कवचकुंडलं 

डॉ. बाळ फोंडके 
सोमवार, 21 सप्टेंबर 2020

कुतूहल 

सगळे जण जमले होते. नाना यायची वाट पाहत होते. तेवढ्यात गोट्या म्हणाला, 

‘आज तरी नेटवर्कची मेहरबानी असू दे.’ 

‘हो रे, गेल्या वेळेसारखं ते वरचेवर तुटलं नाही म्हणजे मिळवली. नाहीतर सगळा मझाच किरकिरा होऊन जातो बघ,’ चिंगीनं दुजोरा दिला. 

‘पण चिंगे मला दुसरीच शंका आहे. नाना म्हणाले होते, की आपल्याला रोगजंतूंचा वेढाच पडलेला आहे. तरीही आपण एकसारखे काही आजारी पडत नाही. निरोगीच राहतो. ते कसे?’ मिंटीनं विचारलं. 

‘मिंटे, आहे खरा तुझा प्रश्न विचार करण्याजोगा. नानांनाच विचारायला हवं. हे बघ आलेच ते..’ चिंगी उत्तरली. 

‘ऐकला मी तुझा प्रश्न मिंटे. आपल्या अवतीभवती असा रोगजंतूंचा वेढा घातलेला असला तरी आपल्याला तक्रार करायला निसर्गानंच वाव ठेवलेला नाही. कारण निसर्गानं आपल्या शरीरालाही भक्कम संरक्षण व्यवस्था, इम्युन सिस्टीम, बहाल केलेली आहे. जणू कवचकुंडलंच. अगदी बांधेसूद आणि नियोजनबद्ध आहेत ती,’ नाना उत्तरले. 

‘पण रोगजंतू तर कुठूनही हमला करू शकतात..’ चंदूनं विचारलं. 

‘खरंय. तरीही आपल्या शरीराच्या, अंगदेशाच्या, संरक्षणासाठी निसर्गानं त्वचा ही भक्कम तटबंदी सर्वदूर उभी केलेली आहे. तिच्यातून आरपार जाणं अशक्यच आहे. कोणताही रोगजंतू ही तटबंदी सहसा पार करू शकत नाही,’ नाना उत्तरले. 

‘पण नाना आपली कातडी फाटू शकते. म्हणजे मग या तटबंदीला खिंडार पडलंच की!’ आता बंडूला प्रश्‍न पडला. 

‘पण बंड्या ही भेगही लगबगीनं बुजवून तटबंदी पूर्वीसारखी करण्याचं कामही शरीर तत्परतेनं करत असतं. आपल्या या अंगदेशाच्या संरक्षण दलाचे जवान आहेत श्वेत पेशी, व्हाईट ब्लड सेल्स, खास करून लिम्फपेशी. जिथून जिथून शरीरात रोगजंतूंचा शिरकाव होण्याची शक्यता आहे तिथं तिथं या लिम्फपेशींचे तळ ठेवले गेले आहेत. यांना लिम्फनोड म्हणतात. नाकातून रोगजंतूंचा संसर्ग होण्याची शक्यता आहे म्हणून नाकाच्या दोन्ही बाजूंना, तोंडावाटे रोगजंतूंचा हमला होऊ शकतो म्हणून टॉन्सिल्समध्ये आणि अन्ननलिकेच्या बाजूंना, फाटलेल्या त्वचेतून हल्लेखोर शिरू शकतात. त्यामुळं त्वचेच्या खाली शरीरभर हे लिम्फनोड वसवलेले आहेत,’ नानांनी अगदी सविस्तर शंकानिरसन केलं. 

‘पण आपल्या खाण्यातून त्यांनी शिरकाव केला तर?’ चंदूचा प्रश्‍न होताच.. 

‘त्यासाठी चंद्या, अन्नमार्गाच्या आजूबाजूला सगळीकडे लिम्फनोड्स आहेत. शिवाय रक्तामधून तर हे जवान सतत गस्त घालतच असतात. त्याशिवाय प्लीहा हे या लिम्फपेशींचं एक मोक्याचं ठाणं आहे,’ नाना म्हणाले. 

‘नाना, मला हे कळत नाही की या सैनिकांना हा रोगजंतू आहे हे कळतं कस? कारण आपण शरीरात अन्नही घेतो, त्यात निरनिराळे पदार्थ असतात, निरनिराळी रसायनं असतात. पाणी पितो, चहा, कॉफीसारखी पेयंही घेतो. शिवाय रोग बरा करण्यासाठी औषधंही घेतो. मग त्यातून नेमकी रोगजंतूंची ओळख कशी होते?’ चंदूनं पुन्हा विचारलं. 

‘म्हणजे जागा आहेस तू चंद्या, कधी नव्हे तो..’ मिंटीनं नेहमीप्रमाणं त्याची कळ काढली. त्यावर रागावून तो काही बोलणार तो नानाच म्हणाले, 

‘पण त्यानं विचारलेली शंका मोठी मार्मिक आहे बरं! जसं देशाबाहेरून प्रवेश घेणाऱ्या प्रत्येकाला आपली ओळख पटवणारं पारपत्र सीमेवरील गस्तीदलाला दाखवावं लागतं, त्याची तपासणी होते, तशीच अंगदेशात बाहेरून येणाऱ्या प्रत्येकाची ओळख पटवण्याची क्षमता या संरक्षण दलाला बहाल करण्यात आली आहे. प्रत्येक पदार्थाच्या बाह्यांगावर त्याची निर्विवाद ओळख पटवणारे काही रेणू असतात. यांना अॅन्टिजेन म्हणतात. जणु ते रेणू म्हणजे त्या पदार्थाचा पासपोर्टच! त्याची तपासणी करून मग तो आगंतूक आपलाच आहे की परका आहे हे या लिम्फपेशी ओळखतात. परक्या असलेल्या पदार्थाला रीतसर अंगदेशात शिरण्याची परवानगी असेल तर त्याला विनाअडथळा आत येऊ देतात. शरीराला आवश्यक असणारे पोषक पदार्थ, पाणी यांचा यात समावेश होतो. पण कोणी परका वाईट हेतूनं आल्याची कुणकुण लागली की तातडीनं आपल्या मुख्यालयाला ते संदेश पाठवतात.’ 

‘पण आपला कोण आणि परका कोण हेही ओळखता यायला हवं ना!’ मिंटीनं विचारलं. 

‘हो तर. त्यासाठी आप-पर भावाचं सूत्र वापरलं जातं. या पेशींना ते शिक्षण उपजतच मिळतं,’ नानांनी उत्तर दिलं. 

‘म्हणून ते आपला किंवा आपल्याला उपयोगी पडणाऱ्यांना सहजासहजी येऊ देतात. कोणतंही औषध तसं परकंच. पण ते आपल्या मदतीला आलंय हे या सैनिकांना समजतं. म्हणून ते त्याला अडवत नाहीत,’ यावेळी गोट्यानंच परस्पर उत्तर दिलं. 

‘अगदी योग्य बोललास गोट्या,’ नानांनी शाबासकी दिली. 

यावर बंड्याला काहीतरी विचारायचं होतं. पण नानांना दुसरी एक मीटिंग होती. म्हणून त्यांनी गप्पा आवरत्या घेतल्या.

संबंधित बातम्या