नवा चंद्र 

डॉ. बाळ फोंडके 
सोमवार, 24 ऑगस्ट 2020

कुतूहल

नाना सकाळचा चहा घेऊन जरा निवांत बसले होते, तोच धाडकन दरवाजा उघडून एखाद्या झंझावातासारखी चौकस चौकडी आत घुसली... 

‘नाना, हा चंद्या बघा नेहमीप्रमाणं काहीतरी बकतोय. म्हणतोय भाऊ झाला,’ गोट्यानं तक्रार केली. 

‘झाला नाही, मिळाला असं म्हणालो मी,’ चंदूनं उत्तर दिलं. 

‘तेच ते. झाला काय, मिळाला काय?..’ एक सूर.. 

यावर चौकडीत दोन तट पडले आणि एकमेकांवर जोरजोरानं ओरडू लागले. हाताच्या इशाऱ्यानं त्यांना थोपवत नानांनी विचारलं, 

‘अरे हो, हो.. मला समजेल असं काही सांगाल? कोणाला भाऊ झाला, किंवा मिळाला?’ 

‘चंद्राला,’ पुन्हा एक सूर. 

‘म्हणजे आपल्या जाधवांची चंद्रा? पण तिची आई काही गर्भवती नव्हती.. आणि मिळाला म्हणत असशील तर त्यांनी कोणाला दत्तक वगैरे तर घेतलेलं नाही ना?’ नानांनी विचारलं. 

यावर चौकडी जोरजोरानं हसत सुटली. 

‘नाना, ती चंद्रा नाही. चंद्राला म्हणजे आपला पृथ्वीचा जो उपग्रह आहे ना चंद्र, तो आजवर एकटाच होता. पण आता एक नवा चंद्र सापडलाय. म्हणून त्याला भाऊ मिळाला असं म्हणत होतो मी,’ चंदू हसत हसत उत्तरला. 

‘खरं आहे का हो हे नाना?’ मिंटीनं विचारलं. 

‘हो खरं आहे. गेल्या १९ फेब्रुवारीला अमेरिकेतील अॅरिझोना राज्यातल्या कॅटॅलिना स्काय सर्व्हे या संस्थेत काम करणाऱ्या शास्त्रज्ञांना एक वस्तू वेगानं आकाशातून जाताना दिसली. तशी ती अंधुक अंधुकच दिसत होती. पण तिच्यावर बारीक लक्ष ठेवता ती पृथ्वीभोवती घिरट्या घालत असल्याचा निष्कर्ष त्यांनी काढला,’ नानांनी सांगितलं. 

‘पण त्यांना एकट्यांनाच ती वस्तू दिसली ना?’ चिंगीनं विचारलं. 

‘सुरुवातीला फक्त त्यांनाच. पण त्यांनी ते जाहीर केल्यानंतर इतरही पाहायला लागले. तेव्हा इतर सहा ठिकाणच्या शास्त्रज्ञांनाही ती दिसली. त्यांनी तिला नावही दिलं २०२० सीडी ३,’ नानांनी माहिती दिली. 

‘पण ती अशी प्रदक्षिणा घालतेय कशावरून?’ बंडूला प्रश्‍न पडला. 

‘कारण ती वस्तू ठराविक कक्षेतून फिरत होती. प्रत्येक प्रदक्षिणेला लागणारा वेळही सहा वेगवेगळ्या ठिकाणांहून..’ नाना. 

‘.. सहा नाही, नाना, सात. सुरुवातीचं अमेरिकेतलं एक आणि मग सहा इतर. म्हणजे सात नाही का झाले?’ गोट्या म्हणाला. 

‘शाब्बास गोट्या. बरोबर आहे तुझं. तर या सात ठिकाणांहून तिच्या प्रदक्षिणेचा वेळ मोजला गेला. तो सारखाच आला. त्यामुळं ती प्रदक्षिणा घालतेय हे नक्की झालं. तसंच तिच्या प्रदक्षिणेचं कारणही समजलं. कारण त्या वस्तूवरच्या पृथ्वीच्या गुरुत्वाकर्षणाच्या ओढीनं ती पृथ्वीला बांधली गेली होती,’ नाना म्हणाले. 

‘आपल्या चंद्रासारखीच,’ चंदू उत्तरला. 

‘हो चंदू, म्हणून तर तिला चंद्र म्हटलं गेलंय. त्याचीही एक गंमतच आहे. आपला चंद्र म्हणजे पृथ्वीचा उपग्रह. त्याला चंद्र हे नाव आपण दिलं. पण आता कोणत्याही ग्रहाच्या उपग्रहांना चंद्रच म्हटलं जातं. हे म्हणजे त्या झेरॉक्ससारखं झालं,’ नाना म्हणाले. 

‘काय? म्हणजे हा नवीन चंद्र आपल्या जुन्या चंद्राची कॉपी आहे?’ बंडूला पुन्हा प्रश्‍न पडला. 

‘नाही, नाही. पण झेरॉक्स हे फक्त अशी कॉपी करणारी यंत्रं बनवणाऱ्या एका कंपनीचं नाव आहे. पण आता त्या प्रक्रियेलाच सरसकट झेरॉक्स म्हटलं जातं. ते यंत्र कोणत्याही कंपनीचं असलं तरी. तसंच या नव्या उपग्रहालाही चंद्रच म्हटलं गेलंय. तर हा नवीन चंद्र गेली तीन वर्षं आपल्या भोवती असा प्रदक्षिणा घालतोय. आपल्याला आताच त्याचा पत्ता लागला,’ नाना म्हणाले. 

‘असं का? त्याच्यामुळंही भरती ओहोटी येतच असेल. तिच्यावरून त्याचा सुगावा का नाही लागला?’ चिंगीनं विचारलं. 

‘भरती ओहोटी येतात त्या चंद्राच्या गुरुत्वाकर्षणाच्या ओढीपायी. हा जो नवीन चंद्र आहे त्याचं गुरुत्वाकर्षण तेवढं प्रभावी नाही. कारण तो अतिशय लहान आहे. इटुकला पिटुकलाच म्हणायला हवं,’ नाना म्हणाले. 

‘तरीही त्याला काही आकारमान, वस्तुमान असेलच ना?’ मिंटीनं विचारलं. 

‘आहेच मुळी मिंटी. त्याचा व्यास केवळ दोन ते तीन मीटर आहे. म्हणजे एखाद्या मोटारीएवढा. त्याचं वस्तुमान तसं असून असून किती असेल? अर्थातच त्याच्या गुरुत्वाकर्षणाची ओढही तशी बेताचीच आहे. त्याची कक्षाही तशी स्थिर नाही. तिचं जे काही गणित केलं गेलंय त्यानुसार हा चंद्र असाच थोडाफार भरकटत जाऊन कधी तरी पृथ्वीच्या गुरुत्वाकर्षणाच्या प्रभावापलीकडं फेकला जाईल असाच शास्त्रज्ञांचा कयास आहे,’ नानांनी माहिती दिली. 

‘म्हणजे हा नवा चंद्र फार दिवस काही आपल्याजवळ राहणार नाही. जसा आला तसाच धुमकेतूसारखा एक दिवस निघूनही जाईल,’ चंदू म्हणाला. 

‘तसेच आता तुम्हीही निघा. मला बरीच कामं आहेत आज...’ चौकडीला पिटाळत नाना म्हणाले.

संबंधित बातम्या