माणसांमध्ये घुसखोरी

डॉ. बाळ फोंडके
सोमवार, 23 मार्च 2020

कुतूहल
 

नाना आंघोळ आटोपून स्वस्थचित्तानं काही वाचन करावं म्हणून बसले होते. तोच वावटळ आल्यासारखी चौकडी दार उघडत घरात घुसली.
‘नाना, नाना, हा चंद्या बघा काय सांगतो आहे.’ सर्वात शेवटी आलेल्या चंदूकडं बोट दाखवत जवळजवळ सर्वच जण म्हणाले. ‘हा म्हणतोय की ते चिनी लोक साप, वटवाघूळ वगैरे काहीबाही खातात म्हणून तिथं त्यांना या कोरोनाची बाधा झालीय.’

‘त्याचं म्हणणं तसं चुकीचं नाही.’ सर्वांना शांतपणे बसायला लावत नाना म्हणाले. ‘पण त्याचा थोडासा गैरसमज झालाय. हे जे कोरोना कुळातले विषाणू आहेत ना ते मुख्यत्वे प्राण्यांमध्ये आढळतात. डुक्कर हा प्राणी या विषाणूचा सर्वात लाडका आहे. पण इतर काही प्राण्यांमध्येही हे विषाणू बस्तान बसवतात. सार्सचा विषाणू वटवाघळांमध्ये आणि त्यांच्यापासून सिव्हेट नावाच्या मांजरांच्या जातकुळीतल्या प्राण्यांमध्ये वास्तव्य करून होता. एमईआरएस या विषाणूंची बाधा त्या प्रदेशात मोठ्या संख्येनं असलेल्या उंटांना झाली होती.’

‘म्हणजे मग या प्राण्यांनाच याची बाधा होते असंच ना?’

‘तर मग आता माणसांची अशी घाबरगुंडी का उडालीय?’

‘खरं तर विषाणू आपल्या यजमानांना घट्ट धरून राहतात. एका यजमानाला सोडून दुसऱ्याच्या मागे ते लागत नाहीत.’

‘एकपत्नीव्रत पाळतात म्हणा की.’ 

‘तुम्ही म्हणाला होतात, की काविळीचा विषाणू यकृताच्या पेशींवर हल्ला करतो, तर मग तो शरीरातल्या इतर पेशींवर हमला करणार नाही.’

‘बरोबर बोललीस मिंटी. पण काय होतं, क्वचित प्रसंगी त्यांच्या सगळ्या गुणधर्मांना कारक असणाऱ्या जनुकांमध्ये बदल होतो. याला उत्परिवर्तन म्हणतात. निसर्गच असे बदल घडवून आणतो.’

‘कशाला हे नसते उद्योग करतो निसर्ग?’

‘कारण पर्यावरणातही सतत बदल होत असतात. मग त्या बदललेल्या परिस्थितीला तोंड देत तगून राहायचं, तर अंगी तशीच ताकद यायला हवी ना. गोट्या, अरे असे बदल होतात म्हणून तर उत्क्रांती होत नवे नवे प्राणी अवतरतात. वानरांपासून नर म्हणजेच माणूस प्राणी उत्क्रांत झाला तो असाच.’

‘काहींच्या बाबतीत असे बदल अजून झालेले नसावेत बहुतेक.’ बंड्याकडं बोट दाखवत मिंटी म्हणाली.

तिकडं दुर्लक्ष करत नाना पुढं सांगू लागले. ‘तसंच मग या व्हायरसच्या गुणधर्मांमध्येही बदल होत त्यांच्याकडं माणसांच्या पेशींवरही हल्ला करण्याची शक्ती येते. मर्स हा विषाणू तसंच सार्सचा कारक विषाणूही अशाच जनुक बदलापायी उपटले होते.’ 

‘मग या नव्या विषाणूनं कोणत्या प्राण्यावरून उडी घेत माणसाला बळी केलंय?’

‘या विषाणूला प्रयोगशाळेत अलग करून त्याच्या संपूर्ण जनुकसंचयाचं वाचन वैज्ञानिकांनी केलं आहे. त्याची तुलना प्राण्यांमधील विषाणूंच्या जनुकसंचयाशी केली असता हा नवा विषाणू फणा काढणारा नाग आणि पट्ट्यापट्ट्यांचा क्रेट या दोन प्रकारच्या सर्पांमधून उत्क्रांत होऊन आलेला असल्याचं स्पष्ट झालं. या दोन जातीचे साप हुबै प्रांतात वास्तव्य करून आहेत. त्यांचा खाद्यपदार्थांमध्येही समावेश होतो. त्यामुळं तिथंच या विषाणूनं प्रथम माणसांवर हल्ला केला यात नवल नाही.’

‘तरीपण त्यानं नागांना सोडून माणसांना पकडलंच कसं?’

‘तेही वैज्ञानिकांनी आता शोधून काढलंय. हे विषाणू जेव्हा कोणत्याही पेशीवर हल्ला करतात ना, तेव्हा ते तिच्या बाहेरचं जे आवरण असतं, कवच असतं, त्यावरच्या कोणत्या तरी रेणूशी संधान बांधतात. त्या रेणूला कवटाळण्याची शक्ती त्यांच्याकडं असते. एकदा का तिथं पक्के पाय रोवले, की मग त्या कवचाला भोक पाडत ते आत शिरतात. या नव्या विषाणूमध्ये जो बदल झाला ना त्यापायी त्याच्या अंगी एका नवीनच प्रथिनाचं उत्पादन झालं. त्याच्याच मदतीनं त्यानं माणसाच्या पेशींच्या कवचावर पकड घेण्याची ताकद मिळवली. त्या पेशींमध्ये घुसखोरी करणं मग सोपंच झालं.’

‘म्हणजे चंद्या सांगत होता ते खरंच होतं तर!’

‘हो पण ते साप खाल्लेच पाहिजेत असं नाही. ते हाताळले तरी त्या विषाणूचा संसर्ग होऊ शकतो. म्हणूनच तर डॉक्टर हात साबणानं व्यवस्थित धुण्याचा सल्ला देतात.’

‘चंद्या ऐकलंस ना नाना काय सांगताहेत ते. जा हात स्वच्छ धुऊन ये.’ त्याला ऑर्डर देत चिंगी म्हणाली. 

संबंधित बातम्या