फक्त आडनावबंधू

डॉ. बाळ फोंडके
सोमवार, 16 मार्च 2020

कुतूहल
 

‘अरे हसतोय काय आपण? हा चंद्या कुठचाही धागा कुठंही जोडतो नेहमी. कोरोना व्हायरसपायी सारं जग हादरलंय. परिस्थिती गंभीर झालीय. म्हणून तर चंद्याचे मामा तो मास्क घालूनच आले ना?’

‘खरं आहे चिंगी तुझं. पण तोंड आणि नाक का झाकायचं हे समजलंय का तुम्हाला?’
‘कारण नाकातोंडातून तो विषाणू शरीरात शिरत असेल.’

‘खरं तर कोरोना व्हायरस तसा नवीन नाही. आपल्याला नेहमी होणारी सर्दी, तिलाही कोरोना व्हायरसच जबाबदार असतो.’
‘हात्तिच्च्या! सर्दीच ना! म्हणजे खोदा पहाड और निकला चूहा.’

‘सर्दी झाली की शिंका येतात, खोकला येतो. त्यातून मग हे विषाणू बाहेर पडून दुसऱ्यांना आपला बळी करवत असतील.’
‘पण नाना, सर्दी तशी नेहमीचीच आहे. तिची अशी जगभर कोणी भीती बाळगत नाही. मग आताच का असे सगळेच घाबरून गेलेत?’

‘परत माझ्या म्हणण्याचा विपर्यास केलाय तुम्ही. कोरोना व्हायरस हे खरं तर विषाणूंचं एक कूळ आहे. त्या कुळात निरनिराळ्या २०० जातीचे विषाणू असतात.’
'म्हणजे जोशी किंवा देशपांडे हे कूळ. कोणी एकच जण देशपांडे असत नाही. त्या आडनावाचे अनेकजण असतात. सगळे आडनावबंधू. पण प्रत्येक वेगवेगळ्या स्वभावाचा, प्रकृतीचा असतो.’

‘चांगली उपमा दिलीस, तर या कोरोना व्हायरसच्याही अनेक जाती आहेत. काही सौम्य आहेत, सामान्य सर्दीला जबाबदार असलेल्या विषाणूसारख्या. तर काही उग्र आहेत, काही वर्षांपूर्वी आलेल्या सार्स किंवा इजिप्त वगैरे भागात पसरलेल्या मर्स नावाच्या रोगाला कारणीभूत असणाऱ्या. हा नवीन कोरोना व्हायरस असाच उग्र दिसतोय. त्याची बाधा झाली की सर्दीसारखीच लक्षणं दिसतात. पण नंतर ताप वाढत जातो आणि खास करून लहान मुलं किंवा वयस्क मंडळी जास्त बळी पडतात.’

‘पण नाना, मामा सांगत होते की नुसता मास्कच नाही घालायचा, तर हात नेहमी साबणानं स्वच्छ धुवायला हवेत.’
‘हो. कारण या विषाणूचा फैलाव हा हवेतून कमी पण बाधा झालेल्या व्यक्तीच्या स्पर्शातून जास्ती होतो. हस्तांदोलन करताना आपण दुसऱ्याचा हात हातात घेतो. घट्टसा पकडतो. अशा वेळी एका हातावरचे विषाणू सहज दुसऱ्या हातावर चढतात. तो हात न धुताच आपण नाक पुसलं, काही खाल्लं, तर मग काय! विषाणूला सहजासहजी शरीरात प्रवेश मिळतो. तिथं मग धुमाकूळ घालायला स्वारी सज्ज.’

‘ऐकलंस का गोट्या, परवा मी म्हणत होतो ना की हॅंडशेकपेक्षा आपला नमस्कारच बरा. आता मिळाला त्याचा पुरावा!’
‘हो. पण बंड्या, हॅंडशेक हा एक मार्ग झाला विषाणूचा फैलाव होण्याचा. ज्याला बाधा झालीय तो समज एका खुर्चीवर बसलाय, त्या खुर्चीच्या हातावर त्यानं आपला हात अनेकवार घासलाय. त्यानंतर तूही त्याच खुर्चीवर बसलास, तर तुलाही त्या विषाणूची बाधा होऊ शकते. म्हणून तर अशा प्रत्येक कृतीनंतर हात साबणानं स्वच्छ धुणं चांगलं.’

‘पण मामा स्वतःबरोबर हॅंड सॅनिटायझरची छोटीशी बाटलीही घेऊन आलेत. ते हातावर चोळून ते हात स्वच्छ करतात.’

‘तोही एक चांगला उपाय आहे. त्या सॅनिटायझरमध्ये अल्कोहोल असतं. ते विषाणूला मारक असतं. त्यामुळं त्यानं हात धुतले, तरी विषाणूला अटकाव होऊ शकतो. जिथं पाणी आणि साबण मिळत नाही, तिथं या सॅनिटायझरचा चांगला उपयोग होतो.’

‘पण मग मास्क कशाला हवा? नाकतोंडही स्वच्छ धुतलं की झालं.’
‘असं नाही मिंटी. त्यामुळं नाकातोंडाच्या बाहेर असलेले विषाणू फार तर मारले जातील. पण ते जर हवेत असतील, तर श्वासोच्छ्‌वासातून नाही का शरीरात शिरणार? ते टाळण्यासाठीच त्या मास्कचा वापर करायचा असतो. मास्कच्या कापडातून ते विषाणू आरपार जाऊ शकत नाहीत.’

‘काय साइजचे असतात ते?’
‘ते तसे अतिशय लहान असतात. बॅक्टिरीयापेक्षाही लहान. म्हणून तर हा खास प्रकारचा मास्क वापरणं आवश्यक आहे. आपल्या नेहमीच्या कापडात तशी लहानलहान भोकं असतातच. दोन धाग्यांमधली पोकळी असते. पण हा मास्क तयार करताना त्यातली ही छिद्रं अतिशय लहान केली जातात. त्यातून हवेतले ऑक्सिजनसारखे वायू किंवा आपण सोडलेला कार्बन डाय ऑक्साइड आरपार जाऊ शकतात. पण विषाणू या वायूंच्या रेणूंपेक्षा मोठे असल्यामुळं ते अडकून पडतात.’

‘म्हणूनच मी हा मास्क घालून हिंडतोय’ आपल्या नाकावर परत तो चढवत चंदू म्हणाला.

संबंधित बातम्या