आठवणींची साठवण 

डॉ. बाळ फोंडके 
सोमवार, 5 ऑक्टोबर 2020

कुतूहल

नाना बैठकीला हजेरी लावतालावताच बंड्यानं प्रश्नांची सरबत्ती सुरू केली. त्याला आवरता आवरता नानांची तारांबळच उडाली. त्याला कसाबसा थोपवत ते म्हणाले, 

‘अरे हो हो, अशी एका पाठोपाठ एक क्षेपणास्त्रं काय सोडत बसलास?’ 

‘पण मलाही तेच विचारायचं होतं नाना,’ त्याच्या जोडीला येत चंदू म्हणाला, ‘ही क्षेपणास्त्रांची काय भानगड आहे?’ 

‘अरे भानगड नाही. शरीरात रोगजंतूंची घुसखोरी झाली आहे आणि त्याची ओळखही पटली आहे असा संदेश मिळताच काही बी पेशी आपलं रूपांतर एका प्रकारच्या कारखान्यांमध्ये करून त्या शत्रूविरुद्ध उपयोगी पडणाऱ्या क्षेपणास्त्रांच्या निर्मितीस वाहून घेतात. ही अॅन्टिबॉडीरुपी क्षेपणास्त्रं खास प्रथिनांची बनलेली असतात. या प्रथिनांना इम्युनोग्लोब्युलिन्स असं नाव आहे,’ नानांनी माहिती दिली. 

‘पण असं क्षेपणास्त्रं नुसतंच उडवून त्या रोगजंतूंचा कसा काय बंदोबस्त होऊ शकतो?’ मिंटीनं विचारण्यात पुढाकार घेतला असला तरी सगळ्यांनाच ती शंका छळत होती हे त्यांच्या चेहऱ्यावर स्पष्ट दिसत होतं. 

‘तशी ही क्षेपणास्त्रं साधीसुधी नसतात. एखादं कुलूप उघडण्यासाठी एकमेव चावीच लागते. दुसऱ्या कोणत्याही चावीनं ते कुलूप उघडता येत नाही. तसंच ती चावीही दुसरं कोणतंही कुलूप उघडू शकत नाही. अशा कुलूप आणि चावी यांच्यात जसं एकनिष्ठतेचं नातं असतं तसंच अॅन्टिजेन, म्हणजेच रोगजंतूचं आधारकार्ड, आणि अॅन्टिबॉडी यांच्यातलं नातं असतं. ज्या अॅन्टिजेनच्या विरोधात त्या अॅन्टिबॉडीची निर्मिती झालेली असते त्याच अॅन्टिजेनला नेस्तनाबूत करण्याचं काम ती अॅन्टिबॉडी करते. दुसऱ्या कोणत्याही अॅन्टिजेनविरोधात ती उपयोगी पडत नाही,’ नानांनी स्पष्ट केलं. 

‘म्हणजे नाना त्याच सुमारास दुसऱ्याच कोणत्या रोगजंतूनं हमला केला तर त्याच्याविरुद्ध दुसरं क्षेपणास्त्रं, दुसरी अॅन्टिबॉडी! कमाल आहे!’ गोट्या म्हणाला. 

‘अरे हे तर काहीच नाही. या क्षेपणास्त्रांचं उत्पादन करणाऱ्या यंत्रणेची स्मरणशक्तीही दणकट असते,’ नाना उत्तरले. 

‘म्हणजे एकदा ओळख झाली की ती कायमची त्यांच्या आठवणीत राहते?’ चिंगीनं विचारलं. 

‘तर काय! चिंगे, आता देशातले बरेचसे व्यवहार संगणकामार्फत होत असतात. जगात इतरत्र तर सगळेच व्यवहार संगणकाधिष्ठित झाले आहेत. त्यामुळं एकदा का एखादी माहिती त्यात नोंदवली गेली की ती तिथं कायमची टिकून राहते. देशाबाहेरून येणाऱ्या पाहुण्याचा पासपोर्ट तो पहिल्यांदा येतो त्यावेळी आपल्या अधिकाऱ्यांकडून तपासला जातो. तेव्हाच त्याची नोंद संगणकात होते आणि कायमची तिथंच ठाण मांडून बसते. तो पाहुणा परत येतो तेव्हा त्याची ओळख तिथं असतेच. ती ताडून मग तो मित्र आहे की शत्रू हे ताबडतोब ओळखता येतं,’ नानांनी सांगितलं. 

‘म्हणजे धमालच आहे!’ गोट्या म्हणाला. 

‘बरोबर बोललास गोट्या. आपल्या अंगदेशाच्या संरक्षण व्यवस्थेतही ती तरतूद केलेली आहे. रोगजंतूचा जेव्हा पहिल्यांदा प्रवेश होतो तेव्हा आपल्या टी लिम्फपेशी त्याच्या अॅन्टिजेनरुपी पासपोर्टची नोंद करतात. त्याची आठवण मग दीर्घ काळ पाठीमागे रेंगाळत राहते. काही वेळा तर आयुष्यभर ती टिकून राहते. त्यामुळंच जेव्हा त्याचं परत आक्रमण होतं तेव्हा संरक्षण दल खडबडून लगबगीनं कामाला लागतं. आता क्षेपणास्त्राच्या उत्पादनाला वेळ लागत नाही. थोड्याच वेळात ते रक्तात उतरतं आणि हे उत्पादनही इतक्या जोमदारपणे होत असतं की रक्तातल्या अॅन्टिबॉडीरुपी क्षेपणास्त्रांची गर्दी होते. काय बिशाद मग रोगजंतू त्यांच्यापुढं टिकाव धरून राहील,’ नानांनी उत्तर दिलं. 

‘हो आता आठवलं. माझी आजी मला सांगायची, बंड्या तुला लहानपणीच कांजिण्या झाल्या होत्या. आता आयुष्यात परत म्हणून तुला कांजिण्यांचा त्रास होणार नाही. म्हणजे एकदा घुसलेल्या त्या कांजिण्यांच्या रोगजंतूची ओळख माझ्या संरक्षण व्यवस्थेनं कायमची टिकवून ठेवली आहे म्हणायची,’ बंड्या म्हणाला. 

‘अरे तुझ्या आजीनं, त्या पिढीतल्या सगळ्यांनीच अनुभवातून हे ज्ञान मिळवलेलं होतं. काही वेळा या लढाया अॅन्टिबॉडीरुपी क्षेपणास्त्रांच्या मदतीनं न खेळता रणगाड्यांच्या मार्फत केल्या जातात. अंगदेशातल्या मारक लिम्फपेशी म्हणजेच हे रणगाडे. तेही अॅन्टिबॉडीच्या रेणूंसारखे रामबाण असतात. म्हणजे ज्या अॅन्टिजेनविरुद्ध लढा द्यायचा त्यालाच मारक ठरतात. या मारक पेशी  

मग ज्या पेशींमध्ये रोगजंतू दबा धरून बसलेला असतो तिला नेमका टिपून मारून टाकतात. कर्करोगासारख्या व्याधीत या मारक पेशींचे रणगाडेच अधिक उपकारक ठरतात,’ नाना म्हणाले. 

‘त्या पेशीही अशीच आठवणीची साठवण करत असतील, नाही नाना?’ चंदूनं विचारलं. 

‘हो ना. आता तुम्हीही हे ज्ञान असंच कायमचं आठवणीत ठेवा. पळा आता. उद्या भेटू, याच वेळी, इथंच..’ नानांनी मुलांना पळवलं.

संबंधित बातम्या