दुतोंड्या चंद्र

डॉ. बाळ फोंडके 
सोमवार, 10 ऑगस्ट 2020

कुतूहल

‘तर असा हा चंद्र. त्याच्या आणखीही गमतीजमती आहेत बरं का..’ नाना म्हणाले. 

‘कोणत्या, कोणत्या नाना?’ मुलांनी एका सुरात विचारले. 

‘मी सांगते, परवाच कुठं तरी वाचलं मी...’ मिंटी म्हणाली. 

‘सांग, सांग, सांगूनच टाक काय वाचलंस ते..’ चिंगी म्हणाली. 

‘.. की चंद्र दुतोंड्या आहे,’ मिंटी उत्तरली. 

‘दुतोंड्या? पण तो बोलतोच कुठं? दुतोंड्या म्हणजे दोन्ही बाजूंनी बोलणारा..’ चंदू म्हणाला. ‘अरे तसं नाही तिला दोन चेहरे म्हणायचं असणार,’ गोट्यानं परस्पर उत्तर दिलं. 

‘बरोबर. चंद्राला दोन चेहरे आहेत..’ मिंटी म्हणाली. ‘माहिती आहे. यात काय मोठं सांगितलंस! पण आपल्याला त्याचा एकच चेहरा नेहमी दिसतो. म्हणजे मी जर या गोट्याकडं नेहमी तोंड करूनच त्याला प्रदक्षिणा घातली तर त्याला फक्त माझा चेहराच दिसेल, माझी पाठ दिसणारच नाही,’ बंडू म्हणाला. 

‘मी कधीच कोणाला पाठ दाखवत नाही,’ चंदू म्हणाला. ‘उगीच फुशारक्या नको मारूस चंद्या. मिंटीला काय म्हणायचंय ते कळलंय आम्हाला. पण यात नवीन काहीच नाही. चंद्राचा एकच चेहरा नेहमी आपल्याला दिसतो, दुसरा नेहमी पलीकडंच असतो. म्हणून तर त्याला ‘डार्क साईड ऑफ द मून’ म्हणतात,’ आता चिंगी सरसावली. ‘त्याचं कारण बरं का चिंगी तो दुसरा आपल्याला दिसतच नाही. त्यामुळं तो कसा आहे याविषयी आपण अंधारातच राहिलो होतो,’ नानांनी माहिती दिली. 

‘राहिलो होतो म्हणजे नाना? आता तसा तो अंधारात राहिलेला नाही? आपल्याला दिसायला लागलाय?’ मुलांचे प्रश्‍न. 

‘नाही तो दिसायला नाही लागलेला. पण अमेरिकेनं, आपणही, चंद्राभोवती प्रदक्षिणा घालणारे जे उपग्रह पाठवले होते त्यांनी त्या पलीकडच्या अदृश्य राहिलेल्या भागाची उत्तम चित्रं पाठवली आहेत. त्यामुळं त्या दुसऱ्या चेहऱ्याची पुष्कळ माहिती हाती आली आहे,’ नाना म्हणाले. ‘पण त्यानं तशी निराशाच केली असणार. तोही चेहरा आपल्याला दिसतो तसाच असणार,’ गोट्या म्हणाला. 

‘असंच काही नाही गोट्या. म्हणजे बघ आपली पृथ्वी गोल आहे. ती स्वतःभोवती गिरकी घेते. त्यामुळं तिच्या सर्व बाजू मंगळाला दिसतात. पण बंड्या, समज पृथ्वीही सूर्याभोवती प्रदक्षिणा घालताना चंद्रासारखीच वागली असती तर तिचा एकच भाग इतरांना दिसला असता. त्यावरून दुसराही भाग तसाच असेल असं म्हणता आलं असतं का? कारण एका भागातली जमीन आणि पाणी यांची स्थिती दुसऱ्या भागापेक्षा वेगळीच आहे. एका भागातल्या जमिनीचं खंडही दुसऱ्या भागातल्या जमिनीच्या खंडापेक्षा वेगळी आहेत,’ चिंगी म्हणाली. 

‘हो, पण चिंगी, त्याचं कारण पृथ्वीवर पाणी आहे, म्हणून समुद्र आहेत. चंद्रावर कुठं आहेत समुद्र?’ बंडू म्हणाला. 

‘नाहीत खरे बंड्या. पण समुद्रासारखेच दिसणारे काही भाग आहेत. ते इतर भागापेक्षा अधिक काळपट दिसतात. त्यांना मारिया म्हणजे लॅटिन भाषेत समुद्रच म्हणतात. आपल्याला दिसणाऱ्या भागात ते आहेत. पण पलीकडच्या भागात त्यांचा पत्ताच नाही. झालंच तर त्या दुसऱ्या भागातलं कवच अधिक जाडसर आहे. आपल्याला दिसणाऱ्या भागात ते तेवढंसं नाही,’ नानांनी उत्तर दिलं. 

‘मग तिकडे ते मारिया का नाहीत हे उघड आहे. तुम्हीच सांगता ना नाना, की पृथ्वीवर सतत उल्का आदळत असतात. तशाच त्या चंद्रावरही आदळत असतील हो ना?’ चंदूनं विचारलं. 

‘हो तर. दूर अवकाशातून त्या येतात. पृथ्वीवर येतात तशाच त्या चंद्रावरही पडत असणार,’ मिंटी म्हणाली. 

‘आपली पृथ्वी खूप मोठी आहे. त्या मानानं उल्का लहान असतात. त्या कितीही वेगानं आदळल्या तरी पृथ्वीला त्या काही नुकसान पोचवू शकत नाहीत..’ गोट्या म्हणाला. 

‘नाही कशा गोट्या? गेल्या वर्षी आपण ते लोणार सरोवर पाहायला गेलो होतो. तिथं त्या सरांनी काय सांगितलं होतं ते आठवतंय ना?’ चिंगीनं विचारलं. 

‘अगं हो. एक उल्का येऊन आदळली आणि त्यामुळं तिथं ते विवर पडलं आणि त्याचं नंतर सरोवरात रुपांतर झालं. म्हणजे उल्का मोठी असेल तर त्यामुळं अशी विवरं पडू शकतात..’ बंडू म्हणाला. 

‘तसंच चंद्राचं झालं असणार. अलीकडच्या भागातलं कवच तेवढंसं जाड नाही, त्यामुळं तिथं उल्का आदळून अशी विवरं तयार झाली असतील. पण तिथं पाणीच नसल्यामुळं त्यांचं सरोवरात किंवा समुद्रात रुपांतर झालं नाही. उलट पलीकडच्या भागातल्या जाड कवचानं त्या उल्कांच्या माऱ्याला दाद दिली नाही. ते अखंडच राहिलं. साहजिकच तिथं मारिया तयार झाले नाहीत,’ मुलं म्हणाली. ‘पण पाणी आहे ना! चंद्रयानानंच तर ते शोधून काढलं,’ चंदू म्हणाला.  ‘हो पण समुद्र होण्याइतकं नाही. पाण्याचा पातळसा पापुद्राच आहे. त्याचा कसा समुद्र बनणार चंद्या?’ गोट्या म्हणाला.

संबंधित बातम्या