बांडगूळ
कुतूहल
सगळी चौकडी कट्ट्यावर जमली होती. नानाही आज लवकरच येऊन त्यांच्यामध्ये बसले होते. फक्त चंदू तेवढा हजर नव्हता.
‘काय गं चिंगी, चंदू दिसत नाही तो!’ नानांनी चौकशी केली.
‘कुठं गेलाय कुणास ठाऊक. एरवी सर्वांत आधी तो हजर असतो, नाना,’ चिंगी उत्तरली.
‘अगं त्याच्या घरी कोणी पाहुणे आले आहेत, फॉरेनहून आलेत म्हणे,’ गोट्यानं उत्तर दिलं.
इतक्यात चंदूही आला. तोंडावर त्यानं ऑपरेशन करताना डॉक्टर बांधतात तसं फडकं बांधलेलं होतं, हिरव्या रंगाचं.
‘हे कसलं सोंग घेतलं आहेस चंद्या?’ मिंटीनं विचारलं.
‘याला मास्क म्हणतात..’ घुसमटल्यासारख्या आवाजात चंदू म्हणाला.
‘काय बोलतो आहेस काही समजत नाहीय. तोंडावरचा तो बुरखा काढ आधी,’ बंडू म्हणाला.
‘बुरखा नाही, मास्क म्हणतात याला,’ तोंडावरून तो काढत चंदूनं परत सांगितलं.
‘पण कशाला घातला आहेस तो?’ चिंगीनं विचारलं.
‘माझे मामा आले आहेत सिंगापूरहून. ते सांगत होते. ते करेना की काय पसरलंय ना जगात. त्यामुळं जगभर सगळेजण असाच मास्क लावून फिरताहेत,’ चंदूनं माहिती दिली.
‘करेना नाही चंदू, करोना. हे एका व्हायरसचं नाव आहे. एक रोगजंतू आहे तो. चीनमध्ये त्याची लागण पहिल्यांदा झाली.. आणि आता तो इतरत्र पसरत चाललाय. पन्नास हजाराहून अधिक लोकांना त्याची बाधा झालीय आणि दोन हजाराहून अधिक जणांचा मृत्यू झालाय. बहुतेक सगळे चीनमधलेच आहेत. चीनबाहेर आतापर्यंत फक्त तिघांनाच मरण आलंय. पण त्याची बाधा होऊ नये म्हणून लोक असा मास्क घालून वावरताहेत,’ नानांनी अधिक माहिती दिली.
‘पण नाना, व्हायरसची बाधा तर कॉम्प्युटरला होत असते ना? मग ती लोकांना कशी झाली?’ गोट्याला प्रश्न पडला.
‘तरी मी सांगत असतो गोट्या, कॉम्प्युटरवर जास्त वेळ काम करू नकोस म्हणून. आता बघ..’ बंडू म्हणाला.
‘अरे तसं नाही. खरं तर व्हायरस हा मूळचा रोगजंतूच. त्याची लागण झपाट्यानं पसरत जाते. त्यामुळं कॉम्प्युटरमध्ये घुसून त्याच्या कामात बाधा आणणाऱ्या प्रोग्रॅमला व्हायरस असं म्हटलं जातं,’ नानांनी स्पष्ट केलं.
‘नाना, तुम्हीच तर काही दिवसांपूर्वी सांगितलं होतंत, की जीवाणू म्हणजे बॅक्टेरिया हे रोगजंतू असतात,’ चिंगीनं विचारलं.
‘ते खरंच आहे. पण रोगजंतूंचा तो एक प्रकार आहे. एकमेव नाही. तसंच पाहिलं तर काही रोगजंतू बुरशींच्या जातीचे, फंगस असतात. काही प्रोटोझोआ प्रकारचे असतात तर काही जंत, कृमी असतात. व्हायरस म्हणजे विषाणू हा त्यातलाच एक प्रकार,’ नानांनी सांगितलं.
‘काय असतात हे विषाणू?’ मिंटीनं विचारलं.
‘खरं तर ते बांडगुळासारखे असतात. ते स्वतंत्रपणे वाढू शकत नाहीत. त्यासाठी त्यांना नेहमीच कोणी तरी यजमान लागतो. त्याच्या जिवावर हे वाढतात आणि मग त्यालाच मारून टाकतात,’ नाना म्हणाले.
‘यजमान?’ मुलांना प्रश्न पडला.
‘हो ना. म्हणजे कोणती तरी शरीरातली पेशी. ती पेशी निरोगीच असते. उदाहरण द्यायचं झालं तर कावीळ. काविळीच्या विषाणूला यकृताच्या पेशीच यजमान म्हणून लागतात. त्यांच्यावर हल्ला करून हे विषाणू त्या पेशीच्या आत शिरकाव करून घेतात. त्या पेशीच्या जगण्यासाठी लागणाऱ्या यंत्रणेचा ताबा घेऊन त्याचा आपली वाढ करून घेण्यासाठी वापर करतात आणि त्या प्रकारे अनेक प्रतिकृती तयार झाल्या, की त्या पेशीचा स्फोट करून बाहेर पडतात. इतर पेशींवर हल्ला करायला सज्ज होतात,’ नानांनी विस्तारानं सांगितलं.
‘हे म्हणजे त्या अरबाच्या तंबूत शिरलेल्या उंटासारखं झालं. तो उंट कसा त्या तंबूचा ताबा घेऊन मग त्या अरबालाच बाहेरचा रस्ता दाखवतो,’ मिंटी म्हणाली.
‘नाही मिंटे, तो उंट एकटाच असतो आणि एकटाच राहतो. शिवाय तो त्या अरबाला मारून नाही टाकत. त्याला घराबाहेर काढतो,’ बंड्या म्हणाला.
‘तुझं म्हणणं बरोबरच आहे, बंड्या. पण विषाणू कसे वागतात हे सांगण्यासाठी दिलेला तो एक दृष्टांत आहे. तो अगदी शब्दशः नसतो घ्यायचा. कारण या बांडगुळांच्या वागण्याची पद्धत त्या उंटांसारखीच आहे. एखाद्या यजमानाच्या पोटात शिरकाव करून घ्यायचा आणि मग त्या यजमानाच्या जिवावरच उठायचं. ते करण्याच्या पद्धतीत फरक जरूर आहे. पण मूळ तत्त्व तेच,’ नानांनी समजावलं.
‘बांडगूळ म्हणजे पॅरासाईट ना नाना?’ चंदूनं विचारलं.
‘हो. पण असं का विचारतोयस चंदू?’ नानांनी त्याला विचारलं.
‘कारण यंदा ऑस्कर मिळालंय ते ‘पॅरासाईट’ याच नावाच्या पिक्चरला. मला वाटतं तिथल्या परीक्षकांनाही याच व्हायरसची बाधा झाली असावी. म्हणून त्यांनी याच चित्रपटाची निवड केली,’ चंदू म्हणाला.
त्यावर सगळेच खो खो हसू लागले.