घमासान! 

डॉ. बाळ फोंडके 
सोमवार, 28 सप्टेंबर 2020

कुतूहल  

‘हं, बोल गोट्या. गेल्या वेळी मी जरा घाईघाईनंच निघून गेलो. त्याचवेळी तू काहीतरी विचारण्यासाठी चुळबूळ करत होतास. लक्षात आहे माझ्या..’ सगळेजण जमलेले पाहताच नानांनीच गोट्याला बोलायला लावलं. 

‘ म्हणजे मला आपलं वाटलं म्हणून विचारतोय. गेल्या वर्षी मी एनडीएमध्ये गेलो होतो. आमच्या आत्याच्या शेजाऱ्यांचा मुलगा तिथं होता. त्यावेळी मला समजलं की आपल्या संरक्षण दलाचे तीन मुख्य विभाग आहेत,’ गोट्या म्हणाला. 

‘अरे तीनच काय, कितीतरी विभाग आहेत. देशभर विखुरलेले. रेजिमेन्ट्स म्हणतात त्याला. मी वाचलंय,’ मिंटी म्हणाली. 

‘नाही, नाही, मिंटे. अगं शत्रूचा हमला काही फक्त जमिनीवरूनच होत नाही. तो आकाशातूनही होतो. समुद्रावरूनही होतो. त्यासाठीच तीन मुख्य विभाग आहेत. एनडीएमध्ये शिकणाऱ्या विद्यार्थ्यांचेही असे तीन गट होतात. आम्ही ज्याच्याकडे गेलो होतो तो नंतर दुसरीकडे जाणार आहे, जहाजावर भरती होण्यासाठी,’ गोट्यानं माहिती दिली. 

‘मिंटे, गोट्या म्हणतोय ते बरोबरच आहे. भूदल, नौदल आणि हवाईदल असे तीन प्रमुख विभाग आहेत आपल्या संरक्षण दलाचे. भूदल जमिनीवर, नौदल सागरांवर आणि हवाईदल आकाशात तैनात असतं,’ नानांनी माहितीत भर घातली. 

‘म्हणूनच माझ्या मनात शंका आली नाना, की आपल्या शरीराच्या संरक्षण दलातही असे विभाग असतात का?’ गोट्यानं विचारलं. 

‘अॅ हॅ हॅ! काय पण शंका! शरीरावर हल्ला समुद्रातल्या जहाजावरून किंवा आकाशातल्या विमानामधून कसा होईल? मग हवेत कशाला असे वेगवेगळे विभाग!’ चिंगीनं वेडावलं. 

‘नाही चिंगे, तसं तुझं म्हणणं बरोबर असलं तरी गोट्याची शंकाही रास्त आहे. शरीराच्या संरक्षणदलाचेही टी लिम्फपेशी, बी लिम्फपेशी, मारक पेशी असे वेगवेगळे विभाग आहेत,’ नाना म्हणाले. 

‘पण असं काय वेगवेगळं काम करतात ते?’ बंडूनं विचारलं. 

‘टी पेशी मुख्यत्वे आगंतुकाचं ओळखपत्र तपासण्याचं, बी पेशी परक्यानं घुसखोरी केल्याचा संदेश मिळताच त्याच्याविरुद्ध अत्यंत उपयोगी अशी क्षेपणास्त्रं तयार करण्याचं, तर मारक पेशी आत्माहुती देणाऱ्या हाराकिरी दलाचं काम करतात. बी पेशींनी बनवलेली क्षेपणास्त्रं त्या रोगजंतूविरुद्धच नेमकी बेतलेली असतात. त्यांना अॅन्टिबॉडी म्हणतात,’ नाना म्हणाले. 

‘क्षेपणास्त्रं? ती काही साधीसुधी नसतात. तर मग ती बनवायला तर बराच वेळ लागत असणार..’ चंदू म्हणाला. 

‘हो, तसा लागतो थोडा वेळ. तरीही झपाट्यानं होतं काम. वेळ घालवताच येत नाही. कारण शत्रूची कुमक फार वेगानं वाढत असते. तेव्हा तिचा बंदोबस्त करण्यासाठी त्याच वेगानं आपली अस्त्रं आणि शस्त्रं यांची निर्मितीही करावी लागते. ती तयार होता होताच त्यांचा वापर करायला सुरुवात होते. लढाईला तोंड लागतं. तुंबळ रणसंग्राम होतो. त्याचाच परिणाम म्हणून आपल्याला ताप येतो. त्यावेळी घमासान लढाई चाललेली असते,’ नानांनी माहिती पुरवली. 

‘म्हणजे मग ताप येणं चांगलं म्हणायला हवं,’ चंदू परत म्हणाला. 

‘हो चंद्या. तसा ताप हाही एक रोगप्रतिकाराचा उपायच आहे. कारण वाढीव तापमानात हे रोगजंतू टिकाव धरू शकत नाहीत. म्हणूनच ताप म्हणजे आपला प्राथमिक प्रतिहल्लाच असतो,’ नाना उत्तरले. 

‘पण मग तो उतरावा म्हणून आपण औषधं का घेतो?’ बंडूला शंका आली. 

‘कारण तो प्रमाणाबाहेर वाढला तर शरीरालाही धोकादायक ठरू शकतो. रोगापेक्षा इलाजच भयंकर अशी परिस्थिती ओढवू नये म्हणून आपण ताप नियंत्रित करण्याचे उपाय योजतो,’ नाना म्हणाले. 

‘हो नाना, माझी मावस बहीण मेडिकल कॉलेजात आहे. ती सांगत होती की ताप वाढायला लागला की आपण कपाळावर थंड पाण्याच्या पट्ट्या ठेवतो ते मेंदूला या जास्ती तापाचा त्रास होऊ नये म्हणून,’ मिंटी म्हणाली. 

‘खरंय! पण नुसताच ताप येत नाही. कारण तोपर्यंत तयार झालेली अॅन्टिबॉडीची क्षेपणास्त्रं शत्रूचा मागोवा घेत रक्तातून फिरत राहतात आणि हमलाखोर दिसला की त्याला मरणमिठी मारून त्याचा नायनाट करतात. त्यांची शरीरभर पसरलेली कलेवरं उचलून मॅक्रोफाज पेशी रणांगणाची साफसफाई करतात,’ नाना म्हणाले. 

‘ओऽह, म्हणजे सफाई कामगारही असतात या संरक्षण दलात!’ चिंगी म्हणाली. 

‘तर.. तो कचरा तसाच साचू दिला तर त्याचाही अपाय होऊ शकतो. म्हणूनच सगळी साफसफाई करून शरीराला परत मूळपदावर आणण्याची गरज असतेच,’ नाना म्हणाले. 

‘आणि अशा तऱ्हेनं विजय मिळाला की परत तंदुरुस्त होत आपण नेहमीसारखे कामाला लागतो. जय हो!’ नानांच्याऐवजी आपणच समारोप करत बंड्या म्हणाला.

संबंधित बातम्या