आस्ते कदम

डॉ. बाळ फोंडके
सोमवार, 7 डिसेंबर 2020

कुतूहल

नानांना आपला लॅपटॉप व्यवस्थित लावण्याचीही उसंत न देता गोट्यानं विचारायला सुरुवात केली. 

‘इतक्या सगळ्या लसी आहेत तर मग त्या आम्हाला टोचून या बंदिवासातून मोकळं का नाही करत?’

‘अरे आहेत म्हणजे त्या अजून सगळ्यांना खुल्या करण्याइतपत तयार झालेल्या नाहीत. त्यांच्या चाचण्या घेतल्या जात आहेत. त्या---’

‘--- या या चाचण्यांबद्दलच विचारायचं होतं. इतका वेळ का घेतला जातोय त्यांच्यासाठी?’

‘तर काय!’ त्याला दुजोरा देत चिंगी म्हणाली, ‘तो पहिला टप्पा, दुसरा टप्पा किती टप्पे घेतले जाणार आहेत?’

‘त्यांची जरुरी आहे. कोणतंही औषध काय किंवा लस काय, माणसांना देण्याआधी त्यापायी खरोखरच उपाय होणार आहे, कोणताही अपाय होणार नाही याची खातरजमा नको का करायला! नाहीतर रोगापेक्षा इलाज भयंकर अशीच परिस्थिती ओढवायची.’

‘भीक नको पण कुत्रा आवर!’ आदल्याच दिवशी शिकलेली नवी म्हण चंदूनं वापरली. 

‘म्हणूनच अशी नवी लस प्रयोगशाळेत विकसित झाली की प्रथम तिची चाचणी उंदीर, मूषक, ससा, गिनीपिग, हॅमस्टर यापैकी किमान तीन प्राण्यांवर घेतली जाते. तिला प्री क्लिनिकल ट्रायल्स म्हणतात.’

‘उंदीर आणि मूषक म्हणजे एकच झाले की!’

‘नाही मिंटी. इंग्रजीत त्यांना रॅट आणि माऊस म्हणतात. त्या संपूर्ण वेगळ्या प्रजाती आहेत. नुसताच आकारातला फरक नाही. ’

‘पण लस जर माणसांना द्यायचीय तर मग या प्राण्यांवर चाचण्या कशाला? आणि तेही तीन तीन.’

‘कारण माणसांना ती टोचण्यापूर्वी ती सुरक्षित आहे आणि मुख्य म्हणजे उपायकारक आहे, ही लुटुपुटूची लढाई खेळल्यानं संरक्षणदल खरोखरच सज्ज होतं हे पारखून घ्यायला हवं. कोणतंही औषध किंवा लस विषारी नाही किंवा त्याच्यापासून कोणतेही दुष्परिणाम संभवत नाहीत याची खात्री करून घ्यावी लागते. झालंच तर तिचा किती डोस देता येतो याचीही चाचपणी करावी लागते. या प्राण्यांना ती टोचून त्यांना काहीही अपाय होत नाही आणि त्यांच्या शरीरात अॅन्टिबॉडी तयार होतात हे पाहिलं जातं. आता तीन तीन प्राण्यांबद्दल म्हणशील तर माणसांमध्येही निरनिराळ्या प्रकृतीचे लोक असतात. सगळ्यांनाच ती द्यायची तर मग निरनिराळ्या प्राण्यांना टोचून त्याची तजवीज केली जाते. शिवाय हे प्रयोग एकदाच करून चालत नाही. तीन चार वेळा ते करून प्रत्येक वेळी योग्य तेच निष्कर्ष मिळताहेत हेही पहावं लागतं.  

म्हणजे कावळा बसायला आणि फांदी तुटायला असं निमित्त न होता खरोखरच लस दिल्यामुळेच त्या प्राण्यांचं संरक्षण दल सतर्क झालंय याचीही खात्री करता येते  ती सर्व माहिती एकत्रित करून त्याची व्यवस्थित छाननी केल्यावरच त्यांची माणसांवर चाचणी घ्यायला परवानगी दिली जाते.’

‘तरीही तीन तीन टप्प्यातल्या चाचण्या कशाला?’

‘सावधगिरी बाळगण्यासाठी. पहिल्या टप्प्यात थोड्याच निरोगी व्यक्तींना ती लस देऊन तिची परिणामकारकता तर जोखली जातेच. शिवाय ती निर्धोक आहे हेही पाहिलं जातं. ज्यांना ती दिलीय त्यांना नंतरही काही दुष्परिणाम जाणवत नाहीत याचीही खात्री करून घेतली जाते. पहिला टप्पा जर यशस्वीपणे पार केला तर मग दुसर्‍या टप्प्यासाठी मंजुरी दिली जाते. सगळं काम कसं आस्ते कदम होतं.’

‘म्हणजे नाना, गरम दूध कसं एकदम तोंडात ओतलं तर भाजूनच निघतं. म्हणून तर ते फुंकून फुंकून प्यावं लागतं.’

‘योग्य उदाहरण दिलंस बंड्या. दुसर्‍या टप्प्यात थोड्या जास्ती जणांना ती दिली जाते आणि तेही एकाच इस्पितळात नाही तर निरनिराळ्या ठिकाणच्या वेगवेगळ्या इस्पितळांमध्ये. तसं केल्यानं सगळ्याच प्रकृतीच्या माणसांना ती लागू पडते याची खात्री करून घेतली जाते. तसंच या टप्प्यात निरनिराळे डोस देऊन कोणता सर्वात जास्ती परिणामकारक ठरतो आणि कोणता माणूस सहन करू शकतो याचीही चाचपणी केली जाते. तो टप्पा पार पडला की मग तिसर्‍या टप्प्यात मोठ्या प्रमाणात ती देऊन हवी ती माहिती मिळवली जाते. तो पार पडला की व्यापक उत्पादन करायला लस तयार होते.’

‘आणि ती आम्हाला दिली जाते आणि आमची या तुरुंगातून सुटका होते. हुरै!’

जल्लोष करत बच्चे मंडळी पांगली. 

संबंधित बातम्या