फेलूदा
कुतूहल
‘हा बंड्या कुठं राहिला?’ नानांनी विचारलं. बाकीचे सगळे हजर होते. पण बंड्याचा अजून पत्ता नव्हता.
‘त्याच्या घरी जरा टेन्शन आहे नाना.’
‘का रे गोट्या? काय झालंय?’
‘त्याचे बाबा बॅंकेत आहेत. त्यांना रोज कामाला जावं लागतं. त्यांच्या बरोबर काम करणार्यांपैकी एकजण परवा कोरोना पॉझिटिव्ह निघाला. त्या बरोबर इतरांचीही टेस्ट केली गेली. त्याचा रिझल्ट यायचाय अजून. त्यामुळं---’
‘कळलं. सांगा त्याला, आणि त्याच्या घरच्यांनाही, की घाबरायचं कारण नाही. लवकर निदान झालं तर बहुतेक सगळे त्यातून बरे होतात. तुम्ही वाचलं नाहीत का की मृत्यू दर दोन टक्क्यांच्या आसपासच आहे. त्यातही जे या टेस्ट करून घ्यायला टाळाटाळ करतात आणि त्यामुळं उपचाराला वेळ लावतात त्यांचाच भरणा जास्ती आहे.’
‘तरी पण या टेस्टचा रिझल्ट यायला इतका वेळ का लागतो? माझे बाबा नियमितपणे त्यांच्या रक्तातल्या साखरेची टेस्ट करून घेतात. तिचे रिझल्ट तातडीनं मिळतात.’
यावर नाना काही सांगणार तोच ‘निगेटिव्ह निगेटिव्ह’ असा ओरडा ऐकू आला. पाहतात तो बंड्या हजर झाला होता आणि तोच ओरडत होता.
‘माझे बाबा निगेटिव्ह निघाले.’
‘ही तर चांगली बातमी आहे. तर तू विचारत होतीस मिंटे की या टेस्टचा रिझल्ट मिळायला इतका उशीर का लागतो. त्याचं कारण ही टेस्ट साधी नाही. त्यासाठी जो घशातल्या किंवा नाकातल्या द्रवाचा नमुना घेतात त्यातून करोना विषाणूच्या जनुकाचा एक अतिशय छोटासा तुकडाच मिळतो. त्याचा छडा लावण्यासाठी तो पुरेसा नसतो. म्हणून मग पीसीआर या तंत्रानं त्याच्या अनेक प्रती मिळवल्या जातात. त्याही एकाच फटक्यात मिळत नाहीत. एकानंतर एक अशी बरीच आवर्तनं करावी लागतात. जर मुळातच विषाणूचं शरीरातलं प्रमाण जास्ती असेल तर मग कमी आवर्तनातून हव्या तितक्या प्रती मिळतात. पण जर ते प्रमाण कमी असेल तर जास्ती आवर्तनं करावी लागतात. यालाच सीटी नंबर म्हणतात. तो कमी निघाला तर शरीरात करोनानं चांगलंच बस्तान बसवलंय असं दिसून येतं. पण जर जास्ती निघाला तर त्याचा अर्थ करोनाचं प्रमाण तुटपुंजंच आहे. त्यावरून मग उपचारांची दिशा समजून येते. आणि या प्रती मिळवण्यासाठी खास यंत्राचा वापर करावा लागतो. ते काही मोजक्या प्रयोगशाळांमध्येच उपलब्ध असतं. जिथं संशयित रोगी आहे तिथं अशी प्रयोगशाळा असेलच असं नाही. या सगळ्यामुळं विश्वास ठेवण्यासारखा निष्कर्ष मिळायला वेळ लागतो.’
‘पण मग वेळ लागला की चांगली बातमी मिळण्याची शक्यता जास्ती असते असंच म्हणायला हवं, नाही का?’
‘असंच काही नाही चंदू. तरीही तू म्हणतोस ते अजिबात चुकीचं आहे असंही नाही. पण आता हा वेळ कमी करता येणार आहे. कारण आता फेलूदा आलाय आपल्या मदतीला.’
‘फेलूदा! म्हणजे तो डिटेक्टिव्ह! सही है यार! मी पाहिल्यात त्याच्या करामती टीव्हीवर.’
‘तो नाही मिंटी. हा फेलूदा म्हणजे आपल्याच इन्स्टिट्यूट ऑफ जेनॉमिक्स अॅन्ड इन्टिग्रेटेड बायॉलॉजी या संशोधन संस्थेनं विकसित केलेली एक नवी चाचणी आहे. क्रिस्पर या अत्याधुनिक तंत्रज्ञानावर ती आधारित आहे. या क्रिस्परच्या शोधालाच यंदाचा नोबेल पुरस्कार दिला गेलाय. त्यावर आधारित या देशी चाचणीसाठी कोणत्याही महागड्या उपकरणाची वा यंत्राची गरज लागत नाही. आपण घरच्या घरी एका कागदावर नमुना घेऊन जशी रक्तातल्या साखरेची तपासणी करतो तशाच प्रकारची ही आहे. खास कागदावर उमटणार्या रंगीत रेषांवरून करोनाची लागण झाली आहे की नाही याचा पत्ता लावता येणार आहे. टाटा उद्योगसमूहाचाही यात सहभाग आहे. त्यामुळं त्याचं मोठ्या प्रमाणावर उत्पादन लवकर करणं शक्य होणार आहे. आणि ती महागडीही नाही. आयसीएमआर या शिखर संस्थेनं तिला मान्यताही दिली आहे. एवढंच काय पण जगभर तिची वाखाणणी होत आहे. बीबीसी या इंग्लंडमधल्या प्रसारमाध्यमानं तर तिची खास भलावण केली आहे.’
‘म्हणजे नाना आपल्याच देशातल्या शास्त्रज्ञांनी ही विकसित केली आहे. कमाल आहे!’
‘कमाल कसली! अरे आपल्याच शास्त्रज्ञांनी मंगळावर यान पाठवलं होतं आणि तेही अमेरिकेपेक्षा निम्म्या खर्चात. विसरलास बंड्या.’
सर्वांनी चिंगीच्या म्हणण्याला दुजोरा दिला.