दो बूँद जिंदगीके

डॉ. बाळ फोंडके
सोमवार, 19 ऑक्टोबर 2020

कुतूहल

‘गेल्या वेळी आपण देवीच्या लशीसंबंधी बोलत होतो तेव्हा सांगायची एक गोष्ट आता मला आठवली.’

‘कोणती नाना?’, सर्वांनी कोरसमध्ये विचारलं. ‘गोष्टी ऐकायला आम्हाला आवडतंच.’

‘आज नव्यानं जन्माला आलेल्या मुलालाही ती लस टोचली जात नाही. पण वीस पंचवीस वर्षांपूर्वी परदेश प्रवास करायचा तर व्हिसा मिळवण्याबरोबरच देवीची लसही टोचून घ्यावी लागे. आणि ती टोचल्याचं प्रमाणपत्रही बरोबर बाळगावं लागे. त्या रोगाच्या सर्वत्र होत असलेल्या प्रसाराला आळा घालण्यासाठीच ही सावधगिरी बाळगावी लागत होती. आज ती आवश्यकता नाहीशी झालेली आहे. कारण या रोगाची जगाच्या पाठीवरून आपण कायमची हकालपट्टी केलेली आहे. या रोगाचे जंतू आता काही अतिसुरक्षित प्रयोगशाळांमध्येच जिवंत ठेवलेले आहेत. तेही काही आणीबाणी उद्‌भवलीच तर तातडीनं लशीचं उत्पादन करता यावं यासाठीच. हे आपण साध्य करू शकलो कारण जागतिक आरोग्य संघटनेच्या, WHOच्या, नेतृत्वाखाली एक सार्वत्रिक अभियान राबवलं गेलं. त्यात देवीची लस सर्वांनाच टोचण्याचा कार्यक्रम हाती घेण्यात आला होता.’

‘ही तर जुनी गोष्ट झाली. आमच्या जन्मापूर्वीची. पण आजची गोष्ट आता मी सांगतो.’

‘चंद्या तू? आणि गोष्ट सांगणार? नानांसारखी? वाट बघा!’

‘माझी चेष्टा करू नकोस हं मिंटे. गोष्ट ऐकशील ना तर तुझीच वाट लागेल की नाही बघ.’

‘सांग सांग तू चंदू. मलाही ऐकायचीय तुझी गोष्ट’, त्याला प्रोत्साहन देत नाना म्हणाले.

‘तुम्ही सांगत होतात तशीच आणखी एका रोगाची हकालपट्टी आपण अलीकडेच केली आहे. अमिताभ बच्चननीही त्या मोहिमेत भाग घेतला होता. ‘दो बूँद जिंदगीके’ म्हणत त्यांनी सर्वांना पोलिओची लस टोचून घ्यायला सांगितलं होतं. त्यातून मग त्या रोगालाही आपण हद्दपार केलंय.’

‘कळलं, कळलं.’ आपली हार मानायला मिंटी तयार नव्हती. ‘नेहमीप्रमाणे माती खाल्लीसच तू. ती लस टोचली नव्हती काही, तोंडातून दिली होती औषधासारखी.’

‘खरंय तुझं म्हणणं मिंटी. पण चंदू सांगत होता तीही गोष्ट खरीच आहे. फार मोठं काम केलंय त्या लशीनं. इतरही अनेक आहेत. योग्य वेळी त्या दिल्या गेल्यामुळंच तर एकेकाळी जीवघेण्या असलेल्या अनेक रोगांचा आता समूळ नायनाट करता आला आहे. प्लेग, टायफॉईड, डांग्या खोकला यासारख्या रोगांची नावंही आजकाल ऐकू येत नाहीत. आपल्या सरासरी आयुर्मानात जी लक्षणीय वाढ झालेली आहे तिचं मुख्य कारण या रोगांपासून मिळालेली मुक्ती हेच आहे.’

‘पण या लुटूपुटूच्या लढाईसाठी ते नटवलेले सैनिक तयार करतातच कसे?’

‘नटवलेले सैनिक? तुला म्हणायचंय काय गोट्या? हं, हं, आलं लक्षात. लस कशी तयार करतात हेच विचारायचंय ना तुला? लशी मुख्यत्वे तीन प्रकारच्या असतात. एका लशीत त्या रोगजंतूची प्रयोगशाळेत वाढ करून त्याला उष्णता देऊन किंवा विकिरणांचा मारा करून मारलं जातं. त्यामुळं शरीरात त्या रोगजंतूची वाढ होत नाही. पण त्याचं ओळखपत्र मात्र शाबूत असतं. अशी रोगजंतूच्या कलेवररूपी लस टोचली की संरक्षणव्यवस्थेची स्मरणशक्ती जागी होऊन ती ओळख कायमची टिकवून ठेवते.’

‘म्हणजे त्याच्या पासपोर्टची कायमची नोंद केली जाते. त्यामुळं त्या रोगजंतूंनं हल्ला करण्याचं धाडस केलंच तर त्याची ओळख पटायला वेळ लागत नाही. ताबडतोबच त्याच्या विरुद्ध तोफा डागल्या जातात, असंच ना!’

‘बरोबर ओळखलंस तू बंड्या. आणि लशीतला रोगजंतू मेलेला असल्यामुळं तो रोगाची लागणही करू शकत नाही.’

‘हा झाला एक प्रकार. दुसरा?’

‘सांगतो ना. तुला नेहमीच घाई असते मिंटे. दुसऱ्या प्रकारात जिवंत रोगजंतूच वापरले जातात. मात्र ते माणसाळवलेले किंवा रोगजंतूचे मवाळ भाईबंद असतात. दात काढलेल्या सिंहासारखी त्यांची स्थिती असते. त्यांची शरीरात वाढ होते पण ते रोगबाधा करू शकत नाहीत. या उपाययोजनेपायी तर स्मरणशक्तीला चांगलीच धार येते. अशा प्रकारची लस अधिक परिणामकारक असते. पण त्यासाठी प्रयोगशाळेत असे माणसाळवलेले रोगजंतू तयार करण्याची व्यवस्था असावी लागते.’

‘ आणि आता तिसरा.’

‘काही रोगजंतू शरीरात शिरल्यानंतर एक प्रकारचं गरळ ओकतात. ते विष मग इतर भागात पसरून रोगबाधा होते. अशा रोगजंतूविरुद्ध अंगदेशाच्या जवानांना तयार करण्यासाठी त्या विषावर उतारा ठरणारं प्रतिविष तयार केलं जातं. त्याचाच मग लस म्हणून वापर केला जातो. धनुर्वात किंवा घटसर्प यासारख्या रोगांवर अशी लस रामबाण ठरते.’

‘ मग कोरोनाची लस कोणत्या प्रकारची आहे?’ ‘ ते तपशीलवार सांगायला हवं. तर पुढच्या वेळी.’    

संबंधित बातम्या