उपाय काय?

डॉ. बाळ फोंडके 
सोमवार, 6 जुलै 2020

कुतूहल
डॉ. बाळ फोंडके

 

चंदू तिथून ढिम्म हलला नाही. उलट त्यानं नानांनाचं विचारलं,

‘नाना, आपण इतक्या धोकादायक आजारांवर औषधं तयार केलीत, देवी, पोलिओ यांना तर साफ पिटाळून लावलंय. मग साध्या सर्दीसारख्या दुखण्याला जबाबदार असलेल्या या विषाणूंवर का नाही काही उपाय केला?’

‘भलतंच काय विचारतोस चंद्या?’ त्याला अडवत मिंटी म्हणाली, ‘सर्दीवर आपण औषध घेतो की.. वाफा घेतो, त्या गोळ्या घेतो, आई तर काढाही करून देते.’

‘तुला माहिती आहे का मिंटी डॉक्टर काय म्हणतात ते! औषध घेतलंत तर सर्दी आठवड्यात बरी होईल, नाही घेतलंत तर सात दिवसांत.’

‘म्हणजे?’ गोंधळून जात बंड्यानं विचारलं.

‘म्हंजे वाघाचे पंजे. याचा अर्थ औषध नाही घेतलंत, तरी सर्दी बरी होईल.’

‘असं कसं असेल? औषधाविना ती बरी होणार असेल, तर औषध कशाला घ्यायचं?’

‘त्या सर्दीपायी जी लक्षणं दिसतात ती अधिक तीव्र होऊ नयेत म्हणून. हे विषाणू मी सांगितलं तसे बांडगुळासारखे असतात. म्हणजे त्यांना आपल्या वाढीसाठी नेहमी यजमान पेशींची गरज असते. त्यांना मारून टाकत त्याच्या हल्ल्याला सहजासहजी बळी पडणाऱ्या पेशी संपल्या, की मग तो काय करणार! त्याची वाढ होणं थांबतं. रोगी बरा व्हायला लागतो. म्हणूनच विषाणूंना सेल्फ लिमिटिंग म्हणतात. म्हणजे स्वतःलाच आवरणारे.’

‘सर्दीचं ठीक आहे नाना. ती झाल्यानं बेजार व्हायला होतं. पण कोणी मरत नाही. या कोरोना व्हायरसचं तसं थोडंच आहे! तसं असतं तर आजवर दोन हजारांहून अधिक लोक मरण नसते पावले.’

‘खरंय. तरीही त्याच्यावरही रामबाण औषध नाही. फक्त त्याची तीव्रता वाढू न देण्याची खबरदारीच घेतली जाते. आपल्या शरीराची प्रतिकारशक्तीही विषाणूशी लढत राहते. ज्यांची ही प्रतिकारशक्ती दुबळी झालीय किंवा अजून नीटशी विकसित झालेली नाही अशीच मंडळी बळी पडतात. म्हणून तर वयस्क आणि अगदी लहान मुलं यांना जास्ती धोका असतो.’

‘पण मला कळत नाही नाना, हे सायंटिस्ट इतकी फुशारकी मारतात की या रोगावर जबरदस्त औषध शोधलंय, त्या रोगाचा कायमचा बंदोबस्त केलाय. मग या विषाणूपुढंच ते हात का टेकतात?’

‘त्याचं कारणही विषाणूंच्या वाढीच्या पद्धतीत दडलंय. बॅक्टीरिया कसे पेशीबाहेर स्वतंत्रपणे वाढतात. त्यामुळं त्यांच्याविरुद्ध औषधाची तोफ डागता येते. त्यांना मारून टाकता येतं. पण विषाणू बांडगुळासारखे वाढतात. पेशीच्या आत लपून-छपून बसतात. त्यांना मारायचं तर मग त्या पेशीलाही मारावं लागेल. पेशीला धक्का न पोचता थेट त्या विषाणूवर नेम कसा साधायचा हेच कळत नाही. त्यामुळंच मग त्यांच्यावर उपयोगी औषध तयार करणं कठीण होतं.’

‘म्हणजे विषाणूंनी नामोहरमच केलंय म्हणा की आपल्याला.’

‘असंच काही नाही. एड्स या रोगालाही विषाणू कारणीभूत आहे. पण त्याच्या विरुद्ध औषध तयार केलंच आहे. त्यापायीच त्या रोगाला बऱ्याच प्रमाणात अटकाव करणं शक्य झालंय.’

‘पण तो विषाणूही पेशीमध्ये दडून बसत असेल ना, मग त्याला कसं काय हटवलं जातं?’

‘जोवर तो पेशीमध्ये आहे तोवर काहीच करता येत नाही. पण एकदा का त्या पेशीचं पोट फाडून तो बाहेर आला आणि इतर पेशींवर हमला करायला सज्ज झाला, की त्याला त्या इतर पेशींच्या आवरणावरच्या रेणूंना मिठीच मारता येणार नाही अशी व्यवस्था करता येते. तसं झालं की मग विषाणूंना यजमान पेशींचा आसरा घेताच येत नाही. साहजिकच त्यांची पीछेहाट होते.’

‘तसं आहे तर मग त्यांच्याविरुद्ध लस तयार करून आधीच त्यांचा बंदोबस्त करावा. देवी, पोलिओ यांच्याविरुद्ध पॉवरफुल लस तयार करूनच त्यांचा नायनाट केला ना आपण. तो अमिताभ बच्चन नाही का म्हणत, दो बूंद जिंदगीके.’

‘पण लस तयार करण्यासाठी विषाणूची प्रयोगशाळेत वाढ करावी लागते. ती करायची तर मग यजमान पेशीचीही गरज भासते. ती मिळणं कठीण असतं. त्यामुळंच लस निर्माण करण्याचे प्रयत्न असफल होतात. तरीही चिकाटीनं वैज्ञानिक लस तयार करतातच. सार्सविरोधी लस त्यांनी तशीच तयार केलीय. मात्र त्याला वेळ लागतो. त्या सार्सविरोधी लसीतच सुधारणा करून कोरोनाविरोधी लस तयार करण्याचे प्रयत्न आता होत आहेत.’

‘ती झाली की मग हा बुरखा घालण्याची गरजच उरणार नाही.’ हातातला मास्क हवेत उडवत चंदू म्हणाला. त्याला टपली मारत चौकडी पसार झाली.

संबंधित बातम्या