चंद्र नसता तर...

डॉ. बाळ फोंडके
सोमवार, 13 जुलै 2020

कुतूहल 

आज चंद्रग्रहण होतं. ते पाहण्यासाठी चौकस चौकडी रात्रीच्या जेवणानंतर कट्ट्यावर जमली होती. नानाही येणार होते. त्यांचीच वाट पाहत सगळे बसले होते. 

‘आज खग्रास ग्रहण आहे. म्हणजे चंद्र मुळीच दिसणार नाही तर.’ मिंटी म्हणाली.

‘हो ना. खरं तर आज पौर्णिमा आहे. पण अमावस्या असल्यासारखा अंधार पडेल. चंद्र गायबच होईल.’

‘चंद्या गायब होणार म्हणजे तो नाहीसा होणार नाही. तो आपल्या जागी असणारच आहे. फक्त तो आपल्याला दिसणार नाही. कारण पृथ्वीची सावली त्याच्यावर पडलेली असेल.’

‘पण समजा चिंगे, तो खरोखरीच गायब झाला तर!’

‘असा कसा गायब होईल? तो आपला म्हणजे पृथ्वीचा उपग्रह आहे ना!’

‘म्हणून काय झालं’ असे दुसरेही काही ग्रह आहेत, की ज्यांना उपग्रहच नाहीत. त्यांचं ठीक चाललंय ना!''

‘अरे गोट्या पण त्यांना मुळापासूनच उपग्रह नव्हते, पण आपल्याला आहे. म्हणजे त्याचा काही तरी परिणाम होतच असेल. आता तो नाहीसाच झाला तर मग...’

‘...तर मग बरंच काही होईल.’ एकदम आकाशवाणी झाल्यासारखं कोणीतरी बोललं. कोण म्हणून सगळे वळून पाहतात तो नाना, तिथं हजर झालेले. त्यांना बसायला जागा करून देत मंडळींनी कोरसमध्ये विचारलंच, ‘बरंच म्हणजे काय काय होईल?’

‘अरे विचार करा, चंद्राचा पृथ्वीवर काय परिणाम होतो?’

‘हं आठवलं, चंद्र आहे म्हणून समुद्राला भरती येते, ओहोटी होते.’

‘भले शाबास बंड्या. चंद्राचं गुरुत्वाकर्षण तसं पृथ्वीच्या मानानं दुबळं असलं, तरी ते पृथ्वीला जाणवतंच. त्याचा प्रभाव पृथ्वीवर पडतोच आणि त्याचपायी भरतीओहोटी चक्र इथं साकार होतं.’

‘पण नाना, चंद्राच्या गुरुत्वाकर्षणाचा प्रभाव संपूर्ण पृथ्वीवर पडत असेल, तर मग फक्त समुद्रावरच त्याचा परिणाम का होतो?’

‘तुझं म्हणणं बरोबर आहे चंदू, तसा त्याचा प्रभाव सर्वत्रच पडतो. पण चंद्राच्या मानानं पृथ्वीचं वस्तुमान खूपच जास्ती आहे. त्यामुळं घन असलेली जमीन त्याच्याकडे जाणवेल इतक्या प्रमाणात ओढली जात नाही. पाणी मात्र प्रवाही असल्यामुळं ते त्याच्या दिशेनं खेचलं जातं. त्यामुळंच समुद्रावर भरतीओहोटीचा नाच सुरू होतो. आता चंद्रच नसला तर ते चक्र थांबेल.’

‘आणि नाना, नाना, चंद्रच नसला तर ग्रहणंही होणार नाहीत.’ उत्साहानं उठत चंदू म्हणाला.

‘अॅ हॅ हॅ, काय पण सांगितलं विद्वान महाशयांनी. चंद्र नसला तर चंद्रग्रहण होणार नाही. कोणालाही समजतं हे. त्यात काय मोठ्ठा शोध लावलास?’

‘ते मलाही कळतंय चिंगे. पण मी म्हणत होतो, की कोणतंच ग्रहण होणार नाही. सूर्यग्रहणही होणार नाही.’

‘काय बोलतोयस? चंद्रच नाहीसा होईल, सूर्य नाही. तो असणारच आहे.’

‘हो पण चंद्याचं म्हणणं बरोबरच आहे. पृथ्वी आणि सूर्य यांच्यामध्ये चंद्र येतो. त्याची सावली पृथ्वीवर पडते म्हणून सूर्यग्रहण होतं. आता चंद्रच नसला, तर कोण येणार आहे अध्येमध्ये कडमडायला?’

गोट्याचा सवाल बिनतोड होता. क्षणभर सगळेच गप्प बसले.

‘चांगला विचार करताहात तुम्ही. पण चंद्र नसेल तर पृथ्वीच्या स्वतःभोवतालच्या गिरकीवरही परिणाम होईल. ती अधिक वेगानं फिरायला लागेल. तिचा वेग वाढेल.’

‘पण नाना, चंद्र तो केवढासा! पृथ्वी केवढी! असा कितीसा फरक पडणार आहे.’

‘चांगलाच, आपल्याला सहजी जाणवेल एवढा. मला सांगा पृथ्वीच्या गिरकीचा वेग किती आहे?’

‘ती स्वतःभोवती एक प्रदक्षिणा चोवीस तासांत पूर्ण करते.  

म्हणजे पृथ्वीवरचा एक दिवस चोवीस तासांचा असतो. आणि वर्षात तीनशे पासष्ट पूर्णांक एक चतुर्थांश दिवस असतात.’ गोट्यानं पाठ्यपुस्तकातलं पाठ केलेलं वाक्य बोलून दाखवलं.

‘पण चंद्र नसेल तर तीच प्रदक्षिणा पृथ्वी सहा ते दहा किंवा सरासरी आठ तासांत पूर्ण करेल. म्हणजेच दिवस फक्त आठ तासांचा असेल. चार तास दिवस आणि चार तास रात्र.’

‘म्हणजे वर्ष हजार दिवसांचं होईल. शाळाही तितके दिवस भरेल.’

‘आणि तुला लोळतही पडता येणार नाही चंद्या, चार तास झाले की सूर्य उजाडेल. तुला उठावंच लागेल.’

यावर सगळे हसत सुटले.

संबंधित बातम्या