कललेली पृथ्वी

डॉ. बाळ फोंडके
सोमवार, 3 ऑगस्ट 2020

कुतूहल

‘एवढ्यानं काय होतंय? आणखीही बरंच काही होईल,’ नाना म्हणाले.

‘काय, काय?’ कोरस विचारता झाला.

‘त्यासाठी चंद्राचा जन्म कसा झाला हे बघायला हवं.’

‘मला माहिती आहे चंद्राचा जन्म कसा झाला ते,’ मिंटी म्हणाली. ‘पृथ्वीचा टवका उडाला आणि त्याचाच चंद्र झाला.’

‘पण टवका उडालाच कसा?’

‘साधारण पाच अब्ज वर्षांपूर्वी, बरं का चंदू, एक उल्का येऊन आदळली पृथ्वीवर.’

‘हात्तेच्च्या! अशा कितीतरी उल्का दररोजच आदळत असतात. गेल्या वर्षी आम्ही तारांगणात बघायला गेलो होतो उल्कावर्षाव. त्यावेळी तर रात्रभर पाऊस पडल्यासारख्या उल्का पडत होत्या. पण त्यामुळं काही हजारो चंद्र नाही जन्माला आले.’

‘नाहीच येणार गोट्या. कारण त्या उल्का अगदीच एखाद्या छोट्या ढेकळासारख्या असतात आणि पृथ्वीवर पोचेपर्यंत वातावरणात होणाऱ्या घर्षणानं बऱ्याचशा जळून जातात. पण ही उल्का होती प्रचंड. मंगळ ग्रहाएवढी मोठी. आता एवढा मोठा आघात झाल्यावर पृथ्वीचा काही भाग तिच्यापासून वेगळा झाला नसता तरच नवल. तरीही तो पृथ्वीच्या गुरुत्त्वाकर्षणाची ओढ टाळून दूर जाऊ शकला नाही. पृथ्वीभोवतीच घिरट्या घालत राहिला. तोच चंद्र.’

‘पृथ्वीची झीज झाली पण बरं झालं. त्यामुळंच रात्रीही प्रकाश मिळायला लागला आपल्याला आणि भरती ओहोटीचं चक्रही.’

‘आणि माझ्या झोपेचीही सोय झाली.’

‘पण चंदू हे प्रकरण तेवढ्यावरच थांबलं नाही. आता समज तुझ्यापेक्षा लहान पण चांगला वजनदार मुलगा येऊन तुझ्यावर आदळला तर काय होईल? तूही काही होता तसाच राहणार नाहीस. अगदीच पडला नाहीस तरी थोडाफार झुकशील ना? काय?’

‘म्हणजे पृथ्वी त्यावेळी झुकली असं म्हणायचंय तुम्हाला नाना?’

‘तर काय! तिचा अक्ष तिरका झाला. २३ अंश वाकलेला झाला. पण परत चंद्राच्या गुरुत्त्वाकर्षणानं तिला वाचवलं. ती आणखी तिरकी नाही झाली. सध्या आहे तेवढीच राहिलीय.’

‘म्हणजे आता चंद्र नसता तर ती तशी वाकलीच नसती?’

‘अगं होच. कारण चंद्र नाही म्हणजे त्याचा जन्मच नाही. म्हणजे ती उल्का आदळण्याचाही प्रश्‍न नाही. साहजिकच मग पृथ्वी अशी तिरकी होणार नाही.’

‘आणि ती तिरकी झाली नाही तर मग आताचे वेगवेगळे ऋतू आपल्याला अनुभवायला मिळतात तेही तसे मिळाले नसते. वर्षभर सगळीकडं एकच एक ऋतू.’

‘म्हणजे सगळीकडं आपल्यासारखा उन्हाळा, उन्हाळा आणि उन्हाळा.’

‘नाही नाही, तसं नाही. कारण विषुववृत्तावर सदोदित उन्हाळा असला, तरी जसजसं आपण त्याच्यापासून दूर जात राहू तसतसं तापमान उतरत राहणारच. ध्रुवप्रदेशात थंडी असणारच. पण आजही तिथं कसं सहा महिने रात्र, हिवाळा आणि अतिथंड तापमान असतं आणि सहा महिने दिवस, मध्यरात्रीही सूर्य तळपत राहतो आणि त्यामुळं तापमान तुलनेनं जास्ती...’

‘....म्हणजे तसा उन्हाळाच.’

‘तसं असणार नाही. वर्षभर जवळजवळ सारखंच तापमान राहील.’

‘पण नाना तिथल्या दिवस रात्रीचं चक्रही बदलेल.’

‘बरोबर वर्षभर मध्यरात्रीचा सूर्य पाहता येईल. कारण वर्षभर तो क्षितिजाला धरूनच राहील. म्हणजे तिथं तशी रात्रच होणार नाही.’

‘तुझी तर पंचाईतच होईल चंद्या. रात्र नाही तर तू झोपणार कधी?’

‘तो काय दिवसाही झोपा काढतो. त्याला काहीच फरक पडणार नाही.’

‘नाना, चंद्राचा जन्मच झाला नसता तर असं झालं असतं. पण आता तर चंद्र आहे आणि त्यामुळं दिवसही चोवीस तासांचा झाला आहे. शिवाय पृथ्वी तिरकी झाल्यामुळं निरनिराळे ऋतूही आहेत. पण आता समजा तो गायब झाला तर?’

‘तर पृथ्वीचा हा जो कललेला अंश आहे त्याच्यात बदल होईल. कारण तो स्थिर ठेवण्यात चंद्राच्या गुरुत्त्वाकर्षणाचा सहभाग आहे. त्यामुळं तो परत सरळ होईल आणि मग आताच आपण पाहिलं तशी स्थिती होईल किंवा तो अधिकच कलेल आणि पृथ्वी आडवी होऊन सूर्याभवती घिरट्या घालायला लागेल.’

‘म्हणजे आमच्या चंदामावशीच्या मुलीसारखी. ती अशी गडबडा लोळतच पुढंमागं सरकत राहते.’

‘पण पृथ्वी अशी आडवी झाली, तर आपण उभे कसे राहणार? आपणही आडवे होणार की काय?’

‘म्हणजे चंद्याचं फावलंच म्हण की. आपोआपच आडवा होईल तो.’

संबंधित बातम्या