. त्यामुळं तिथलं ऋतूचक्र आपल्यापेक्षा उलटं असतं. आपल्याकडं उन्हाळा, तेव्हा तिथं हिवाळा आणि...’ 

‘...आपल्याकडं हिवाळा तेव्हा तिथं उन्हाळा..’ कोरसनं नानांचं वाक्य पूर्ण केलं. 

‘बरोबर..’ हसत हसत नाना म्हणाले. ‘अरे हिवाळा असता तर तिथं धुरकं तयार झालं असतं,’ नाना म्हणाले. 

‘धुरकं? म्हणजे?’ चंदूनं विचारलं. 

‘धूर आणि धुकं एकमेकांमध्ये मिसळून धुरकं तयार होतं. धुक्यामध्ये फक्त बाष्पच असतं. काही धुळीचे कण. पण त्यात धुराचे कणही मिसळले की तयार होतं ते धुरकं. स्मॉग म्हणतात त्याला इंग्रजीत. सध्या उन्हाळा असल्यामुळं फक्त धुरामुळं हवेचं प्रदूषण झालंय आणि दृश्यमानता कमी झालीय. दूरवरचं नीटसं दिसत नाहीय. सारं अंधुक अंधुक झालंय,’ नाना म्हणाले. 

‘नाना..’ काहीतरी आठवल्यासारखं वाटून गोट्यानं विचारलं, ‘तुम्ही म्हणाला होतात की काहीच आगी निसर्ग लावतो. म्हणजे इतर काही निसर्ग लावत नाही..?’ 

‘अरे असं कसं असेल?’ त्याला अडवत बंड्या म्हणाला, ‘दुसरं कोण लावणार?’ 

‘त्याचं बरोबर आहे बंड्या. काही आगी माणसांकडूनच लावल्या जातात..’ नाना म्हणाले. 

‘माणसांकडून? का?’ मिंटीलाही प्रश्‍न पडला. 

‘काही निष्काळजीपणामुळं. सिगरेटचं जळतं थोटुक लोक न बघता कुठंही फेकून देतात. ते या आयत्या तयार झालेल्या सरपणावर पडलं की ते पेट घेतं. वणव्याची सुरुवात होते. काही मात्र समाजकंटक असतात. ते जाणूनबुजून या सरपणाला पेटवून देतात. मजा पाहत राहतात.’ नाना उत्तरले. 

‘पण त्यामुळं इतकं नुकसान होतं ते..’ चंदू म्हणाला. 

‘त्याची त्यांना पर्वा नसते. दंगलीत नाही का काही जण विनाकारण बसेस पेटवून देतात. नुकसान कोणाचं होतं? पण म्हटलं ना ही समाजकंटक मंडळी असतात. त्यांना असा हैदोसधुल्ला घालायला आवडतं. झालंच तर काही आगी शेतकरीही पेटवतात,’ नानांनी सांगितलं. 

‘शेतकरी? हं, हं आपल्याकडंही काही शेतकरी पावसाळ्यापूर्वी आपल्या शेतात आगी लावतात. ऐकलंय मी,’ चिंगी म्हणाली. 

‘त्यामुळं शेतीचा कस वाढतो असा समज आहे. शिवाय आधीच्या मोसमातल्या पिकाची जी काही तळकटं उरलेली असतात ती जळून जाऊन जमीन नांगरणीला तयार होते. पंजाब हरयानामधल्या शेतकऱ्यांनी लावलेल्या अशाच आगींमुळं यंदा दिल्ली धुरानं भरून गेली होती. पण या आगी कधीकधी हाताबाहेर जातात. त्यांचं वणव्यात रूपांतर होतं आणि तुम्हाला आश्चर्य वाटेल, पण काही आगी चक्क अग्निशमन दलाकडूनच लावल्या जातात,’ नाना म्हणाले. 

‘काय? म्हणजे ज्यांनी आगी विझवायच्या तेच आगी लावून देतात?’ मुलांना आश्‍चर्य वाटलं. 

‘स्वतःला काम मिळवण्यासाठी करत असतील ते. नाहीतर त्यांना पगार मिळणार नाही ना..’ चंदू म्हणाला. 

‘शहाणा आहेस.. ते काही तुझ्यासारखे करंटे नसतात,’ गोट्यानं त्याला रोखलं. 

‘खरं तर आगींना रोखण्याचा हा एक उपाय आहे. म्हणजे बघ, की एखादा प्रदेश ज्वलनशील झाडींनी भरलेला आहे. पलीकडं कुठंतरी आग लागलीय. ती त्या प्रदेशापर्यंत पोचू नये म्हणून मग त्याच्या भोवती एक रुंद रिंगण आखून त्या रिंगणातली झाडी जाळून टाकतात. म्हणजे पसरणारी आग तिथवर पोचली तरी ती तिथंच अडकून पडते. पुढं जाण्यासाठी तिला काही इंधनच मिळत नाही. त्या रिंगणातल्या बेचिराख झालेल्या भागात त्या आगीला जाळण्यासारखं काही मिळतच नाही. म्हणून तिथं वणव्यांचा ऋतू सुरू होण्यापूर्वी सरकारकडूनच असे आगप्रतिबंधक उपाय योजले जातात. यंदा ते करायला उशीर केला म्हणून वणव्यांनी इतकं भयंकर रुप धारण केलं असा आरोप होतोय सरकारवर,’ नानांनी माहिती दिली. 

‘म्हणजे आगीचा मुकाबला करायलाही आगच उभी ठाकते. विषावर उतारा विषाचाच, हो की नाही नाना..’ मुले म्हणाली.

संबंधित बातम्या